त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत भोगव्याला पोचायला जवळ जवळ दुपारचे बारा वाजले …. मी फार अस्वस्थ झालो .. कारण हा किनारा फार सुंदर आणि इथून दिसणारी विशाल समुद्राची निळाई … मला कॅमेऱ्यात टिपायची होती .. मला इथे नऊ वाजता पोचायचं होतं ..सकाळच्या कोवळ्या प्रकाशात …दुपारच्या या प्रहरी चांगलंच ऊन असल्याने आम्ही दोघं सोडून सगळी मंडळी हॉटेलात कोल्ड ड्रिंक प्यायला बसली ..
मी किनाऱ्याकडे झपाझप गेलो … इतकं कडक ऊन असूनही किनारा आणि समोरचा निळाशार समुद्र फार सुंदर दिसत होता … डावीकडे आणि उजवीकडे किनारा वक्राकार पसरलाय …आणि मधला …चांगलाच विस्तृत रुंद भाग खडकाळ आहे आणि तीनशे साडेतीनशे फूट लांबवर मुख्य समुद्र आहे ..
मी दोन्ही बाजूंना फिरलो … फोटो काढले .. आणि मधल्या खडकाळ भागात चालत निघालो … खडकाच्या कडांवर लाटा आपटून उंच जात होत्याच आणि काही वेगळा फोटो मिळेल हा विचार मनात आल्याने चालत निघालो …पोटरी एवढं किंवा थोडंसं कमी पाणी असल्याने धोका असा नव्हता … जसा कडेपासून थोडंसं अगोदर जागी पोचलो आणि मनाला सहज काहीतरी प्रकर्षानं जाणवलं ….खडकाळ भाग जिथे संपत होता तिथे समुद्र फारच समर्थ जाणवला … नक्कीच प्रचंड खोल असणार … जनरली किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो ..आणि पुढे तो खोल होत जातो ..इथे तसं नक्कीच नव्हतं … मी तरीही अजून थोडं पुढे गेलो …. आणि काही क्षणांनी पायाखाली मोठा …. काहीतरी प्रचंड हालचाल झाल्यावर होईल असा … आवाज झाला आणि आवाजाचा जसा प्रतिध्वनी थोडा वेळ होत राहतो .. तसा होत राहिला … विचार करा…. समुद्र समोर क्षितिजापर्यंत पसरलेला आणि तोही अगदी समोर… दहा बारा फुटांवर …. आणि मी मुख्य जमिनीपासून चांगलाच दूर …. पाण्यात …. आणि असा महाप्रचंड घुमणारा भरीव ध्वनी …पायांखाली … काही क्षण भीती वाटली …पण तिने पूर्णपणे घेरलं नाही … मी डोळे उघडे ठेऊन … आजूबाजूला परत नीट बघितलं .. त्या आवाजाने काही क्षण मला माझी पक्की पोझिशन थोडीशी हरवल्या सारखा झालं होतं …मात्र मी परत उत्तम भानावर आलो ..विजेच्या वेगाने ….. तिथेच उभा राहिलो … आता मात्र उघड्या डोळ्यांनी त्या आवाजाची परत येतोय का याची वाट पाहत … आणि दोन अडीच मिनिटांनी तो सामर्थ्यशाली आवाज परत यायला लागला …एखादं महावेगवान रॉकेट जमिनीखालून जातंय तसा …. आता मात्र मी तो नीट ऐकलं … अर्ध्या पाऊण मिनिटानंतर हळू हळू विरळ होत गेला ….आणि मी प्रचंड सावधपणे हळू हळू परत निघालो … तीन चार मिनिटात परत जमिनीवर आलो … समोर परत त्या जागे कडे बघितलं तर तिथून काहीही जाणवलं नाही …. तिथे थोडा वेळ बसून समोर बघत राहिलो ..आणि मग अनुभवलेल्या निसर्गाच्या अतीविराट … सामर्थ्याची प्रकर्षाने जाणीव झाली … लक्षात आल की तो ‘कोंडुरा’ होता. .. मात्र मी समुद्रातल्या त्या कडेच्या आवाज घुमत असलेल्या जागेवरची नजर क्षणभरही हलवली नव्हती … आणि तो प्रचंड भीतीयुक्त पण देवत्वाचा अनुभव नक्कीच डोळसपणे घेतला गेला होता … मध्यान्ह असल्याने बरोबरचे सगळे वरच्या बाजूच्या एका लहान दुकानात थंड पीत बसले होते … कोणालाही माहित नव्हत कि मी समुद्रात खूप खोलवर गेलो आहे … मात्र तो ‘ध्रोंकार’ एवढा बलशाली होता कि जबरदस्त भीती वाटली पण तरीही पावल जरी मागे गेली तरी डोळे मात्र तिथेच खिळलेले होते ……. तिथे बसून हा विचार करतांना परत तिथे जावं असं तीव्रपणे वाटल….असो … परत कधी तिकडे गेलो तर नक्की हा अनुभव घ्यायची अनिवार्य इच्छा होणारच…
जस जशी उन्हाची तल्लखी वाढत जाते तस तसे समुद्रावर मतलय वेगळाच जोर धरायला लागते… वारा थैमान घालून घोंगावयाला लागतो … मालवण पासून वेंगुर्ल्या पर्यंतचे ‘कोंडुरे’ देखील प्रचंड घुमायला लागतात. त्यांच्या घुमण्याचे भीतीदायक आवाज ऐकायला येतात…. समुद्राला देखील वेड्यासारख उधाण येत .. लाटा अस्मानी उंची गाठायला लागतात … त्यांची गाज थेट सह्याद्रीपर्यंत ऐकायला येते … समुद्रात बऱ्याच ठिकाणी प्रचंड खडक ..त्यात अनेक विवरे …कपार्या … खोली महाभयानक …या दिवसात जोरात येणाऱ्या लाटा या विवरात प्रचंड वेगाने आणि शक्तीने घुसतात … पाण्याचे हे लोट या विवरात कल्पना करता येणार नाही अशा वेगात घुमत राहतात .. … आणि मग त्यांचा गुरगुराट उत्तरोत्तर वाढत जातो … ज्यांचं आयुष्य समुद्रावर गेलंय ते ही या दिवसात तिकडे जात नाहीत … या गुहांना .. विवरांना इकडे कोंडुरा म्हणतात … खानोलकरांची ‘कोंडुरा’ ही कादंबरी मी वाचली नाहीये … सावंतवाडी जवळ कोंडुरा हे गाव आहे …. अनेक वेळा जायचं ठरवूनही राहिलंय …पण जाणारे हे नक्की…
— प्रकाश पिटकर
7506093064
9969036619
prakash.pitkar1@gmail.com
Image : Prakash Pitkar….
Leave a Reply