अगणित आकाशगंगा तुझ्या.
त्या सगळ्याला व्यापून उरलेलं,
तुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं …..
तुझ्या असंख्य सौरमालेतल्या,
एका छोटूश्या ग्रहावर मी.
तरी माझी दखलं घेणं तुझं.
कृतज्ञ करतोस मला..
दाखवतोस तुझं असणं मला नेहमीच.
ही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी…
गुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात…..
असशील का तु या निळाईत!! की त्याच्याही पार विहरणारा
की माझ्यात स्थिरावणारा….
शोधत रहाते नजर, आरपार निळाईच्या ….
तूही बघतच असशील ना,
तिथून माझ्याकडे
क्षणभर चमकुन जा ना….
तुला शोधताना ……
डोळे भरुन येतात, पण मन कसं भरत नाही …
तुझ्या महाप्रचंड उर्जेचा, एक अंश ओततोस माझ्यात.
आणि धावत यावं वाटत मग तुझ्याकडे.
फोलपणा उमजतो इथला.
फक्त तुझं असणं अनुभवायच असतं
गुढ संहितेचा अर्थ उकलायचा असतो.
ओतप्रोत भरलेला तु सर्वत्र..
फक्त एका हाकेची अपेक्षा तुला,
की ती देखिल नसतेच …..
— स्मिता मिलिंद
सुंदर निळाई