कोण तू कोण मी
ओळख अनोळखी आहे
वाट वाकडी समोर अशी
भेट का दुरुन अबोल आहे
कोण तू कोण मी
मनात हुरहूर आहे
चांद बिलोरी चांदण्यात
ओढ तुझी अंतरात आहे
कोण तू कोण मी
ऋणानुबंध भेटीत आहे
प्राजक्त दवात गंधाळला
तुझ्यात बंध गुंफून आहे
कोण तू कोण मी
कोडे न उलगडणारे आहे
नियतीचे फासे उलटे सारे
खेळात मी हरवुन आहे
कोण तू कोण मी
प्रश्न अनेक भावनांचे आहे
तू मस्त किनाऱ्यावर उभा
भोवऱ्यात मी फसत आहे
कोण तू कोण मी
प्रश्न अंतरी व्यापून आहे
भाव हृदयी ओल अनामिक
लोपले शब्द तू दूर दूर आहे
कोण तू कोण मी
मोगरा बहरुन आहे
तुझ्या स्पर्शाचे चांदणे
गोड माझ्यात सजून आहे
कोण तू कोण मी
रातराणी गंधित वाहे
तुझ्या मिठीची अलवार आस
मलमली बंध तुझ्यात गुंतून आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply