नवीन लेखन...

चरित्रकार व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये

मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा जन्म ३ जानेवारी १८५३ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.

त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला. तथापि त्यांना चित्रकलेची आवड असल्यामुळे पाच वर्षानंतर शिक्षकाचा पेशा सोडून देऊन ते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आले व तेथे त्यांनी तैलचित्रकलेचे विशेष ज्ञान संपादन केले. पुढे बडोद्यास असताना बडोदे संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी अनेक तैलचित्रे तयार केली. त्यानंतर कोचीन येथे ते जवळजवळ २० वर्षे होते. तेथील वास्तव्यात त्यांनी केरळ कोकिळ हे मासिक काढले व २५ वर्षे ते चालवून तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली. पहिली पाच वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे. त्यातील पुस्तक-परीक्षणे, लोकोत्तर चमत्कारांचे कथन, कविता, कलमबहादुरांना शेला-पागोटे, कूटप्रश्न इ. आकर्षक सदरांमुळे ते त्या काळात फार लोकप्रिय होते.

भगवत गीते वर विविध वृत्तांत त्यांनी लिहिले. गीतापद्यमुक्ताहार (१८८४) हे आठल्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर तिसांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ या विषयांवरील लेखनाचे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. ते काव्यरचनाही करीत असत. सासरची पाठवणी (१९२३) आणि माहेरचे मूळ (१९२३) ही त्यांची काव्ये त्यांच्या काळात त्यातील प्रासंदिक रचनेमुळे लोकप्रिय झाली होती. त्यांची भाषाशैली आकर्षक व आलंकारिक होती. ‘महाराष्ट्रभाषा-चित्र-मयूर’ ही पदवी त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली होती.

‘केरळ कोकीळ’च्या जून १९००च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय. कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

कृष्णाजी नारायण आठल्ये यांची प्रमाण ही कविता.
अतीकोपता कर्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..