आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की
मला माझं अस्तित्व नाही… किंबहुना नव्हतेच कधीही
कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे
तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा
मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी
अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी
शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला
निर्मीती तुमचीच मी; भास माझ्या आकृतीला नि रंग आहे प्रकृतीला .
अश्रू माझ्या अपयशाचे नि दुदुंभीही यशाची तुमचीच आहे
वेदना-संवेदनांना आपल्या तारही तर एकच आहे
आयुष्याच्या खडतर चढणीवर होता मला तुमच्या बोटांचा आधार
माझ्या वाढल्या हातांनी मग का न जपावा आता तुमचा उतार
मला माझा ध्यास आहे, ध्येय आहे, आशा नि महत्वाकांक्षाही
पण अभिलाषा त्या यशोशिखरांची मला यत्किंचितही नाही
जेथे हाक तुमची मला ऐकू येणार नाही
जमलंच तर आभाळात झेपावण्याचं वेड मला जरुर असावं
पण इतकंही नाही की सावलीला तुम्हा झाकायचं धाडस व्हावं
छातीचा कोट उभारला तुम्ही डेरेदार वृक्षाच्या निष्ठांनी
जपली उभारी उमलत्या मनांची रणरणत्या मध्यान्ही
मग त्या थकल्या भागल्या पारंब्यांना तजेला शिंपडावया
आमच्या मायेचा ओलावा आतूर का नसावा!
हुडहुडल्या शाखा जर, हळूवार शाल का आम्ही न पांघरावी
विसावण्यास त्यांना निवांत आमच्या खांद्यांचा निवारा
वावरण्यास अन् ऐसपैस का नसावा मनाचा गाभारा
रचल्या होत्या उन्हांत तुम्ही विटा घराच्या या वेड्यासाठी
त्या श्रमांची झाली लेणी बनून काळजातल्या मर्मबंधांच्या नर्म गाठी
वाटते तुम्ही विसावे अन् धराव्या आम्ही कमानी सावलीला
आपुलकीची लावू बिछायत पखरुन स्नेहाचा सौम्य परिमळ
चित्तवृत्तींच्या करुन वाती, उजळावी प्रसन्न संध्याकाळ
आठवणींचे उठवावे मोहोळ, नेमक्या टिचक्या मारुन
फुलवावा चहुअंगी मोहोर, स्पंदनांना साक्षी ठेवून
ओंजळीत साठवावे, निसटते क्षण, आयुष्यभर हुंगण्यासाठी
उचंबळत्या भावनांत भिजावे, करावे बंदिस्त आवेगाची घालून मिठी
संध्याछायांनाही करावे मोहक, लोभसवाणं
वीणेच्या हृदय छेडणाऱ्या झंकाराप्रमाण॑
झुंजुमुंजुचा घेत कानोसा, करीत जयकार रामाचा
निश्चिंत व्हावे शांत सोबतीने दूरच्या चंद्राच्या
ज्यांनी शिंपली माती आपली उभं आयुष्य खर्ची घालून
त्यांना जीवनवृक्षाची करावी बहाल किमान काही फुले मनापासून
कधी वाटतं उधळाव्या आपल्या आयुष्याच्या करुन कगाठी
लख्ख उजळावे त्यांनी क्षण दोन क्षण केवळ तुमच्यासाठी
अज्ञानापासून ते अज्ञाताच्या प्रवासापर्यंत, अविरत
एका मानवाची आपल्या मनुला कृतकृत्य कृतज्ञता ॥
-अंत:करणपूर्वक
–यतीन सामंत
Leave a Reply