महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीत नागपुर जिल्हा नेहमीच अग्रणी राहिलेला आहे.तसं पाहील तर आपल्या राज्यातील प्रत्येकचं जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीत आपापली एक विशेष ओळख आहे.जसं सोलापुरी शेंगा चटणी, कोल्हापुरचा तांबडा पांढरा रस्सा, पुण्याची बाकरवडी,पिठलं भाकरी, मुंबईचा वडापाव, जळगावचे वांग्याचे भरीत पुरी,शेव भाजी, बुलढाण्याची मिर्चीची भाजी भाकरी, अकोला, अमरावती झुणका भाकरी, रोडगे आणि वांगे बटाट्याची भाजी, कढीगोळे, वर्ध्याची डाळकांदा भाजी आणि कैरीची कढी, तसेच वर्धा स्टेशनला मिळणारे मिश्र डाळीचे वडे, शेगावची कचोरी, तशी आमच्या नागपूरची अख्ख्या गवारची भाजी, झणझणीत सावजी चिकन, तसंच स्नॅक्समधे समोसा आणि तर्री पोहा.समोस्याच्या बाबतीत तर नागपुरकरांसारखे चाहते नसतील.आमच्या इथे समोस्याच्या नावाने संपुर्ण ” समोसा हाऊस”च आहे.
गोळाभात करावा तो नागपुरच्या गृहिणींनीच.रसरशीत आणि झणझणीत पदार्थांची सवय खवैय्यांना लावण्यात नागपूरकर एकदम पटाईत आहेत.इथल्या पदार्थांचा चटका एकदा का जिभेला लागला की तो जगाच्या पाठीवरं कुठेही गेला तरी त्याला नागपुरी पदार्थाची सतत आठवणं येत राहणार हे नक्की.काय नागपुरकरं खर आहे ना? खायला काय मिळत नाही नागपुरात? हल्दीरामने तर जगभरं आपल्या शाखा पसरवून नागपूरचे नावं प्रसिद्ध केलेचं आहे हे काही वेगळे सांगायला नको.
आमच्या नागपुरला हिवाळा सुरु झाला की गृहिणींना आणि खवय्यांना वेध लागतात ते कोथिंबीर वडीचे.कोवळा, लुसलुशीत , हिरवा गार कोथिंबीर बाजारात दिसायला लागली की घराघरात कोथिंबीर वड्यांची फर्माईश व्हायला लागते.खरंच हा भन्नाट पदार्थ कोणी बरं शोधुन काढला असेल? ज्याने कोणी शोधला असेल त्या बल्लवाचार्यांना सलाम.दिवाळीनंतर परप्रांतीय जर नागपुरात आले तर लग्नात काय, हाॅटेलमधे काय , आणि घरात काय पुडाची वडी म्हणजेच कोथिंबीर वडी मुख्य मेन्युमधे मानाचे स्थान मिळवून असते.घरच्या गृहिणीला तर ती आपल्या पाहुण्यांना खाऊ घालायचीचं असते शिवाय सोबतीला श्रीखंड किंवा गाजराचा हलवा नक्की असतो. याबाबतीत मी कशी बरं मागे राहील? बाजारात आलेली हिरवीगार कोवळी कोथिंबीर मला खुणावु लागली आणि इतर नागपुरकरांसारखेच मलादेखील पुडाच्या वडीचे वेध लागले. मस्तपैकी दोन की. कोथिंबीर आणली बाजारातून, हो, दोन कीलो कारण माझ्या घरच्या लोकांना खायला घालुन त्या वड्या इतरांनाही द्यायच्या असतात ना म्हणुन आणली हो,आमचं कुठलही काम मोजून मापून नाही. आपलं पोट तुडुंब भरल्यावर दोन चार जणांना सहज पुरेल असं करायचं ही आमची विशेषता.थोडेथोडके जमतंच नाही पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अन्न वाया घालवतो.घरच्या कामवाल्या बाईपासुन तेअपार्टमेंटच्या चौकीदारापर्य॔त नव्या नवलाईचा तो पदार्थ पोहोचलेला असतो.काल तर कोथिंबीर घेतांना मला भाजीवालादेखील म्हणाला की,” एक काकु होत्या त्या आम्हाला दरवर्षीच डब्बाभर कोथिंबीर वड्या खायला आणुन द्यायच्या.” तर मंडळी अगदी सामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत असलेले नागपूरकर या कोथिंबीर वडीवर मनापासुन प्रेम करतात. हिवाळ्यात कमीत कमी दोन तीन वेळा तरी अगदी फेब्रुवारीपर्यंत हा पदार्थ नागपुरात आवर्जून घरोघरी केला जातो, त्याला मी अपवाद कशी बरं असणार?नागपूरात काही ठिकाणी या वडीसोबत कढी देतात परंतु माझ्या घरी मात्र मी कोथिंबीर वडी सोबत एकतर श्रीखंड ठेवते किंवा गाजर बाजारात यायला लागली की गाजराचा हलवा ठेवते. असा काॅम्बो पॅक कोणाला आवडणार नाही? साग्रसंगीत तयारी करुन मीपण कोथिंबीर वड्या केल्या. आता या पुडाच्या वड्यांच एव्हढे गुणगान गायल्यानंतर त्यांचा चेहरा मोहरा दाखवायला फोटो तर काढायलाच हवा नाही का? म्हणजे कसं कमीत कमी तो फोटो पाहुन तरी समोरच्याची रसना जागृत होईल आणि कोथिंबीर वडी करण्याचे हे सत्रं असेच सुरु राहील आणि खवय्येगिरी करणाऱ्यांची पोटं तृप्तं होत राहतील.
–सौ. माधवी जोशी माहुलकरं.
( माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही.)
Leave a Reply