नवीन लेखन...

कोकण : मराठा आरमाराची भूमी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला.

भौगोलिक महाराष्ट्रातला समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश म्हणजे कोकण. कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. इथले दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सान्निध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोक शरीराने काटक होते. शिवपूर्वकाळात मुस्लिम सत्ताधीश त्यांना आपल्या सैन्यात आवर्जून भरती करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मावळ्यांना एकत्र करून मराठा साम्राज्य उभारले. सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. राजांचं पश्चिम किनारपट्टीवरील आरमारी सामर्थ्य अभ्यासताना, कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग पानलोपावली जाणवतो. प्रस्तुत लेखात आरमारी ‘शिव’सत्तेतील समुद्रीकोकणच्या भौगोलिक प्रभावाचा आढावा घेऊया !

सर्वात प्रभावी आणि जलद प्रवासाची सोय असलेल्या नौकानयनात आपले भारतीय प्राचीन काळापासून निष्णात असल्याचे उल्लेख इतिहासात भेटतात. अर्थात भारतीय राज्यकर्त्यांची नौकानयन परंपरा ही शांतता आणि व्यापाराची होती. प्राचीन लेण्यांमध्ये सागरीप्रवास आणि व्यापाराचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्रातील सातवाहन राजे ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन’ या गौरवास्पद उपाधीने स्वत:ला भूषवित. हजारभर वर्षापूर्वी दक्षिणेतील चोल राजांनी पूर्वआशिया (कंबोडिया-अंकोरवाट) भागात भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केलेला. तद्नंतर समुद्रबंदीसारख्या घातक रूढींमुळे भारतीयांनी समुद्राशी नाते तोडले आणि आपले वर्चस्व गमावले. महाराष्ट्राचा सागराशी असलेला संबंध हा यात्रा आणि अभ्यंगस्नानापुरता राहिला. त्यात समुद्री पर्यटनाचे अनुभव नसायचे. तेव्हा कोकण किनारपट्टी आरमारीदृष्ट्या विकसित नव्हती. इथे गुजरातप्रमाणे खुल्या खोल समुद्रात थेट मार्गस्थ होता येत नसायचे. भौगोलिक मर्यादांमुळे येणाऱ्या अडचणी, साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे इथले लोकजीवन किनाऱ्यालगत 5/7 किलोमीटरच्या परिघाच्या मर्यादेत वावरायचे. दक्षिण कोकणात तर खाड्या आणि खडकाळ भागांमुळे किनाऱ्यालगतचा प्रवास सावधपणे करावा लागे, आजही काही ठिकाणी अशी स्थिती आहे. उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेकडे गोवा सीमेवरील तेरेखोल खाडीपर्यंतची कोकण किनारपट्टी भौगोलिक वैशिष्ट्यांनी युक्त होती. इथली लोकसंस्कृती, माणसांचे स्वभाव, त्यांची वृत्ती, संघर्ष करण्याची मानसिकता हे सारे इथल्या इतिहास आणि भूगोलाचा परिणाम होते. पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा ख्रिस्ताब्द 1498 मध्ये कालिकत बंदरात पोहोचल्यावर इथले किनारवर्ती वातावरण बदलले. वास्को-द-गामा आल्याची नोंद जगाने घेतली, परंतु आपण नाही. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व भारतात अंमलात आणत सागरी सत्तेची फेरमांडणी केली. पुढे डच, फ्रेंच, ब्रिटिशकाळात हा संघर्ष वाढत गेला. या सागरी सत्तांनी बळकट जलदुर्ग आणि शक्तिशाली आरमार उभारले. तेव्हा एकाही स्थानिक भारतीय सत्ताधीशाकडे आरमार नव्हते. भारताचे बादशहा म्हणवून घेणाऱ्या मोगल सत्ताधीशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता, पोर्तुगीजांना फी (कार्ताझ) देऊन विशिष्ट मार्गावर फिरायचा परवाना घ्यावा लागे. हा कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज गलबतांचे कप्तान जहाजांना अडवत. मालमत्ता जप्त करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. पराक्रमासाठी आसुसलेल्या इथल्या मावळ्यांची मोट बांधली. विशेष पूर्वपरंपरा नसताना, कष्टातून, तरबेज आणि अनुभवी विरोधांना धूळ चारून, सागराचे व्यापारी महत्त्व ओळखून पहिलं स्वदेशी सागरी आरमार उभारलं. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापाराची खंडीत झालेली परंपरा सुरू केली. याची मांडणी सचिन पेंडसे यांच्या ‘मेरिटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ या पुस्तकात आढळते.

1648 मध्ये कोकणातील तळे, घोसाळे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा राजांचा सिद्दीशी संबंध आलेला. राजे स्वतः खलाशी किंवा दर्यावर्दी नव्हते. त्यांना आरमारी युद्धतंत्राची माहिती नव्हती. जवळ लढाऊ जहाजेही नव्हती. पाण्यातील किल्ले लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव नव्हता. मोगल आणि आदिलशाहीला भूमीवर शह देत कोकणात आरमार उभारणे सोपे नव्हते. पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज आणि डचांकडून आरमार उभारण्याचे कौशल्य शिकावयास मिळणे अशक्य होते. कोकणातला उंचच उंच सह्याद्री दख्खनच्या पठारापासून वेगळा होता. इथे घनदाट जंगल, अरबी समुद्र, खाड्या, समुद्रातील बेटे आदि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्यांमधील अंतर कमी राहाणार होते. याचे लष्करी डावपेचांमधील महत्त्व राजांनी अचूक हेरले होते. कोकणला पश्चिमेकडे समुद्राचे संरक्षण होते. पूर्वेकडूनही आक्रमणाचा धोका कमी होता. स्थानिक सरदारांच्या माध्यमातून वर्चस्व राखणाऱ्या आदिलशाह आणि मोगल बादशाह यांचे कोकणकडे विशेष लक्ष नव्हते. त्यांनी आरमारी सामर्थ्य उभे करण्याचा विचार केलेला नव्हता. पोर्तुगीज, इंग्रज आणि डच आक्रमकांपासून देशाला वाचविण्यासाठी, स्वराज्याला पूर्णत्त्व आणण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यशाली आरमाराची आवश्यकता महाराजांना जाणवलेली होती. भौगोलिकतेचा अचूक फायदा घेत राजांनी जमिनीवर गनिमी कावा तंत्र अवलंबिलेलं. तसं इथे, सागरी सत्तांवर अंकुश मिळवण्यासाठी आरमार आवश्यक होतं. किनारपट्टीवरील अवघड जागी किल्ले बांधणं गरजेचं होतं. या भागात फिरंग्यांचा संपर्क असल्याने शहरांचा विकास झालेला. वादळात सापडलेली जहाजे समुद्रकिनाऱ्यावर फुटत असत. त्यात असलेला माल स्थानिक सार्वभौम सत्तेच्या ताब्यात येत असे. आरमाराच्या दृष्टीने कोकणातील खाड्या जहाजांसाठी उत्कृष्ट आसरा होत्या. समुद्रकिनारी असणाऱ्या कठीण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी उत्तम होत्या. आरमारी संरक्षणाच्या दृष्टीने गिरिदुर्ग आणि जलदुर्गांची बांधणी आणि नवी संरक्षक स्थळे निर्माण करण्यासाठी किनारपट्टीवरील बेटे आणि समुद्रापर्यंत घुसलेले डोंगरसुळके मोक्याच्या जागा पुरवायला सज्ज होते. हे आरमारी महत्त्व लक्षात आल्याने राजे कोकणात शिरायची संधी शोधत होते.

जानेवारी 1656 नंतर औरंगजेब, बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. विजापूरला अली आदिलशाह मरण पावला होता. या काळात राजांनी जावळी जिंकली. दाभोळवर भगवा फडकवला. तेव्हा कोकण किनारपट्टी निरनिराळ्या राज्यात विभागलेली होती. प्रजा अत्याचारांनी त्रस्त होती. सह्याद्रीतील डोंगररांगांच्या माथ्यावर उभे राहिलेल्या राजांना सागराच्या भव्यतेचे दर्शन झालेले. त्यांनी वेश पालटून कोकणपट्टीची पाहाणी करून घेतली. 1657 ला ते उत्तर कोकणात उतरले. त्यांनी कल्याण, भिवंडी परिसर जिंकला. आता जिंकलेला समुद्रकिनारा आणि मुलुखाच्या संरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता होती. आरमारी उभारणीस आवश्यक नौका भर समुद्रात बांधता येत नाहीत. त्यासाठी लष्करीदृष्ट्या उपयुक्त अशी समुद्रातून आत घुसलेली खाडी आणि तळ कोकणच्या या भौगोलिक किनारपट्टीत मुबलक होतेच. 1657 ला कल्याणजवळील दुर्गाडी येथे उत्तम प्रतीचे सागवान वापरून पहिली 20 जहाजे आणि लढाऊ गलबते बनविण्यास राजांनी सुरुवात केली. पुढच्या काळात राजांच्या आरमारात गाब्र (गुराब-तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज), तरांडी (माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करणारी नाव), तारव आणि गलबत (जलद चालणारे जहाज), शिबाड (मालवाहतूक करणारी व्यापारी जहाज), तिर्कटीतारू, मचवा, पडाव, होडी, डोण, पगार आदि प्रकार राहिले.

राजांनी कल्याणची ही जबाबदारी सेनापती आबाजी सोनदेव यांच्यावर सोपविली. कामात आपल्या स्थानिक लोकांचा समावेश असणं लाभदायक ठरलं. जहाजांसाठी लागणारं लाकूड, कारागीर उपलब्ध होते, पण तंत्रज्ञान नव्हतं. हे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी वसईत तारवे बांधणारे कुशल पोर्तुगीज खलाशी लैतांव व्हियेगस आणि त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगस यांची मदत घेतली. त्यांच्यासोबत 340 माणसं कार्यरत होती. आपल्या स्थानिक कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं हा यातला मुख्य हेतू होता. तसं राजांनी आबाजींना, ‘जी माणसे या कामावर नियुक्त कराल ती अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची हवीत, जी ते ज्ञान आत्मसात करू शकतील’ असं सांगितलं होतं.

पोर्तुगालचे मुख्यालय असलेल्या गोव्यात मराठा आरमार उभारणीची ही वार्ता पोहोचल्यावर गडबड होण्याचा धोका होता. अल्पावधीत तसं घडलं. 2 महिन्यांनी व्हेगास नोकरी सोडून गेला. अर्थात तोवर मावळे बरेचसे शिकले होते. राजांनी आपल्या जहाजांचे डिझाईन युरोपियन प्रमाणे न करता कोकणच्या भौगोलिकतेला अनुसरून केले. तेव्हा युरोपियन जहाजे खोल पाण्यात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बांधण्यात येत. त्यामुळे त्यांच्या पाण्याखालच्या तळाची खोली अधिक असायची. राजांची जहाजं ही किनारपट्टीच्या आसपास अधिक वावरणार होती. त्यांनी आपली सुरुवातीची जहाजं छोटी आणि सरळ तळ असलेली, वेगाने किनारपट्टी जवळ पोहोचतील अशी बनविलेली. यामुळे राजांचे आरमार शत्रूंना आव्हान देऊ लागले.

नौकाबांधणी, समुद्र, वारा, खगोलशास्त्र, नाविक रणनीती आदि ज्ञान शिकायला एकेक जन्म पुरायचा नाही हे वास्तव असताना राजांनी हे सारे जुळविले. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ ग्रंथातील, ‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ या वाक्यात मराठी आरमाराच्या प्रेरणेचे गुपित सामावले आहे. राजांना आरमारी, जहाज बांधणीज्ञान संपादन करण्यासोबत नौकाबांधणी, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडणारे जलदुर्ग बांधणे, माणसे प्रशिक्षित करणे आदि गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्यांनी पुढे आरमाराच्या वेगवेगळ्या तुकड्या बनविल्या. प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारची 200 जहाजं असायची. इथल्या भौगोलिकतेचा वापर करीत थेट खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी द्यायचे तंत्र वापरले. मोठी जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत असता शत्रू समोर आल्यास एकत्र येऊन झुंजायचे आणि वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास व गलबत योग्यरित्या चालवता येत नसल्यास शत्रूशी झुंज न देता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे, असे युद्धतंत्र होते.

राजे स्वतः शिस्तप्रिय असल्याने, आधुनिक प्रशासनाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवस्थेत दिसतात. नीती-नियमांचे काटेकोर पालन केले जाई. वर्षाचे 8 महिने राजांचे आरमार खुल्या समुद्रात असायचे. पावसाळ्याचे 4 महिने ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित ठेवले जायचे. हे काम समुद्राला उधाण येण्याच्या 10-15 दिवस आधी व्हायचे. जहाजे खुल्या उथळ समुद्रात किंवा जलदुर्गाच्या खाली उघड्यावर नांगरून ठेवता येत नसत. छावणी दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात होई. एकाच बंदराच्या आसपासच्या गावांना अधिक कष्ट पडू नयेत, हे त्यामागचे कारण होते. नाविकांना पावसाळ्याचे 4 महिने शेतीत काम करावे लागे. आरमारात पठाणासोबत कोकणातील कोळी, सोनकोळी, आगरी, भंडारी, दादली, कोकणी मुस्लिम आणि कर्नाटकातील अंबी समाजाचे नाविक असत. या लोकांना समुद्र संचाराचे ज्ञान होते. गावाने प्रत्येकी 100 माणसांमागे 2 माणसे आरमाराला द्यावीत अशी मागणी असे. राजांच्या आरमारात 5 हजार लोक होते. सागरी युद्धाच्यावेळी जलदुर्गांमधून आरमाराला युद्ध साहित्य पुरवण्यात येई. युद्धकैदी ठेवण्यासाठी जलदुर्गांचा उपयोग होई. जलदुर्गांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली जहाजे शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहात. नजीकचा परिसर, किनारपट्टी, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे होई. किल्ल्यांवरील सैन्य आणि तोफांमुळे समुद्रात आणि नदीत येऊ पाहणाऱ्या जहाजांना परवून लावता येत असे. राजांचे किल्ले उघड्या मैदानात किंवा सपाटीवर अभावाने आढळतात. भौगोलिकतेचा अचूक उपयोग करून नैसर्गिक बळकटी, अभेद्यता, जलसंचय आणि संरक्षण यांचा विचार येथे दिसतो. सिद्धीचे सामर्थ्य त्याच्या जहाजात होते. त्याचे आरमार दीडशे वर्ष जुने होते. तरीही राजांनी शून्यातून आपले आरमार उभारून त्याला सर्व शक्तीनिशी झुंज दिली. महाराज समुद्राकडे वळले नसते तर कदाचित सिद्दीशी संघर्ष करण्याचा प्रश्न आला नसता. परंतु स्वराज्याचे ध्येय त्यांनी तडीस नेले. आरमाराच्या जहाजांसाठी लागणारं लाकूड रयतेला त्रास न देता उपलब्ध झालं पाहिजे याबाबत राजे दक्ष होते. जहाज बांधणीस कमी पडलेली आंबा, फणसाची लाकडं त्यांनी कर्नाटकातूनही मिळवलेली. महत्त्वाच्या जहाजांसाठी बंदुकीच्या आणि तोफेच्या गोळ्यांपासून बचाव करणारे महत्त्वाचे लाकूड म्हणून ते सागवानाचा उपयोग करीत. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे राजांची 10 हजारावर फौज होती. 1674 च्या मे महिन्यात, लष्कराच्या छावणीला त्यांनी दिलेले पत्र, ‘आदर्श राज्य कसं असावं?’ याचं उत्तम उदाहरण आहे. ‘राई म्हणजे वनराई’ तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित राजांनी चलनी नाण्यांना ‘शिवराई’ संबोधलं असावं. पुण्याजवळच्या ‘शिवापूर’ गावात राजांनी दाट वनराई सजवली होती. राजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केली. पुढे इंग्रजांनी ते तोडले. आजही बाणकोटला काही साग दिसतात.

राजांनी सिद्दीची इतर ठाणी जिंकली तरी, चौल (उत्तर) आणि दाभोळ (दक्षिण) या दोन प्राचीन बंदरांच्या मधोमध वसलेला जंजिरा जिंकणे आरमारासाठी आवश्यक होते. त्यासाठी प्रबळ आरमार आणि आर्थिक सामर्थ्य आवश्यक होते. म्हणून 1664 मध्ये सुरत लुटण्यात आली. 1613 साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’शी राजांच्या आरमाराशी ईस्ट इंडिया कंपनीच्या मरीनला लढावे लागले. सुरतेतून मिळालेल्या धनाचा उपयोग करून राजांनी 25 नोव्हेंबर 1664 ला सिंधुदुर्ग उभारण्याचे काम सुरु केले. राजांच्या हस्ते पायाभरणी झालेला तिथला दगडही आज भौगोलिकदृष्ट्या ‘मोरयाचा दगड’ नावाने प्रसिद्ध आहे. 8 फेब्रुवारी 1665 ला आपल्या आरमाराचा उपयोग करत राजांनी आदिलशाही राज्यातील धनाढ्य बंदर बसरूरवर स्वारी केली. हे जोखमीचे काम अभ्यासल्यावर राजांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहाते. 29 मार्च 1967 ला सिंधुदुर्गचे काम पूर्ण झाले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये म्हणून राजांनी येथे 2 सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. जंजिरेकर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा राजांच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर दुसरी राजपुरी वसवावी लागेल हा विचार करून त्यांनी मालवण नजीकच्या कुरटे बेटावर सागरीदुर्ग बांधायचा निर्णय घेतला. या कुरटे बेटाजवळील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक होते. बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील होते. राजांनी तेथे गड बांधायचे निश्चित केले. गडावर चोहोबाजूंनी खारेपाणी असताना दहीबाव, साखरबाव आणि दूधबावची उपलब्धी, सुमारे 40 शौचकूपांचे बांधकाम तिथल्या भौगोलिकतेचा उपयोग स्पष्ट करते. यानंतर राजांनी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, सुवर्णदुर्ग बांधला. विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून संपूर्ण कोकण किनारपट्टी नियंत्रणाखाली आणली. हर्णे बंदरातील बेटावर 1663 मध्ये बांधलेला सुवर्णदुर्ग हा राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजा भोज याने 1195 ते 1205 मध्ये बांधलेला किल्ला. आरमारी महत्त्व ओळखून राजांनी तो जिंकून घेतला. या भागातले भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे विजयदुर्गजवळची खडकात खोदलेली 355 फुट द 227 फुट आकाराची गिर्ये गोदी होय. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार 500 टनी जहाज येथे सहज बांधता येत असावे. अर्थात राजांकडील सर्वाधिक जहाज 250 टनी होते आणि 150 टनी जहाजे अधिक बांधली जात. विजयदुर्गपासून 150 मैल अंतरावर पश्चिमोत्तर समुद्रतळातील 400 मीटर लांबीची तटबंदीही भौगोलिकतेचे दर्शन घडवते. ज्या भागात ही तटबंदी आहे त्या बाजूने येणारी अनेक जहाजे शिवकाळात, धडकून फुटून गेल्याची नोंद आहे. हे कशाने घडते ? याचे कोडे पोर्तुगीज आणि इंग्रजांना पडायचे. विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथे राजांनी पश्चिमोत्तर समुद्राच्या तळात ही संरक्षक तटबंदी उभारल्याचे किंवा ती शिलाहारांच्या काळात बांधली गेली असावी असे म्हटले जात असले तरी संशोधकांच्या म्हणण्यानुसार ती भिंत नैसर्गिक आहे. पुण्याच्या डेक्कन पुरातत्त्व संस्थेचे निवृत्त संशोधक डॉ. अशोक मराठे हे  कोकण किनारपट्टीवर पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीचा अभ्यास करत असताना त्यांना केळशी-हरिहरेश्वर ते विजयदुर्ग दरम्यान किनारपट्टीलगत एक रेष आढळून आली होती. ही दगडी भिंत असल्याच्या प्राथमिक अंदाजानंतर डिसेंबर 2009 मध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्यात पाणबुडे उतरवले. तेव्हा ही भिंत 8 हजार वर्षे पुरातन असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजचे संशोधक सहायक सचिन जोशी यांनीही ‘मिथ्स अँड रिअ‍ॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अ‍ॅपट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर करताना, ‘विजयदुर्ग किल्ल्याजवळची समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे’ असे म्हटले होते. नंतरच्या काळात आंग्रेंनीही याच भागात समुद्रातील टेकडी ‘आंग्रे बँक’ शोधली. अर्थात या साऱ्या भौगोलिकतेचा उपयोग सुरुवातीच्या काळात राजांनाही झाला.

इंग्रजांनी 26 नोव्हेंबर 1664 ला ईस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या एका पत्रात, ‘शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठविली आहेत.’ असे लिहिले होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार, 1665 मध्ये मराठा आरमारात 85 लढाऊ आणि 3 उच्च दर्जाची जहाज होती. पोर्तुगीज विजरई कोंदि द सांव्हिसेति याने राजांच्या आरमाराविषयी 1667च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास, ‘शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते. त्याच्याविरुद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावर किल्ले बांधले. आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत’ असे कळविले होते. संपूर्ण राजवटीत तारवांमधून (संगमिरी) स्वारी करणारे राजे कदाचित एकमेव असावेत. राजांनी 1670 मध्ये नव्याने 160 जहाजांची बांधणी नांदगाव (कुलाबा) येथे केली. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावरील संगमेश्वरजवळच्या ओझरखोल (निढळेवाडी) येथेही राजांनी नौकाबांधणी सुरू केली होती. छत्रपतींच्या आरमारातील प्रसिद्ध ’संगमेश्वरी’ नौका इथली. शिवकालीन नौकाबांधणीची ही तंत्रपरंपरा आजही सुरू आहे. चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीवरील गोविंदगड हा दाभोळ खाडीतील आरमाराला निरोप पोचविणे, तेथून येणारे निरोप स्वराज्याची राजधानी रायगडावर पोचविणे या कामातील दुवा म्हणून काम करायचा. रायगडावर विशिष्ट ठिकाणी आग पेटविल्यावर गोविंदगडाच्या समोरील सह्याद्रीतून ती दिसायची. रायगडावर पेटविलेली आग पाहून गोविंदगडावर खुणेची आग पेटविली जाई. याद्वारे फार थोड्या वेळात राजधानी रायगड ते मराठा आरमार यांच्यात संदेशाची देवाणघेवाण होई, इथे आपल्याला भौगोलिक महत्त्व दिसून येते. राजांनी या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रावर जरब बसवित सागरी व्यापार सुरू केला. समुद्राला पश्चिमेकडील नद्या जिथे मिळत तिथे बंदरे होती. त्यातूनही वाहतूक चाले. खास मिठाच्या (सॉल्टफ्लीट) वाहतुकीसाठी राजांनी गलबतांचा तांडा तयार करून घेतला होता. 1665 च्या सुरतकर इंग्रजांच्या पत्रानुसार, दरवर्षी दक्षिण कोकणातील 7/8 बंदरातून राजांची 2/3 गलबते पर्शिया, बसरा, आणि मोक्का (अबेसॅनिया) बंदरात व्यापारासाठी जात. परकीय सत्तांशी व्यापार करताना राजांनी आयात कमी आणि निर्यात जास्त हे वाणिज्य अनुकूल धोरण अवलंबिले होते. कोकण आणि घाट जोडणारे घाटमार्ग हे व्यापाराचे राजमार्ग होते. त्या मार्गांवर उभारलेले किल्ले चेकपोस्टचे काम करायचे. 1669 पर्यंत गोवा, वसई, मुंबई ही मोठी समुद्री शहरं वगळता सगळं ताब्यात घेतलं. आरमाराला एक सुसंघटित आणि फायदेशीर संस्थान बनवलं. या आरमाराने पुढे जवळपास 150 वर्ष राज्य केलं.

राजांनी मुरुड-जंजिऱ्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) बांधला. या पद्मदुर्गच्या भिंतींचे दगड झिजलेत पण दरजा भरलेला चुन्याचा मसाला झिजला नाही. मुंबईजवळ खांदेरी बंदरावरच्या बेटावर 1672 मध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. तत्पूर्वी या बेटांवर युरोपियन लोकांना गोड्या पाण्याची सोय करणे जमले नव्हते. राजांनी आपल्या संस्कृतीतील ज्ञानाच्या आधारे येथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. कामास विरोध करण्यासाठी इंग्रजांनी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे ठरवले. त्यांना आपल्या मोठ्या जहाजांचे विशेष महत्त्व वाटत होते. त्यामुळे कोकणातला उथळ समुद्र आणि खाड्यांचा विचार करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांच्या मोठ्या जहाजांना खाडीमध्ये ठिय्या देणे जमले नाही. वाऱ्यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात. त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना जहाजे खोल पाण्यात न्याव्या लागत. उथळ पाण्यात मराठ्यांच्या छोट्या बोटींविरोधात इंग्रजांच्या बोटी जिंकू शकल्या नाहीत. राजांनी आपले आरमार आपल्या हद्दीत वावरणारे केलेले. मराठे लोकं रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत विविध बेटांवर सामान पोहवत. इंग्रज जहाजे पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असत. खांदेरीच्या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलई वारे आदींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. खांदेरी उभारताना आजूबाजूला मोठाले दगड टाकण्यात आले. त्याच्यावर कालवे वाढून दगडाच्या कडा धारधार होतील. पायाला इजा होऊन त्यास सागराचे खारेपाणी लागताच आग होईल आणि पोहोचणं अवघड बनेल अशी योजना होती. जवळचा काशाखडक ते खांदेरी हा सागरी प्रवास खडकाळ आहे. तिथे पाण्याला उलट-सुलट प्रवाह असून अचानक बदलणारे वातावरण अशी त्या सागरीपट्ट्याची आजही भौगोलिक ओळख आहे. 1678 ला कुलाबा किल्ल्याचं काम सुरू झालं. मोठाले दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधण्यात आल्या. चुन्याने दरजा भरल्या नाहीत. समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळल्या की त्यांचं पाणी दोन दगडांच्या फटीतून आत जावं आणि पाण्याच्या प्रवाहाचा रोध कमी व्हावा, हा विचार भौगोलिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीतल्या समुद्री कोकणाला राजांनी आरमारी उभारणीने बळकट बनवले. त्यांनी जमिनीवरील युद्धात जसा सह्याद्रीतले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले आदि भौगोलिकतेचा पुरेपूर वापर करून घेतला तसाच आरमारी युद्धात किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेचा उपयोग केला. स्वराज्य निर्मितीसाठी निष्ठावान मावळ्यांप्रमाणे सह्याद्री, सागराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. राजांच्या आरमाराविषयी जेम्स डग्लस म्हणतो, ‘शिवाजी जन्माने खलाशी नव्हता, ही त्या ईश्वराची कृपा होय. जर असता तर जशी त्याने भूमी पादाक्रांत केली त्याप्रमाणे सागरावर आपला अंमल गाजवला असता. खलाशी नसताना त्याने सागरावर आपले वर्चस्व स्थापन केलेच.’ सह्याद्री आणि सागराच्या या इतिहासात मानवी सामर्थ्याला अपयशी करण्यास निसर्ग आणि भौगोलिकता कारणीभूत ठरल्याचे दिसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य आणि आरमार उभारण्यापासून कोणालाही रोखता आलं नाही.

-धीरज वाटेकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..