नवीन लेखन...

कृतज्ञता

 

शब्दांना जेव्हा अर्थाचं सक्रिय पाठबळ लाभतं, त्यावेळी ते शब्दही ख अर्थानं जिवंत होतात. एखादाच नव्हे, तर व्यापक जनसमुदायाच्या जीवनात क्रांती निर्माण करण्याची ताकदही त्यांच्यात निर्माण होते. `कृतज्ञता’ हा असाच एक शब्द. प्राणिमात्रांच्या भावनेशी संबंधित. जेव्हा ही भावना प्रत्यक्षात येते, त्यावेळी या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. अन्यथा, कृतज्ञतेला कृतिशीलतेची जोड नसेल, तर शब्दाचा अर्थच नव्हे, तर शब्दही बदलून जातो. कृतघ्नता हा शब्द डोळ्यांपुढे येऊ लागतो. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. कृतज्ञता या शब्दाला सक्रिय अर्थ देण्याचा हा एक प्रयत्न आहे. सन 1971चा डिसेंबरचा तो काळ होता. बांगला देशाचं युद्ध अंतिम टप्प्यात होतं आणि त्याच काळात पुण्यातील एका प्रतिष्ठित दैनिकाच्या संपादक विभागात मी काम करू लागलो होतो. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. एके दिवशी अचानक माझ्या एका ज्येष्ठ सहकाऱयानं विचारलं, “तू कोणत्या फॅकल्टीमध्ये पदवीधर आहेस?” प्रश्न अतिशय साधा होता; पण त्याचं उत्तर देणं मात्र खूप कठीण होतं. वयाची 21 वर्षे पूर्ण करून 22च्या उंबरठ्यावर मी होतो अन् अजूनही माझ्या हाती पदवी नव्हती. मी मान खाली घातली. सुधाकर, हो सुधाकर त्याचं नाव. तो म्हणाला, “पदवीनं खूप काही शिंग येतात असं नव्हे; पण पत्रकार किमान पदवीधर तर हवा. तुझं इथं काय होईल, हा भाग वेगळा; पण उद्या कुठेही गेलास, तरी आपण पदवीधर नाही हे वैगुण्य राहीलच. ते बाळगू नकोस.” मी म्हणालो, “मी शेवटच्या वर्षाचा अभ्यास पूर्ण केलाय; पण एक विषय राहिलाय. अकौन्ट तो काही सुटत नाही. आता मी जे काम करतोय, त्यात तर मला त्याची गरजही नाही; पण मला पदवी घ्यायचीय.” मी माझ्या शिक्षणाची सारी कथाच त्याला सांगितली. सन 1967 ते 71 या काळातला प्रवास सांगितला. म्हटलं, “आता एक विषय राहिलाय, देऊन टाकू कधीतरी…” “कधीतरी का? आताच का नाही?” त्याचा बिनतोड प्रश्न आला. पदवी हवी असं मलाही वाटत होतं; पण एवढ्या तीव्रतेनं नव्हे. त्यामुळं आता तरी सुधाकरला निरुत्तर करणारं समर्थन मला हवं होतं. ते माझ्या हाताशी होतंही. मी म्हणालो, “ते खरंच; पण मी एवढ्यातच इथं नोकरीला लागलोय. परीक्षेसाठी नाशिकला जायला हवं. अभ्यासाला किमान एक महिना तरी रजा हवी. रजा कोण देणार? दिली, तरी पगाराचं काय? पगार नसेल, तर एक महिना तसा काढणं हे तर खूपच कठीण.” आता काय उत्तर आहे तुझ्याकडे, असा प्रश्न माझ्या चेहर्‍यावर असावा. तो म्हणाला, “एवढंच ना, मग तयारीला लाग. तुझ्या रजेची व्यवस्था मी लावतो. रजा पगारी झाली, तर प्रश्नच नाही. बिनपगारी झाली, तर पगाराएवढी रक्कम मी देईन तुला. त्याची काळजी करू नको.”
मी पदवीधर व्हायला हवं, याची ओढ सुधाकरला किती आहे हे जाणवत होतं. नव्हे, त्याची किंमतही देण्याचं त्यानं सांगून टाकलं होतं. रात्रीच्या चर्चेतला हा विषय रात्रीबरोबर मागे पडला असेल असं वाटलं मला; पण तसं नव्हतं. सकाळी मी आल्यावर त्यानं रजेचे सारे सोपस्कार पार पाडले. मला पुस्तकं आणून दिली आणि मला निघण्याचा आदेश दिला.
नावडते आकडे आणि हिशेबाच्या व्याख्या वाचू लागलो. सुधाकरच्या त्या भावनांचं ओझं अभ्यासाच्या प्रेरणेत रूपांतरित होत होतं. मी परीक्षा दिली अन् पासही झालो. आता मी वाणिज्य पदवीधर आहे, असं अभिमानानं सांगू शकत होतो. नंतरच्या काळात माझ्या या अभ्यासाचा काय किती उपयोग झाला, हा विषय बाजूला ठेवला, तरी शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केल्याचा आनंद मला मिळाला होता; पण या यशाला केवळ मीच जबाबदार आहे, असा अहंकारही मनात होता. महिनाभराच्या रजेच्या काळात 10-15 दिवस अभ्यास केला, तरीही या अवघड विषयात आपल्याला यश आलं, याचा तो दर्प कधीतरी शब्दातही येत असे. सुधाकरनं त्यावेळी माझ्यासाठी पगाराएवढी रक्कम देण्याची तयारी दाखविली नसती, तर आपण परीक्षेला बसलो असतो का? हा प्रश्न आणि त्याचं उत्तर बाजूला पडत गेलं. काळ गेला तसं त्याचं महत्त्व, वेगळपणही संपलं. मध्यंतरी अचानक एका कामासाठी पदवीचा दाखला आवश्यक ठरला. तो पाहताना हे सारं आठवलं. सुधाकर आठवला. त्याच्यामुळं मी पदवी मिळवू शकलो याची जाणीव झाली. सुधाकराप्रती `कृतज्ञता’ व्यक्त करताना या शब्दाचा अर्थही जिवंत होत असल्याचं मला जाणवत आहे.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..