अनंत कान्हेरे
अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
कान्हेरे हे सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थेचे सभासद होते.मिसरूडही न फुटलेल्या असंख्य तरुणांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळत स्वातंत्र्यवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. असेच तीन तरुण म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. वयाची विशीही न गाठलेल्या या तरुणांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर तिघेही हसत हसत फासावर गेले.
अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक होते.जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात होती .तो क्रांतिकारकांच्या हिटलिस्ट वर होता. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. इंग्रज असून त्याने मराठी भाषेचाअभ्यास केला होता.खासकरून मराठी संगीत नाटके त्याला आवडत असत.नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.
ठाण्याचा तुरुंग हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा क्रांतिकारकांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे.सावरकरांच्या प्रभावामुळे कान्हेरे क्रांतीच्या मार्गावर गेले.हा घातपाताचा मार्ग योग्य कि अयोग्य यावर तत्कालीन वृत्तपत्रात आणि मासिकात चर्चा रंगल्या होत्या.सर्वसाधारण समाज या क्रांतिकारकांच्या वाऱ्यालाही उभा राहत नव्हता.त्याकाळी सुद्धा अनेक मंडळी इंग्रजांच्या राज्यकारभार करण्याच्या पद्धतीवर खूष असायची.इंग्रजांनी प्रशासनाला एक साचेबंध शिस्त आणली होती.कायद्याचे राज्य निर्माण केले होते.न्यायालयाचे कामकाज आणि न्यायव्यवस्था हि भारतात लोकांच्या अंगवळणी पडत होती.त्यामुळे सर्व साधारण पापभिरू माणसे या क्रांती वगैरे प्रकारा पासून चार हात दूर होते.सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली होती .कान्हेरे या हत्येचे प्रमुख आरोपी होते .
सावरकरांनी इंग्लंडहून पाठवलेल्या पिस्तुलानी अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्याचे निष्पन्न होताच लंडनला सावरकरांना अटक झाली.समुद्रमार्गाने सावरकरांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारलीआणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.सावरकर हे निष्णात कायदे पंडित होते.त्यांनी अंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास केला होता.दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.मॉर्सेलिस बेटावरील फ्रान्सच्या पोलिसांनी सावरकरांना ब्रिटिशपोलिसांच्या हवाली केले.दुसऱ्या देशतील भूमीवर झालेली हि अटक बेकायदेशीर होती पण फौजदारी प्रकारचा गुन्हा असल्यामुळे आणि सावरकर बेकायदेशीर पद्धतीने बेटावर शिरल्यामुळे फ्रान्सने शेवटी सावरकरांचे हस्तांतरण केले.
(अपूर्ण ….क्रमशः …..)
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply