सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? ।।धृ।।
जीवन तूझे ‘बहूरंगी’
सर्व क्षेत्री अग्रभागीं
आवडतोस तूं सर्वाना ।।१।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
दहीं दूध खाई लपून
तूप लोणी नेई पळवून
‘खादाड’ वाटलास सर्वांना ।।२।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
फळे चोरली बागेमधली
गोपींची शिदोरी नेली
‘चोर’ वाटलास सर्वांना ।।३।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
गौळणीचे उचली कपडे
दगड मारुनी मटकी फोडे
‘खोडकर’ वाटलास सर्वांना ।।४।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
मधुरगीत बांसरीतूनी
नाचलास तूं तन्मय होऊनी
‘कलाकार’ वाटलास सर्वांना ।।५।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
कंसाला तूं ठार मारले
कित्तेक राक्षसा संहारले
‘रक्षणकर्ता’ वाटलास सर्वांना ।।६।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
वेडे केले तूं प्रेमानी
भवती जमल्या सर्व गौळणी
‘प्रेमिक’ वाटलास सर्वांना ।।७।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
पाठीराखा द्रौपदीचा
मान राखला सुभद्रेचा
‘प्रेमळ बंधू’ वाटलास सर्वांना ।।८।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
राज्य करण्यातील तंत्र
पांडवा दिले तूं मंत्र
‘राजकारणी’ वाटलास सर्वांना ।।९।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
जीवनाचे महान ज्ञान
दिलेस तू गीता सांगून
‘महाज्ञानी’ वाटलास सर्वांना ।।१० ।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
दाखवूनी जीवनद्वार
ठरलास तूं ‘पू्र्णावतार’
आदराने झुकती तुजपुढें माना
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ।।११।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply