कुठेतरी दूर रणरणत्या उन्हाची दुपार असते, ओठ शुष्क करणारे वारे वाहताहेत, मनाला भेदणारा एकाकीपणा आहे… कुठुनतरी सुर कानावर येताहेत… ‘मेरा जीवन कोरा कागज, कोरा ही रह गया…’ किशोरदाचा स्वर हृदयाला भिडणारा. मनातलं कागदावर आणणारे हे जादुई शब्द, पुन्हा मनात घर करून राहतात… राहिले आहेत. अनेक वर्षांपासुन…
आदीम अवस्थेत असणाऱ्या माणसाला लिहिण्याची समज आली तशी तो पानांवर लिहू लागला. भिंतीवर लिहू लागला. आधुनिक माणुस कागदावर लिहू लागला. आजचा माणुस स्क्रिनवर लिहू लागलाय. हे बदल होत गेले आहेत, होत राहणार आहेत. कागदावर जे उमटलं त्याने कागद शहाणा झाला. पांढरा कागद काळा झाला. कागदावर काय नसतं. कागदावर सारंच काही सामावलेलं असतं, नाही का? कागदावर शब्द जन्म घेतात, अन कागदावरच विश्वाची निर्मिती होते. कागदावर नाव लावलं म्हणजे जमिनीचा तुकडा आपला होतो. कागदावर नकाशे उतरतात, योजना तयार होतात, कागदार मेमो येतो, कागदावर ऑर्डर येते, कागदावर बदलीही येते, कागदावर वॉरंट येते, पूर्वी कागदावर तारही यायची अन अनेकांना धडकी भरायची. आता कागदावर दाखला येतो, डिग्री येते, राहिलंच तर सर्टिफिकेटही येते. पूर्वी पत्र यायची घरोघरी, त्यात गोष्टी असायच्या सुख-दु:खाच्या, विचारपुस असायची आपुलकीने आणखी काही काही असायचे. प्रेम पत्रही असायचं कागदावरच… राजकुमारनं पत्र लिहिलेलं, पण मनात भिती.. तरी तो भीत भीत म्हणतोच… ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर, के तुम नाराज ना होना’ प्रेमाची ही तरल भावना उमटली ती देखील कागदावरच. इथे कागद बनला दोन मनांना जोडणारा दुवा.
जसे शब्द अवतरत जातात तसा रंग कागदाला चढत जातो. त्याचा रुबाब बदलत जातो. कागदावर लिहिले असेल ना जिवंतपणाचे दोन शब्द तर तो हयातीचा दाखला बनतो, शब्द जर प्रेमाचे असतील तर कागद गुलाबी होतो, शब्द जर विनंतीचे असतील तर कागद लाचार होतो, शब्द जर आदेश देणारे असतील तर कागद साहेब होतो, शब्द जर प्रमाणीकरणाचे असतील तर कागद डिग्री होतो आणि कागदावर जर ‘मै धारक को… अदा करने का वचन देता हू’ असेल तर तो सत्ताधीश होतो, त्याला वजन प्राप्त होतं. हे वजन इतकं भारी असतं की भल्या भल्यांना ते भारी पडू शकतं. एक आगळं सामर्थ्य या कागदात अवतरतं.
कागदावर काय नाही अवतरतं याचा विचारही आपण करू शकत नाही. कागदावर भाषण अवतरतं, आश्वासन अवतरत. निवडणूकीची घोषणा अवतरते. इतक्या साऱ्या रंगात न्हाऊनही कागदाचा स्वत:चा रंग मात्र कोराच राहतो. तो रंगतो आपल्या शब्दांत, आश्वासनात त्याचे अंतरंग मात्र कोरेच राहते…. कोरा कागज सारखे… कदाचीत तोही म्हणत असेल का मनातल्या मनात… ‘मेरा जीवन कोरा कागज… कोरा ही रह गया…..!’
— दिनेश दीक्षित,
जळगाव
(९४०४९५५२४५)
Leave a Reply