नवीन लेखन...

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर
बाबाराव सावरकर 
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते.नातेवाईक ,सगेसोयरे अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते.सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे ,बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी विनायकराव हे दुसरे होते. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे त्यांचे धाकटे भाऊ होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांची आई त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षीच देवाघरी गेली.त्यावेळी बाबारावांच्या पत्नी येसूबाई यांनी त्यांचा मुला प्रमाणे सांभाळ केला .गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.
सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.
बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. जणू काही विंचवाचा दंश त्यांच्या अंगवळणीच पडला होता.तशी लहानपणी त्यांची प्रकृती नाजूकच होती.त्यात आई वडील गेल्यानंतर धाकट्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती.परंतु कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.बाबारावांनी पुढाकार घेवून लोकमान्य टिळक, `काळ’ वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्‍तीने रसरसलेली भाषणे आयोजित केली त्यामुळे या नामवंत नेत्यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना प्राप्‍त झाली.
बाबारावांचा ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी `वन्दे मातरम्’चा जयघोष केला.त्यावेळी एका पोलिसांनी बाबांरावांच्या अंगावर हात टाकला.बाबारावांनी त्या पोलिसास ठोकून काढले . या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग’ या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड झाला .
हे सर्व प्रकार सुरु असताना विनायकराव सावरकर इंग्लंड मध्ये शिकत होते.१९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहस्र प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते. या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. लवकरच स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्‍तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर’ पक्षाची स्थापना होऊ शकली ! `अभिनव भारत’ संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत, तसेच आपल्या कृत्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता ! लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला होता..
११ जून १९०८ ……..
काळ या वृत्तपत्राचे संपादक शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले. तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्‍याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला. बाबारावांचे तरुण रक्‍त उसळून आले. त्या व्यापार्‍यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्‍याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. `बाबा सावरकर’ हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला. त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले. त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.
१९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल ? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते !
अंदमान ……..!!!
अंदमानातील `सेल्युलर जेल’मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर पण त्याच जेल मध्ये होते.पण त्या दोघांनाही सुमारे दोन वर्षे आपण दोघेही एकच जेल मध्ये आहोत हे देखील माहित नव्हते.धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वा. सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप आदी मार्गांनी लढा दिला. परिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या; परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्‍नी सौ. येसूबाईंनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही. १९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली .
आयुष्यभर देशासाठी शरीर झिजवून १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे बाबाराव सावरकर कालवश झाले.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा मोठा भाऊ इंग्रज शासनाशी प्राणपणानी आयुष्यभर लढला.
बाबाराव हे विनायकरावांच्या सारखे शिकलेले जरी नसले तरी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली..सावरकरांचे अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले.वीर बैरागी’ या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले.श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप, वीरा-रत्‍नमंजुषा ,हिंदुराष्ट्र – पूर्वी, आता नि पुढे , धर्म हवा कशाला ?, ‘ख्रिस्तास् परिचय अर्थात्ख्रिस्ताचे हिंदुत्व’ ही त्यांची अन्य पुस्तके आहेत..

(अपूर्ण ….क्रमशः …..)

— चिंतामणी कारखानीस 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..