MENU
नवीन लेखन...

कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सौ. कुंदा विकास झोपे यांनी लिहिलेली ही कथा.


आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.

सकाळी ठीक १० वाजता ठरलेल्या वेळेवर अतिशय साध्या वेषात व पायी चालत ते महान व्यक्तिमत्त्व शाळेजवळ आले. सर्व उपस्थित मान्यवरांसह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना मान देत शाळेचे उद्घाटन केले आणि आकाशाला भिडावा अशा आवाजात टाळ्यांचा कडकडाट झाला. सारा आसमंत दुमदुमला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आजच्या दिवसासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा गावकऱ्यांनी केले होते.

प्रमुख पाहुणे यांनी शाळेत प्रवेश केला. फुलांनी त्यांचे स्वागत होऊ लागले. ढोलताशे, लेझीम एका गजरात वाजू लागले. शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटप्रमुख, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, कितीतरी नामवंत व्यक्ती अनघा दिवाळी अंक २०२० कार्यक्रमास हजर होत्या. तसेच आजुबाजूच्या गावातील लोक हजर होते. त्यांनी आजचा दिवस सोनियाचा केला होता. शाळा जणू विठूरायाची पंढरीच भासत होती.

प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केली. स्वागतगीत, ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित असलेल्या मान्यवर हस्तींचे स्वागत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भेटवस्तू देऊन करण्यात आले. गाणी, पोवाडे, नृत्य, वेशभूषा यांनी कार्यक्रम बहारदार होत होता.

कार्यक्रमामध्ये उपस्थित व्यक्तींची भाषणे कार्यक्रमास चार चाँद लावत होते. सूत्रसंचालन करणारे श्री. विवेक महाजन सर यांनी जेव्हा प्रमुख पाहुणे यांना विनंती केली, आपण आपले विचार मांडावेत. त्यांनी माईक हातात घेताच सर्वत्र शांतता पसरली. सर्वांसमोर ते आपली शिदोरी उघडणार होते. ती शिदोरी गिळंकृत करण्यासाठी सर्व आतुर होते कारण आतापर्यंत या दिलदार माणसाने त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेच करू दिला नव्हता. सर्व श्रेय त्यांचे असूनसुद्धा त्यांनी सर्व श्रेय शिक्षकांना दिले होते. सर्वप्रथम शाळेला नमस्कार करून शिक्षक, मुख्याध्यापकांना नमस्कार करून मान्यवर मोत्याचे बोल बोलू लागले. शाळा डोलू लागली. लोकांच्या माना हलू लागल्या, पक्षी उडायचे थांबले, सूर्यही तेथे थबकला, दिवसाढवळ्या चंद्र आला, मंजुळ आवाज आसंमतांत घुमू लागला, गाईढोरे एका जागी थांबली, वेली, झाडे आपल्या पानांवर एक एक शब्द लिहू लागली., रस्तेही याच वाटेवरती येऊन थांबले, खळखळ वाहणारे पाटाचे पाणी शांत झाले, निर्जीव वस्तूही सजीव झाल्या. प्रमुख पाहुण्यांच्या मुखातून शब्दसुमने सांडू लागली. “शाळेची इमारत जरी मी उभारली असली तरी त्याचे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते. ज्यांनी माझ्यासारख्या दगडाला आज देवपण दिले आहे. आणि एक योगायोग म्हणजे शाळेचा वर्धापन दिवस व माझ्या शिक्षिकेचा जन्मदिवस एकच आहे.

असे सोनेरी व्यक्तिमत्त्व म्हणजे माझ्या बाई सौ. रागिणी गौतम लोखंडे. त्या शाळेत बदली होऊन आल्या आणि जणू परमेश्वरच आला. त्या शाळेत येताच शाळेचे रूप पालटले आणि माझ्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. मी ५ वर्षांचा असताना आई, वडिल वारले. आजी आजोबांनी मला व माझ्या बहिणीला सांभाळले. म्हातारे असले तरी ते आमच्यासाठी तरूण होत होते. रात्रंदिवस काम करत होते. पण जड काम म्हातारपण दाखवीत होते. त्यामुळे हाताला काम नाही. कधी काम मिळायचे आणि कधीकधी उपासमार व्हायची. बहीण मोठी असली तरी तिला कामाला नाही पाठवायचे असे मी चौथीत असतानाच ठरवले आणि कुणी सांगेल ते काम मी करू लागलो. वाऱ्यासारखा बेभान धावायचो, एका क्षणात इथून तिथे असायचो. मला सर्व वादळ, तुफान म्हणूनच ओळखायचे, शाळेत वेळेवर जायचो पण शिक्षकांची नजर चुकवून मध्येच पळायचो व नंतर शाळेत हजर व्हायचो, शिक्षकसुद्धा मला कंटाळले होते. मला खूप समजावयाचे पण मी ऐकायचो नाही, मग अतीच झाले तर कधीकधी बेदम मारायचे पण ऐकतो तो सिद्धी कसला? शिक्षा म्हणून माझ्याकडून शिक्षकसुद्धा काम करून घ्यायचे. मी तर ते काम चुटकीसारखे करून टाकायचो. त्यामुळे कधीकधी त्यांना डोक्याला हात लावायची वेळ यायची. आजी आजोबा मला अधूनमधून शाळेत घेऊन यायचे. याला शाळेतच बसवायचे असे शिक्षकांना सांगायचे. अभ्यास करायला सांगितले. नाही केला म्हणून आजी आजोबांना शाळेत आणायला सांगितले की मी शाळेत नाही जायचो. मग शिक्षकच घरी यायचे. आजी आजोबांकडे बघून माझी तक्रार न करताच निघून जायचे.

दिवसामागून दिवस जात होते. कुणीही काहीही काम सांगत होते व मी ते काम करत होतो. अशातच मला गुटखा, बिडी ओढणे ही व्यसनेसुद्धा लागली आणि शिक्षकांच्या डोक्याला मी तापच झालो. मल ते दाखला घेऊन जा अशी धमकीसुद्धा द्यायचे, मात्र द्यायचे नाहीत. अशातच शिक्षकांची बदली झाली अन् मला रान मोकळे झाले.

आता मी काम करायला मोकळा. वाईट कामाचे पैसे सुद्धा चांगले मिळायचे आणि असे काम करून घ्यायला तर ही माणसे आमच्यासारख्या पोरांच्या शोधातच. मग चांगले फावते यांना. पकडलो गेलो तर आम्ही पकडले जाणार. त्यांचे नाव थोडेच खराब होणार? त्यांचे नाव कोठेच येऊ नये म्हणून तर पैसा जास्त मग काय माझ्यासारखा बकरा भेटतोय त्यांना. पण मला समाजाने दिलेले नाव तुफान. मी कसला पकडला जातोय. आता तर मला माझ्या आईवडिलांनी ठेवलेल्या नावाचाही विसर पडला होता. शाळेच्या हजेरीवर आणि माझे आजी-आजोबा प्रेमाने हाक मारायचे तेवढे फक्त माझे नाव नावाला राहिले. शाळेत दप्तर ठेवायचे आणि तेथून पळ काढायचा हा माझा दिनक्रम.

पण दिवस तेच राहात नाहीत तेच खरे. शाळेत नवीन बाई आल्या. बाई फार शिस्तप्रिय, दिसायला लय खडूस, सर्वांची माहिती त्यांनी आल्या आल्या काढली व घरी कोणी राहायचे नाही असे कान धरून बजावलंसुद्धा. सर्व पोरांना, त्यात मीसुद्धा होतो.

सगळे बाईना सांगायचे, बाई सिद्धीपासून सांभाळून बरं का. लय वात्रट पोरगा आहे. वंगाळ वंगाळ खातो. सर्वांना त्रासदायकच आहे नुसता. अन् बाईना वर्गाची व माझी ओळख झाली. बाई खूप कडक. त्यांची नजर चुकवणे म्हणजे तारेवरची कसरत. आता माझी पंचाईत होऊ लागली. मला शाळेच्या वेळेत बाहेर पडणं अशक्य झाले. त्यामुळे हाती पैसे मिळत नव्हते. आता चांगले खायची प्यायची सवय झाली होती पण कडक बाई आल्या आहेत ऐकल्यावर आजी आजोबांना आनंद झाला. बरे झाले शिस्तप्रिय बाई आल्या. आता सद्या सुधारेल असे बोलायचे. पण मी ठरवले शाळा सोडायची. बाईची नजर माझा शोध घेऊ लागली आणि एक दिवस बाई थेट घरापर्यंत आल्या. मी जेवायला बसलो होतो, कसा उठून पळणार? आजी आजोबांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी टपकले. आजी रडू लागली आणि आपल्या मनातले बाईजवळ मन मोकळे करायला लागली. याच्या मायबापाचे स्वप्न होते याने अधिकारी बनावं पण देवाने घेतलं बोलावून दोघांना आणि हा बघा कसा पांग फेडतोय. शिकायचं सोडून इकडे तिकडे मरतोय. बाई काही काही ऐकायला येते याच्याबद्दल पण हा आमचे ऐकतो आहे कुठे? बाई शिकवायचे आहे याला मोठ्ठा माणूस बनवायचे आहे. आजी आजोबा समजावू लागले.

बाई मला तशाच अवतारात शाळेत घेऊन आल्या. परीक्षा सुरू होती, बाईंनी पेपर दिला. सर्व पेपरला हजर राहण्यास सांगितले. मी पेपरात जे शिकलो होतो ते सगळे लिहले, जे आले नाही ते नाही लिहिले, मी नापास झालो. बाई मला काहीच बोलत नव्हत्या. पोरे बाईना अधूनमधून माझ्याबद्दल सांगत होतीच, बाई हा कायबी काम करतो. कायबी गलतसलत खातो. लय वंगाळ वंगाळ पोरांसोबत राहतो आणि पत्ते बी खेळतो. मला वाटायचे बाई मला लय बदडणार पण त्या काही हूं हूं करत होत्या.

एक दिवस मुख्याध्यापक वर्गात आले. नापास मुलांची यादी मागितली. आता म्हटले हा मुख्याध्यापक आता मला शाळेतून बाहेर काढेल पण बाईंनी सांगितले, माझ्या वर्गात कोणीच नापास नाही. तेव्हा सगळे माझ्याकडे बघू लागले, बाई फक्त हसल्या. शाळा सुटताना बाई म्हणाल्या, ‘सिद्धी, शाळेतील मागची खोली आहे. ती आपण साफ करूया. तू उद्या ये.’ मला वाटले शिक्षा असेल.

मी दुसऱ्या दिवशी १० वाजता शाळेत गेलो. बाईंनी खोली साफ केलेली होती. मी म्हटले मला कशाला बोलावले बाई? बाई डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, ‘हे बघ सिद्धी,, आणि मला माझे नाव त्यांच्या तोंडातून ऐकत राहावेसे वाटले. त्यांच्या डोक्यावरील ठेवलेल्या हाताने बाई माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या.

त्यांनी माझे डोळे पुसले आणि म्हणाल्या, ‘आपल्यापासून जर देवाने आपले आईवडिल हिसकावून घेतले तर आपण त्यांना परत आणू शकत नाही. पण आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद देव नक्कीच आपल्यापर्यंत पोहचवू शकतो. तू जर तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केलेस तर त्यांचे आशीर्वाद तुला नक्कीच कोणत्याही रूपात मिळत राहतील.’ आता मात्र माझा चेहरा फुलला. ‘खरे सांगताय बाई. तुमचे बोलणे असेलही खरे पण माझ्याकडे पैसा नाही. मी कसा अधिकारी होणार?’ बाई बोलल्या, ‘तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद तुला मदत करेल, पण सोबत तूला खूप अभ्यास करावा लागेल. खूप मेहनत घ्यावी लागेल. वाईट सवयी सोडाव्या लागतील. करशील का एवढं फक्त आपल्या आईवडिलांसाठी आणि मी लगेच हो म्हणालो आणि बाईंना तसे वचनही दिले. आता मी दररोज शाळेत जायला लागलो.

माझ्या आईबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाई आता माझ्यासाठी व शाळेतील सर्व गरीब मुलांसाठी मोठमोठ्या संस्थांची, एन. जी. ओ.ची मदत घेऊ लागल्या. जिथून मदत मिळेल तिथे जाऊ लागल्या. शाळेसाठी मुलांसाठी मदत मागू लागल्या. आजी आजोबांनासुद्धा बाईंनी निराधार भत्ता मिळवून दिला. ताईला मुलींच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि शिकण्याची सोय करून दिली.

बाई रात्रंदिवस कष्ट करत होत्या. आम्हा सर्वांना दिसत होते. खरेच देवाचा आशीर्वाद होत्या बाई. आठवीच्या वर्गात मला व परीक्षेत बसलेल्या सर्व मुलामुलींना बाईंच्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती मिळाली. आता माझा अभ्यासातील प्रगतीचा डोंगर वाढू लागला. गावासाठी सुद्धा बाईंनी खूप काही योजना आखल्या. बाई आता सर्वांच्या गळ्यातील ताईत झाल्या होत्या. पण म्हणतात ना ‘दैव देते अन् कर्म नेते.’ असे काहीसे झाले आणि कालपर्यंत एकही दिवस सुट्टी न घेतलेल्या बाई आज अचानक शाळेत आल्या नाहीत. सर्वांच्या नजरा बाईंना शोधू लागल्या. मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मुख्याध्यापक म्हणाले, बाईंची बदली झाली.

अभ्यासात दंग झालेला मी बाईंची चौकशी करू लागलो. मला एकटे एकटे वाटू लागले. एक दिवस शाळेत माझ्या नावाची चिठ्ठी बाईंची होती. मला खूप खूप आनंद झाला. चिठ्ठीत लिहिलेले होते,

‘सिद्धी, कसा आहेस बाळ, स्वत:ची, आजी आजोबा व बहिणीची काळजी घे आणि आज मला एक वचन दे. तू तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करशील आणि जर तू मला वचन देत असशील तर चिठ्ठीत हो असे लिही.’

आता माझ्या मनात अनेक विचार आले. बाईंनी चिठ्ठी का पाठवली. बाई स्वत: का आल्या नाहीत. अशातच फोनची बेल वाजली आणि मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी जाहीर केली.

सर्व शिक्षक, विद्यार्थी परिपाठाच्या ठिकाणी एकत्र आले आणि मुख्याध्यापकांनी सांगितले, आपल्या शाळेतील शिक्षिका सौ. रागिणी गौतम लोखंडे मॅडम यांना दोन महिन्यापूर्वी कर्करोग असल्याचे वैद्यकीय चाचणीत निदान झाले. कर्करोगाने त्यांच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना देव आपल्यापासून दूर घेऊन गेला. बाईंना ठीक १ वाजता देवाज्ञा झाली. त्या पाच दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट होत्या. त्यांची अशी इच्छा होती की, मुलांपासून ही गोष्ट लपवावी. परीक्षेचे दिवस आहेत. त्यांना समजले तर ते माझ्यासाठी परीक्षाही देणार नाहीत. त्यांना सांगा माझी बदली झाली आहे. माझी तब्येत चांगली झाली आणि शरीराने साथ दिली तर शाळेत येईन. पण काळाने कधीही परत येता येणार नाही अशा ठिकाणी आपल्या बाईंची बदली केली.

संपूर्ण शाळा रडू लागली आणि मी तर बेभान होऊन रडू लागलो. पण भानावर येत मोठ्या अक्षरात ‘हो’ असे लिहिले.

आज तीच चिठ्ठी साहेबांनी सोन्याच्या फ्रेममध्ये तयार करून आणली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. कारण शाळेत प्रमुख पाहुणे होते ‘त्याच शाळेतील विद्यार्थी श्री. सिद्धी सोमनाथ इंगळे’ आणि शाळेतील प्राथमिक विद्यालयाला साहेबांनी नाव दिले, ‘सौ. रागिण गौतम लोखंडे.’

प्रमुख पाहुणे बोलता बोलता तेथील मुआयख्याध्यापकांच्या पायावर नतमस्तक झाले चिमुरड्यांसोबत पुन्हा कार्यक्रमात रमले.

– सौ. कुंदा विकास झोपे


उल्हासनगर-४, जि. ठाणे
मो. ९९६०४६८३९ 

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..