उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात !
वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही. इथला तलमपणा ओ टी टी वरील टिपिकल बीभत्सपणा किंवा उघड उघड लाज आणणारा नाही. फुलपाखरी दिवसांचे मऊ मुलायम चित्रण इथे आहे. एकत्र वाटून एखादा पदार्थ खाणे,दुचाकीवरील सैर, निरोपाचे क्षण आणि विशेषतः डोळ्यांमधून सारं सांगणं /व्यक्त होणं औरच ! विरह तितकाच प्रगल्भ- एकमेकांच्या फोनची अनावर प्रतीक्षा, समोरच्याने पुढाकार घेण्याची इच्छा पण त्या व्यक्तीच्या अभ्यासाची, त्यातील व्यत्ययाची तितकीच काळजी !
राजस्थानच्या वाळवंटातील हे थंड/आल्हाददायक कारंजे – खूप दिवसांनी प्रेमाचं हे हळुवार, अलवार रूप भेटलं. गुलज़ारची एखादी भावभिनी कविताच जणू.
आणखी एक हृदयाला भिडणारा प्रसंग- मित्रांच्या घट्ट मैत्रीतला, भूतकाळ आठवून देणारा ! वैभव पांडे अनिश्चित असताना त्याचा मित्र त्याला म्हणतो- ” घरी फोन लाव आणि बोल.” दुसरा मित्र पटकन ही कल्पना झटकतो आणि म्हणतो- ” काय पण सल्ला आहे, तोही तुझ्याकडून? तू कधी बोलतोस कां /ऐकतोस कां वडिलांचं ? ”
पहिला मित्र विद्ध होऊन म्हणतो- ” बोलतो रे, पण घरच्यांचं माझ्या डोक्यावरून जातं आणि तसं वागता येत नाही. पण हा सर्वस्वी माझा दोष आहे.”
नक्की कोठल्या टप्प्यावर कळत-नकळत मुलं आपल्या पालकांपासून ( मनाने) दुरावतात, त्या नेमक्या क्षणाचं हे हृद्य दर्शन – तरुणपणातील ही ताटातूट (जी शरीराने आधीच आणि अपरिहार्यपणे) झालेली असते, जी प्रत्येकाच्या वाटचालीतील भागधेय असते, ती या कबुलीजबाबातून खाडकन भेटते आणि स्वतःचा भूतकाळ आ ठवतो.
वैभव त्रासून म्हणतो – ” काय बोलू, त्यांना काय कळणार?”
अनुभवाने शहाणा झालेला मित्र एक जुनं सत्य नव्याने सांगतो- ” मित्रा, घरच्यांचे निर्णय तुला पटणार नाही कदाचित, पण त्यांचे इरादे चुकीचे खचित नसतात.”
आणि एक प्रसंग- विद्यार्थीप्रिय शिक्षक “जितू भैय्या ” स्वतःचा कोचिंग क्लास सुरु करतो. त्यांच्या विद्यार्थ्यांची तगमग होते त्या नव्या क्लासमध्ये जाण्याची, स्वतःचा नावाजलेला क्लास सोडून !
एका प्रसिद्ध शिक्षण समूहातून, नव्या संचालिकेने (समूह प्रमुखाच्या मुलीने) समूहातील एका इन्स्टिट्यूटच्या नामवंत संचालकाला ( ज्याने ती इन्स्टिटयूट भारतात नावारूपाला आणली होती) उद्धटपणे (खरं तर मूळ “अनसेरिमोनिअसली” या शब्दाचा हा फार बुळा मराठी भावार्थ आहे) अक्षरशः घालवलं होतं, तेव्हा देशातील त्याच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याला आर्थिक मदत करून नवी शिक्षण संस्था काढायला लावली होती. आणि त्या शिक्षणतज्ञानेही असं एक प्रयोगशील महाविद्यालय उभं केलं जे मूळ शिक्षण समूहाशी अल्पावधीत स्पर्धा करू लागलं. एक चांगला शिक्षक एवढं नक्कीच करतो आणि शिक्षण तज्ञांशी (?) दोन हात करू शकतो.
म्हणजे वेळ आली की गुरुदक्षिणा देण्यात मुलं हात आखडता घेत नाहीत. फक्त “समसमा संयोग ” व्हायला हवा.
सो कॉल्ड संस्थाचालकांना यांतून काय मिळतं ? नेहेमीच त्यांची भाषणे, प्रेझेंटेशन्स अशा नामवंतांकडून तयार करून घ्यायची आणि मग व्यासपीठावर जायचे ही त्यांची खोड असते. तरीही ही मंडळी राजेशाही शिक्षण संस्था काढतात, त्यातून पैसे “पांढरे “करतात. शिक्षण नांवाचे आकर्षक कुरण आहे त्यासाठी- मला माहीत असलेले एक संस्थाचालक मला अभिमानाने म्हणायचे – ” सर, मी बिझिनेसमन आहे, पण इतकी वर्षे मला कोणी फारसे ओळखत नव्हते. पण आता ३-४ कॉलेजेस काढली, लगेच प्रवेशासाठी/ नोकऱ्यांसाठी माझ्यामागे रीघ लागली. त्याहीपेक्षा शिक्षण क्षेत्रात कुठे काही खुट्ट झालं की वर्तमानपत्रवाले /टीव्ही वाले माझ्याकडे बाईट साठी धाव घेतात. माझ्या मुलाखती छापून येतात. तीस वर्षात जी प्रसिद्धी मिळाली नाही ती पाच वर्षात प्राप्त झाली.”
पुण्यातील एक शिक्षण महर्षी (?) प्रामाणिकपणे सांगायचे – ” माझ्या चारही पदव्युत्तर कॉलेजेसमध्ये मी शिकवत नाही. मुळात ही माझी कॉलेजेस- कोचिंग क्लासेस आहेत- बक्कळ फी घ्यायची आणि गॅरंटीड नोकरी मिळवून द्यायची हा माझा धंदा आहे. म्हणून माझ्या ऍडमिशन्स फुल्ल असतात.”
गांवोगांवी अशा फॅक्टऱ्या सुरु आहेत- कोटा त्यातील अग्रणी एवढंच !
बाकी हे सर्वदूर शहरांच्या शरीरात खोलवर पसरलंय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply