नवीन लेखन...

कोकणातील बोली भाषांचे सौदर्य

प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे.


आपण नेहमीच म्हणतो की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक प्रांतातील लोकांच्या चालीरिती, पेहराव, जेवण-खाणे तसेच बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक विविधता ही विपुल आहे. आपल्याच राज्यापुरता विचार केल्यास वेगवेगळ्या प्रदेश, जिल्ह्यातही कितीतरी विविधता आहे. छोट्याशा कोकण प्रदेशाचा विचार केला तर, डोळ्यासमोर येते ते तेथील अप्रतिम निसर्गसौंदर्य. तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या पश्चिमेचा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास केवळ सात जिल्हे असलेला प्रदेश. पण या सात जिल्ह्यातील लोकांच्या चालीरिती, जेवणखाणे, पेहराव, रहाणीमान आणि बोलीभाषेत बराच फरक आढळतो. कोकणी या नावाने ओळखल्या ज़ाणाऱ्या अनेक बोली आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातली आगरी, कोळी, वाडवळ, कादोडी, ईस्ट इंडियन, साल्सेती, बाणकोटी, वारली, कोकणा, कातकरी, रत्नागिरी जिल्ह्यातली बाणकोटी, संगमेश्वरी, चित्पावनी आणि सिंधुदुर्गातली मालवणी. प्रत्येक जिल्ह्याला आपली अशी एक किंवा अनेक बोली आहेत आणि प्रत्येक बोलीभाषेचे सौंदर्य वेगळे आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा विचार केल्यास येथे फार पूर्वी कोळी, आगरी, भंडारी आणि पाठारे-प्रभू यांची वस्ती होती. यातील कोळ्यांची कोळी बोली. कोळी भाषेत बहुतेक सर्वांचा एकेरी उल्लेख केला जातो परंतु तरीही ती ऐकताना खटकत नाही, छान वाटते. पूर्वी या बोलीतील, ये दादा आवर ये, येव्हरा मोठ्ठा लावलाय वाटा….. हे व अशी काही गाणी प्रसिद्ध होती. आगऱ्यांची आगरी बोली तर भंडारी व पाठारे-प्रभू यांची मराठी बोली पण त्यातही फरक होता. पाठारे प्रभूंची प्रमाण मराठी तर भंडारी समाजाची सर्वसाधारण मराठी. आज मुंबईची भाषा मराठी असली तरी महाराष्ट्रासह विविध राज्यातून काम-धंद्यासाठी आलेले लोक आपापल्या नातेवाईकांमध्ये व समाजात आपापली बोलीभाषा तर इतर ठिकाणी मराठी, हिंदी वा इंग्रजी भाषेचा वापर करतात. मुंबईप्रमाणेच विस्तार होत गेलेला जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा. येथेही मुंबई प्रमाणेच बोलीभाषा बोलल्या जातात. वांद्रे आणि पुढील परिसरात काही समाजात साल्सेती बोलीभाषेचाही वापर होतो.

ठाणे जिल्ह्याचे मुख्यत: शहरी व ग्रामीण असे दोन भाग पडतात. शहरी भागात मुंबईप्रमाणेच मराठी, हिंदी व इंग्रजीचा वापर होतो तर ठाण्याचा मोठा भाग असलेला ग्रामीण भाग हा आदिवासी पाडे असलेला, गावे दरी डोंगऱ्यात वसलेली असा आहे. यातील ठाकर जमात आपली ठाकरी बोली बोलतात तर धोडिया समाजाचे लोक गुजराती आणि थोडाफार आदिवासी बोलीचा वापर करतात. काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झालेल्या पालघर जिल्ह्यात वारली आदिवासी, कोकणा आदिवासी विशेषत: डोंगरी भागात तर आगरी व कोळी यांची वस्ती किनारपट्टीला आहे. यातील वारली आदिवसी हे वारली बोली तर कोकणा आदिवासी कोकणी बोलीचा वापर करतात तर आगरी, कोळी आपापली बोलीभाषा बोलत असले तरी त्यात खूप वैविध्य आहे. येथील कुपारी समाज कादोडी बोली बोलतात तर वसईपासून डहाणूपर्यंतचे हिंदू कोळी मांगेली बोलीभाषेत बोलतात, उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते. या बोली मराठी असल्या तरी त्या बोलीभाषेस अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीस त्याचा काही उलगडा होत नाही. कोकणातील या दोन जिल्ह्यातच बोलीभाषांमध्ये किती वैविध्य आहे.

रायगड जिल्ह्यात आगरी व कोळी समाजाची वस्ती जास्त आहे. ते आपापल्या बोलीभाषा बोलतात तर इतर समाजाचे लोक बहुतांशी मराठी भाषा बोलतात. अर्थातच ती मराठी असली तरी बोलण्याची लकब किंचित वेगळी असते. रत्नागिरी जिल्ह्यातील  बऱ्याच तालुक्यात बाणकोटी बोली बोलली जाते. यातही तालुका – तालुका किंवा जाती – जातीतील बोलीभाषेत थोडाफार फरक आहे. खोत मराठा समाज आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या बाणकोटी बोलीभाषेत बराच फरक आहे. बाणकोटी बोलणारे वाक्यातील शेवटचा शब्द थोडा ताणून आणि प्रश्नार्थक बोलतात. बाणकोटी बोली ऐकताना खूप विनोदी बोली वाटते त्यामुळे ऐकताना छान वाटते. म्हणूनच अलिकडे विनोद निर्मितीसाठी काही वाहिन्यांवरील कार्यक्रमात तिचा वापर होतो. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील पठारी प्रदेशातील लोक बाणकोटीपेक्षा वेगळी – ’तुम्हास….आम्हास…’ अशी मराठी भाषा बोलतात आणि सागर किनाऱ्या जवळील लोक तर मालवणी बोली बोलतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मालवणी बोली बोलली जाते अर्थात प्रत्येक तालुक्यातील लोकांच्या बोलण्याच्या लकबीत थोडाफार फरक आढळतो. मालवणी बोली ऐकणाऱ्याला गोड, मधुर वाटत असल्याने ती मालवणेतर लोकांनाही फार आवडते. कोकणात  विशेषत: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देवाला गार्‍हाणे घालायची, आपले म्हणणे सांगायची विशिष्ट पद्धत आहे. ही गार्‍हाणी ऐकतानाही खूप गंमत वाटते. प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. त्या तिन्ही बोलीभाषा ऐकताना भारी वाटतात. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे तशीच ती विविध बोलीभाषेंचीही खाण आहे. कोकणातील या पिढीजात चालत आलेल्या विविध बोलीभाषा आजही ग्रामीण भागातील माणसांनी टिकवलेल्या आहेत. नोकरी- धंद्यानिमित्त शहरात राहणारी कोकणी माणसे त्यांच्या बोलीभाषा बोलतातच असे नाही. त्यांनी आपल्या बोलीभाषा बोलल्या पाहिजेत तरच त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत जातील. मुंबई, ठाणे वा अन्य शहरात जन्मलेल्या कितीतरी कोकणी मुलांना त्यांच्या बोलीभाषा बोलता येत नाहीत ही आजची परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे कालौघात प्रत्येक बोलीभाषेतील कितीतरी शब्द न वापरले गेल्याने नष्ट होत आहेत, मृत पावत आहेत हे त्या त्या बोलीभाषेसाठी घातक ठरणारे आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त बोलीभाषा असल्या तरी रत्नागिरीतील बाणकोटी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलीभाषा अधिक प्रसिद्ध आहेत. बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहेच पण या दोन्ही बोलीभाषेतील कार्यक्रम विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असतात. त्यातही मालवणी बोलीभाषेतील मालिका व नाटकांना मालवणी प्रेक्षकांबरोबरच इतर मराठी व अमराठी प्रेक्षकांची संख्याही जास्त असते. मालवणी बोलीभाषेतील अनेक नाटके देश विदेशात लोकप्रिय ठरलीत.

एखाद्या मातेची जशी वेगळ्या रंग – रूपाची, गुणांची अनेक मुले असतात तशाच या बोली भाषा अनेक असल्या तरी त्यांची जननी मराठीच आहे. आईला आपली सारी लेकरे सुखी, आनंदी, चिरंजीवी असावी अशी इच्छा असते तद्वत या अनेक बोलींची माय मराठीच असल्याने त्या साऱ्या बोली चिरंतन व्हाव्या, त्याचा वापर व्हावा, त्यांचे संवर्धन व्हावे अशीच तिची इच्छा असणार तेव्हा दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करून त्यांचे जतन करण्याची आपली जबाबदारीच नव्हे तर कर्तव्यही आहे.

मनमोहन रेगे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..