नवीन लेखन...

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

यशोदा वाहिनी ( येसूबाई )….!!

येसूबाई स्वत: क्रांतिकारक नव्हत्या, पण ज्या कुटुंबात त्यांचा विवाह झाला त्या कुटुंबातील तिघे भाऊ स्वातंत्र्यसैनिक होते. सर्वात मोठे गणेश म्हणजे बाबाराव मधले विनायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि धाकटे म्हणजे बाळाराव सावरकर या तिघांचाही स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठा सहभाग होता. येसूबाईंचा जन्म १८८५ साली त्र्यंबकेश्वरच्या फडके कुटुंबात झाला. लग्नापूर्वी त्यांना शिक्षण मिळाले नव्हते. १८९६ साली त्यांचा बाबाराव सावरकरांशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दीराने म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहायला वाचायला शिकवले.

येसूवहिनींना काळ्या पाण्यावरच्या कैद्याची बायको म्हणून बायकाच नव्हे, तर पुरुषही हिणवीत असत. मंगलकार्यात तर बोलावत नसतच, पण सवाष्ण म्हणूनही जेवायला बोलवत नसत. त्यांच्याच सारखे भोग इतरही स्वातंत्र्यसैनिकांच्या बायकांच्या नशिबी होते. येसूवहिनी अशा बायकांना धीर देत असत. त्या अत्यंत समयसूचक होत्या. मुंबईत बाबारावांना अटक झाल्याचा निरोप आला, तेव्हा रात्रीच्या रात्री त्यांनी सर्व संशयित वस्तू हलविल्या. पहाटे पाचला धाड पडली, पण थोडेसे कपडे व भांडी पोलिसांच्या हाती आली. त्यांनी ती पुस्तके, टिपणे व इतर साहित्य हलवले नसते तर सावरकर कुटुंबाची खैर नव्हती. सावरकर कुटुंबाचा एक विशेष म्हणजे व अनुकरणीय गुण म्हणजे ते आपल्या घरातील बायकांपासून काही लपवीत नसत. त्यामुळे प्रसंग पडल्यावर कसे वागावे हे त्यांच्या झटकन लक्षात येई. त्याचमुळे येसूवहिनी हातबॉम्ब घेऊन जाणाऱ्या श्री. बर्वे यांना वाचवू शकल्या.

नारायणराव बाबारावांना भेटण्यासाठी पोलीस कोठडीत गेले होते. ही संधी साधून सावरकरांच्या घरावर पोलिसांनी धाड घातली. त्यांच्या हाती घबाड आले. सर्व कार्यकर्त्यांची नावे व पत्ते आले. कितीतरी तरुण पकडले गेले व त्यांची बायकामुले अक्षरश: रस्त्यावर आली. त्यांना धीर व मदत देण्याचे काम येसूवहिनींनी केले. त्यामुळे मित्र मंडळात जो मान व महत्त्व बाबारावांना होते तेच त्यांच्या पश्चात येसूवहिनींना मिळाले. त्या वेळी येसूवहिनी ऐन पंचविशीत होत्या. अनवाणी पायांनी त्या सर्वत्र फिरत. ‘आपण सर्व एक आहोत व पारतंत्र्याची नदी पार करू,’ असा विश्वास येसूवहिनींनी या पीडित बायकांत निर्माण केला.

नारायणराव डॉक्टर झाल्यावर सावरकर कुटुंब मुंबईला राहायला गेले. युद्ध समाप्तीनंतर येसूवहिनींनी बाबारावांची भेट मागितली, पण ती मिळाली नाही. व्रतं वैकल्ये व उपवास करीत राहिल्यामुळे प्रकृती खंगली. जवळजवळ १ वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या, त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीला भेटण्याचा परवाना आला. तोपर्यंत त्या अनंतात विलीन झाल्या होत्या. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वप्रेरणेने त्यांनी क्रांतिकारकांच्या परिवारांचे संघटन व मदत केली. स्वदेशी व्रत, आत्मनिष्ठ युवती संघ स्थापना, घरावर वारंवार पडणाऱ्या धाडींना धैर्याने तोंड देणे, समविचारी, समवयस्क मैत्रिणींना नैतिक पाठिंबा देऊन मदत करणे यात त्यांनी झोकून दिले होते. भारत सरकारच्या स्वातंत्र्यसैनिकासंबंधीच्या व्याख्येत त्या बसत नसल्या तरी त्यांनी जे सोसले ते कोणत्याही क्रांतिकारकाने सोसले त्यापेक्षा कणभर कमी नाही. खरं म्हणजे त्यांना स्वातंत्र्यसैनिका न म्हणणे म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या स्त्रियांनी हे जे मूक बलिदान केले त्याचा घोर अपमान करणे आहे.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मोठ्या बंधूस गणेशपंत(बाबाराव ) सावरकर यांना इंग्रज सरकारनी जन्मठेपेची शिक्षा दिली आणि त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू बाळ यांनाहि पोलिसांनी अटक केली .गणेशपंत सावरकरांच्या पत्नी सौ.यशोदाबाई यांनी लंडन मध्ये असलेल्या आपल्या धाकट्या दिरास पत्र पाठवून हि बातमी कळवली. वाहिनीची मनाची अवस्था स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लक्षात आली त्यांनी वाहिनीस एक सांत्वन करणारे पत्र लंडनहून पाठवले.इंग्रजांची करडी नजर असल्याने त्यांनी कुठलाही स्पष्ट उल्लेख न करता रूपकात्मक पत्र पाठवले .
ते हे पत्र……….!

जयासी तुवां प्रतीपाळले ।
मातेचे स्मरण होऊ न दिले ।
श्रीमती वाहिनी वत्सले ।
बंधू तुझा तो तुज नमीं ॥

आशीर्वाद पत्र पावलें।
जे लिहिले ते ध्यानी आलें ।
मानस प्रमुदित झाले ।
धन्यता वाटली उदंड ॥

अनेक फुलें फुलती ।
फुलोनिया सुकोनी जाती ।
कोणी त्यांची महती गणती ।
ठेवली असें ? ॥

परी जे गजेंद्र शुन्डेने उपटीले ।
श्री हरी साठी मेलें ।
कमल फूल ते अमर ठेलें ।
मोक्ष दाते पावन ।।

त्या पुण्य गजेंद्रासमची ।
मुमुक्षु स्थिती भारतीची ।
करुणारवें ती याची ।
इंदीवरश्यामा श्रीरामा ॥

स्वोउद्यानी तिने यावे ।
आपल्या फुलास भुलावे ।
खुडोनिया अर्पण करावे ।
श्री राम चरणा ॥

धन्य धन्य आपुला वंश ।
सु निश्चये ईश्वरी अंश ।
कि राम सेवा पुण्य लेश ।
आपुल्या भाग्यी लाधला ॥

अशीच सर्व फुलें खुडावी ।
श्री रामचरणी अर्पण व्हावी ।
काही सार्थकता घडावी ।
या नश्वर देहाची ॥

अमर होय ती वंश लता ।
निर्वंश जिचा देवा करिता ।
दिगंती पसरे सुगंधता ।
लोकहित परिमलाची ।।

सुकुमार आमुच्या अनंत फुला ।
गुंफोनी करहो सुमन माला ।
नवरात्रीच्या नवकाला ।
मातृ भूमि वत्सले ॥

एकदा नव रात्र संपली ।
नवमाला पूर्ण झाली ।
कुलदेवी प्रगटेल काली ।
विजयालक्ष्मी पावन ॥

तू धैर्याची असशी मुर्ति ।
माझे वाहिनी माझे स्पुर्ति ।
रामसेवा व्रताची पुर्ति ।
ब्रीद तुझे आधीच ॥

महत्कार्याचे कंकण धरिले ।
आता महत्तमत्व पाहिजे वाणले ।
ऐसें वर्तन पाहिजे केलें ।
कि जे पसंत पडले संतांना ॥

अनेक पूर्वज ऋषीश्वर ।
अजात वंशाजाचे संभार ।
साधु साधु गर्जतील ।
ऐसें वर्तणे ह्या काला ॥

या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील

” हेच फळ का मम तपाला ”

(अपूर्ण ….क्रमशः …..)

— चिंतामणी कारखानीस 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..