दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा नदी म्हणजे विष्णु, शिव व ब्रह्माचे दृष्य स्वरूप आहे. ईश्वर अवताराचा हेतू एक गूढ गोष्ट आहे. अत्यंतप्रीय अशा कृष्णा नदीस सोडुन नृसिंहसरस्वती हे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर या क्षेत्रावर वीस वर्षाचा कालखंड राहिले. अखेरीस निजानंद गमनास जाताना पुन्हा श्रीशैल्य कर्दळी वनात जाण्यासाठी कृष्णा तीरावर आले.
अत्यंत प्राचीन व पवित्र अशा गाणगापूर क्षेत्राचे महत्व वाढवावे या परिसरातील तीर्थाची शुध्दता करावी. त्याचे पावित्र्य वाढवावे. तसेच या भागातील भक्तांना मुक्ती द्यावी. त्यांची पीडा हरण करावी हा हेतू गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करण्याचा होता. इतकेच नाही तर
नृसिंहसरस्वती नी भक्तांना वचन दिले आहे. आम्ही नित्य गाणगापुरी असणार आहोत. मठात आमचे वास्तव्य असेल. इष्ट भक्ताना आम्ही दर्शन देउन त्यांच्या कामना पूर्ण करु असा शब्द नृसिंह सरस्वती यानी दिला आहे.
दत्त संप्रदायात गाणगापूर क्षेत्र म्हणजे सर्वस्व आहे. नरसाबाची वाडी व गाणगापूर ही दोन स्थाने वारी सारखी आहेत दत्त भक्त नित्य दर्शनास या ठिकाणी येत असतात.
नृसिंहसरस्वतीनी विचार केला व अमरेश्वराचा (विश्वनाथाचा) निरोप घेवून गुप्त व्हावे असा निर्णय केला. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या ६४ योगिनी प्रकट झाल्या. आम्हाला सोडून कुठे जाता असा प्रश्न त्यांनी केला. नृसिंहसरस्वतीनी त्यांची समजूत काढली व संगितले.
ऐसे स्थान मनोहरु | सहज असे कलपतरु ।
म्हणोनी सांगताती गुरु । चौसष्ट योगिनीसी । । ९४।।
गु.च. अ. १९
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून ।
जेथे होते गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य । । ९५ ।।
गौप्य राहोनि औदुंबरी । प्रकटरुपे गाणगापुरी ।
राहिले गुरु प्रीतिकरी । प्रख्यात झाले परियेसा ।। ९६ ।।
सरस्वती गंगाधरानी नृसिहंसरस्वती यांचा गाणगापूरचा प्रवास अशा तऱ्हेने वर्णन केला आहे. गुरुरुपानी औदुंबरी असे म्हणत असताना नृसिंहवाडी येथील संगमावरील औदुंबर वृक्ष तसेच औदुंबराचे स्थान पण अभिप्रेत आहे.
नृसिंहसरस्वती प्रथम भीमा अमरजा संगमावर आले. अश्वत्थ वृक्षाजवळ राहिले गाणगापूरचा राजा होता त्यान त्यांना गावात येण्यास सांगितले व मठ बांधून दिला गाणगापूर हे अशाप्रकारे एक मोठे संस्थानच होते. ब्राह्मणाची अनेक घरे होती. नित्यकर्म उपासना होमहवन इत्यादी गोष्टी गाणगापुरात होत असत.
नृसिह सरस्वतीची किर्ति थोड्याच दिवसात पसरली. गाणगापूर मुक्कामी नृसिंह सरस्वती यानी अनेक चमत्कार केले. अनेकांची व्याधी दर केली. स्वत:ला गर्विष्ठ समजण्याऱ्या विप्रांचा त्यानी गर्व हरण करुन मुक्तता केली. भिक्षारनास अनुकुल असे क्षेत्र गाणगापूर होते.
गाणगापूर या क्षेत्राचे वर्णन प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यानी केले आहे. एकदा नामधारक सिध्दाना विचारतो भूमीवर अनेक प्रख्यात तीर्थे असताना नृसिंहसरस्वती या गाणगापूर क्षेत्रात कां म्हणून राहिले. तेव्हा नृसिंह सरस्वती यानी सर्व भक्ताना दिपवाळीच्या पर्वकाळी त्रिस्थळीचे स्नान करण्यास सांगितले. असे म्हणुन गया, प्रयाग आणि वाराणसी या यात्रेस निघावे अशी आज्ञा केली.
नृसिंहसरस्वतीनी गाणगापूर परिसरातच सर्व तीर्थे आहेत असे सांगून गाणगापूर क्षेत्राची माहिती दिली. सर्व पवित्र तीर्थाचे महत्व सांगितले.
१) भीमा गमरजा संगम:
गाणगापुरातील भीमा व अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमात ठारकूल हे तीर्थ आहे. या ठिकाणी भीमानदी ही उत्तर वाहिनी आहे. भीमा अमरजा या दोन नद्या ह्मणजे गंगा व यमुनाच आहेत. या तीर्थाचे महत्व खूप आहे काशीपेक्षा या ठिकाणी स्नान केल्यास शतपटीने पुण्य प्राप्त होते. असे सांगून नृसिंहसरस्वतीनी अमरजा नदीचे आख्यान भक्तांना सांगितले.
जालंधर पुराणातील ही कथा आहे. जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाने समस्त पृथ्वी जिंकली. इंद्राचा पराभव करून सर्व देवताना पळवून लावले. देव दैत्या मध्ये घनघोर युध्द झाले. अनेक देवतांचा वध झाला इंद्र शिवाकडे गेला व सर्व वृतांत सांगितला. इंद्र म्हणाला आम्ही दैत्याना मारतो पण त्यांचे रक्त भूमीवर सांडत असताना प्रत्येक रक्त बिंदू मधून राक्षस निर्माण होतात. राक्षस सैन्य वाढतच जाते. तीन ही लोक सर्व राक्षसानी व्याप्त झाले आहेत.
इंद्राचे हे वचन ऐकून महादेव कृध्द झाले. दैत्यांचे निर्दाळन करण्या साठी स्वत: निघाले. इंद्र म्हणाला आपण सर्व दैत्य माराल पण मृत देवाना जीवन प्राप्त करून देण्याची व्यवस्था करावी. महादेव संतुष्ट झाले. अमृत वचन बोलून संजीवन उदकाने भरलेला एक घट इंद्राला दिला. इंद्राने ते उदक देवतांच्या वर शिंपडले. सर्व देवता जाग्या झाल्या. घरात अमृत शिल्लक होते. ते घेवून जात असताना अचानक भूमीवर पडले. अमृताच्या प्रभावाने भूमीवर एक नदी निर्माण झाली. त्या नदीचे नाव संजीवनी असे पडले. मृत्युपासून सुटका करण्याऱ्या या नदीचे नाव अमरजा असे पडले. यामुळे नृसिह सरस्वती म्हणाले या नदीत जे स्नान करतात त्यांना काळ मृत्यू अपमृत्यु होत नाही. स्नान करणारा शतायुषी होतो. त्यांची पातके नष्ट होतात. अशी ही अमृत नदी या संगम स्थानात भीमेशी मिळाली आहे. म्हणून हे तीर्थ प्रयाग तीर्था प्रमाणे आहे. कार्तिक व माघ महिना हा या स्नानास पर्वर्णी काळ आहे. ग्रहण सांगता सोमवती आमावास्या, पुण्य तिथी, एकादशी या वेळी या नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यप्रद आहे.
२) मनोरथतीर्थ:
सगमाच्या पुढे अश्वत्य वृक्षाचे समोर मनोरथ म्हणून तीर्थ आहे. मनोरथ म्हणजे कामना पूर्ती करणारे असे हे तीर्थ आहे. कल्पवृक्ष समान या तीर्थाचे फल आहे. कारण अश्वत्थ हा कल्पवृक्ष या ठिकाणी आहे. गुरुचरित्रात अश्वत्य महिमा सविस्तर पणे आला आहे. या तीर्थात स्नान करणे हे कामना पूर्ती करणारे असे हे काम्यक तीर्थ मनोहर तीर्थ म्हणुन आहे. गाणगापुर क्षेत्राचा विशेष म्हणून हे तीर्थ आहे. नृसिहसरस्वती सदैव या ठिकाणी वास करून असतात. या तीर्थाची विशेष खूण म्हणजे गरुड तसेच गिधाडे ही या ठिकाण दृष्टीस पडतात.
३) संगमेश्वर:
कल्प वृक्षाची पूजा करून मनोहर तीर्थात स्नान करून संगमेश्वर या ठिकाणी शिवमंदिर आहे. नंदीला नमस्कार करून या शिवाला प्रदक्षिणा करावी. शैल्य पर्वतावरील मल्लीकार्जुन समजून याची अर्चना करावी. त्या योगे इंद्रपदाची प्राप्ती होते. असे महत्व या शिवालयाचे आहे.
४) वाराणसी तीर्थ:
संगमेश्वर पूजा करून १/२ कोस अंतरावर नागेशी म्हणुन एक गाव आहे. या ठिकाणी वाराणसी हे तीर्थ आहे. नृसिंह सरस्वतीनी या संदर्भात एक प्राचीन आख्यान सांगितले.
पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण होता. विरक्त असुन नित्य शिवोपासना करीत होता. सर्व संग त्याग करून देहाची पर्वा न करीता तो हिंडत असे. शिवानी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्या विप्रास लोक वेडा समजत कारण त्याचे वागणे सामान्य लोका प्रमाणे नव्हते. त्याला दोन भावंडे होती एकाचे नाव ईश्वर तर दुसऱ्याचे नाव पांडुरंगेश्वर असे होते. ते आपल्या या वेडसर भावाला विचारित नसत.
एकदां दोघे काशीला जाण्यास निघाले. त्यानी या वेडसर बंधूला येतोस का म्हणून विचारले. ब्रह्मज्ञानी असा तो वेडसर म्हणाला तुम्ही काशीला जावूं नका विश्वेश्वर माझ्या जवळच आहे. चला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवितो. असे म्हणून विप्राने स्नान केले.
विश्वेश्वर प्रसन्न झाला. तेव्हां तो विप्र म्हणाला आम्हास आपले नित्य दर्शन व्हावे. इश्वर प्रसन्न झाला. प्रत्यक्ष काशीक्षेत्र प्रकट झाले. मनकर्णिका कुंड तयार झाले. त्यातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. या ठिकाणी भीमा उत्तरवाहिनी आहे. बाण या स्वरूपात शिवलिंग प्रकट झाले. कुंडातून भागिरथी प्रकट झाली. ज्या प्रकारे काशी विश्वेश्वराची लक्षणे वाराणसी मध्ये आहेत, त्या प्रकारे लक्षणे प्रकट झाली. भीमा नदीचा व मनिकर्णिका कुंडातून प्रकट गंगेचा संगम झाला. दोनही बंधूना आपल्या बंधूची महती व समजली . ते त्याला ज्ञानी समजू लागले. तो म्हणाला आता काशीला कां जात आहात. सर्वानी काशी म्हणून या ठिकाणी अर्चना करावी. असे प्रत्यक्ष शिवानी मला सांगितले आहे. मला भ्रांत म्हणा किंवा गोसावी म्हणा. असे म्हणून त्या विप्राने बंधूना पंढरपुरास जाण्यास सांगितले. पुंडलिकाची आराधना करावी असे सांगितले. त्यांचे आराध्ये असे उपनाव झाले. प्रतिवर्षी काशीला न जाता येथेच यावे असे सांगितले.
नृसिंहसरस्वती म्हणतात असे हे काशीतीर्थ तया वाराणसीतीर्थ आहे. तुम्ही कोणताही संशय न धरता या ठिकाणी स्नान करा व मुक्त व्हा.
५) पापविनाशिनितीर्थ:
गाणगापूर क्षेत्रातील हे महान तीर्थ आहे. नावा प्रमाणे या तीर्थात स्नान केले असताना पाप विनाश होतो. नृसिंह सरस्वतीची बहीण रानाईस त्यानी या तीर्थात स्नान करण्यास सांगितले. तिचे कुष्ठ दूर झाले. वैडुर्य (बिदर) नगराचा यवन राजाला पण या तीर्थावर येण्यास नृसिंहसरस्वतीनी सांगितले होते. त्याच्या स्फोटकाची निवृत्ती झाली. तो पुण्य प्रद होवून मुक्त झाला.
रत्नाईचे कुष्ठ निवारण सर्वाना प्रत्यक्ष पाहिले असे हे पाप विनाशिनी तीर्थ गाणगापूर क्षेत्राचे महत्वाचे तीर्थ आहे.
६) कोटीतीर्थ:
जंबूद्वीपी जितकी तीर्थे । एकेक महिमा अपरितितो । तितुकिया वारु कोटीतीर्थे । विस्तार असे सांगता ।। ८७ ।। गु.च. अ. ४८
कोटी तीर्थाचे असे अपार महत्व आहे. पर्वकाळी स्नान करावे. दानादी कार्य करावे असे महत्व या तीर्थाचे आहे. कोटीगुणानी दान फळ प्राप्त होते. असे हे कोटी तीर्थ.
७) रुद्रपादतीर्थ:
कोटी तीर्थापुढे असलेले हे रुद्रपाद तीर्थ आहे. गयातीर्थाचे महत्व चा ठिकाणी आहे. वेणीदान, पितृकर्म आदी गया तीर्थाचे विधिया ठिकाणी केल्यास कोटी गुणाने लाभ होतो व कोटी जन्माचे पाप नष्ट होते. इतके महत्वाचे हे तीर्थ आह.
८) चक्रतीर्थ:
हे चक्र तीर्थ आतिविशेष आहे. या तीर्था जवळ केशवाचे सांनिध्य आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ज्ञान वृध्दी होते. अस्थि विसर्जन केल्या असतां त्या चक्रांकित होतात. मृताला मोक्ष प्राप्त होतो. द्वारकेच्या गोमती नदी मध्ये अस्थी चक्रांकीत होतात. त्या पेक्षा चौपट गुणानी युक्त असे हे तीर्थ आहे. नृसिंहसरस्वतीनी सर्वाना या तीर्थात स्नान करण्यास सांगितले.
९) मन्मथतीर्थ: –
गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात कल्लेश्वर म्हणून महादेवाचे स्थान आहे. याचे महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्र इतके आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे. त्याची पूजा करावी. प्रजा वृध्दी व अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती भक्ताला प्राप्त होते. असे हे पुण्यप्रद तीर्थ आहे. श्रावण महीन्यात अभिषेक करावा कार्तिक महिन्यात दीपाराधना करावी अनंत पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारे संगम व अष्टतीर्थाचे माहात्म्य प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती, दत्तात्रेय यानी सांगितले आहे. गाणगापूर क्षेत्र हे अशाप्रकारे एक पवित्र स्थान आहे.
गाणगापुरातील मठ तर पवित्राहुन पवित्र स्थान आहे. या ठिकाणी नृसिहसरस्वती २० वर्षाचा प्रदीर्घ काळ वास्तव्य करुन होते. त्यांच्या निर्गुण पादुका या मठा मध्ये आहेत. सरस्वती गंगाधर म्हणतात.
कल्पवृक्षाने पूजोन। यावे आमुचे जेथे स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी
मनोभावे ।। २९ ।। गु.च. अ. ५१
प्रात: स्नान कृष्णातीरी। पंचनदीसंगम औदुबरी।
अनुष्ठान बरवे त्याक्षेत्री। माध्यानी येतो
भीमातीरी ।।१६ ।। गु.च. अ ५१
नृसिंहसरस्वती निजानंदास जाते वेळी त्यानी सर्वाना सांगितले, आम्ही नित्य मठात वास करून आहोत. दुपारी भीमातटी भिक्षेसाठी नृसिहसरस्वती येत असतात. म्हणुन गाणगापूरला भिक्षेचे अत्यंत महत्व आहे. सर्व भक्त भिक्षा करीत असतात.
आत्मलिंग शाळिग्राम जपमाळा सर्व साधने आजही गाणगापूरला नृसिंहसरस्वतीच्या रूपात मठात ठेवल्या आहेत. निर्गुण पादूका प्रत्यक्ष दत्तचरण आहेत. खरेतर गाणगापूर हे तीर्थ दत्तचरणा साठी प्रख्यात आहे.
संपूर्ण वर्षभर अनेक उत्सव होत असतात. अन्नदान धर्मिक कार्ये, नित्य आरत्या पालखी व इतर कार्यक्रम या तीर्थावर होत असतात.
गाणगापूर या तीर्थाचे आणखी एक विशेष म्हणजे पिशाच्य बाधा, मनारुग्ण, समंध पीडा या परिसरात दत्तात्रेयाच्या संनिध्यामुळे या ठिकाणी अशा शक्ती येत नाहीत पितृदोष, पिशाच दोष याचे निराकरण या ठिकाणी होते. बाराही महिने निरनिराळे उत्सव होत असल्याने गाणगापूर हे क्षेत्र नित्यदर्शन करण्यासाठी प्रसिध्द आहे. पर्व काळ विशेष समारंभ या वेळी विशेष फल असते. तरी केव्हांही गाणगापुरला गेले तरी नित्यमंगल असे हे क्षेत्र आहे. संगमावर नित्य गुरुचरित्र पारायणा साठी दत्तभक्त येत असतात. अश्वत्थ वृक्षा खाली ते पारायण करतात.
गाणगापूरात संगमाजवळ एक टेकडी आहे. भस्माचा डोंगर म्हणून ती प्रसिध्द आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी अनेक यज्ञ केले त्या यज्ञभस्माचा हा पर्वत आहे असे सांगितले जाते. गाणगापूरचा प्रसाद म्हणून हे भस्म लोक बरोबर नेत असतात. प्राचीन काळा पासून अनेक विभूतीनी भीमा अमरजा संगमावर तपसाधना केली आहे. म्हणून गाणगापूर हे क्षेत्र तपोभूमी म्हणून पण प्रख्यात आहे. तपोभूमी दत्तभूमी पुण्यभूमी अशी ही भूमी म्हणजेच गाणगापूर क्षेत्र किंवा गंधर्वपूर क्षेत्र हे प्रसिध्द आहे.
एका कानडी आरती मध्ये भीमानदी व गंधर्वपूर याचा उल्लेख आला आहे.
भक्तजनर कल्पवृक्षागे मंगल ।
भक्तिदुं भजिसुव मोक्षागे मंगल ।
भीमा गंधर्वपूर वासगे मंगल ।
भीमा शंकर गुरुवेषागे मंगल ।
स्वामी नृसिह सरस्वतीगे,
गुरु मूर्तिगे यतिवर्यागे मंगल ।
कामीत कामफल तृप्तिगे मंगल ।
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात गाणगापूर क्षेत्र, गंधर्वपूर या विषयी जी माहिती आली आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू या.
पीठिकापुरात म्हणजे पीठापूर क्षेत्रांत त्रेता युगात सवितृकाठक चयन यज्ञ (होम) भारद्वाज महर्षीनी केला होता. तेव्हा त्या यज्ञाचे भस्म हे पर्वता सारखे जमून बसले. काही काळाने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. राम अवतारात मारूती द्रोणागीरी पर्वत घेवून जात असताना त्याचा काही भाग गंधर्व पुरात म्हणजे गाणगापूर क्षेत्रात पडला. गाणगापुरातील भस्माच्या टेकडीचा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात अशा प्रकारे आला आहे. भीमा अमरजा संगमाचा उल्लेख जालंदर पुराणात गंधर्वपूर असाच आहे. गंधर्वाचा वास हा हिमालय, कैलास मानस या परिसरात वर्णन केला आहे. रावणाचा भाऊ कुबेर हा कैलास मानस परिसरातच वास्तव्याला आहे पूर्वी हा गंधर्वराज दाक्षिण पंथावर श्री लंके मध्ये होता. रावणाने त्याला पिटाळून लावले. या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला तर काही गंधर्व राजे या तपस्थली मध्ये राहिले व त्या मुळे त्यास गंधर्वपूर असे नाव पडले असे अनुमान काढता येते. अन्यथा गाणगापुर व गंधर्वपूर याचा संदर्भ लागत नाही. पण प्राचीन काळात भरत वर्षामध्ये गंधर्व, सिध्द, साध्य, पण इत्यादी विभूतीचा संचार होता. दत्तात्रेय यांच्या अवताराचा विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या सिध्द, साध्य, योगी याना दत्तात्रेयानी मार्ग दर्शन केले आहे. दक्षिण पथावरील कर्नाटक राज्यातील हे गंधर्व पूर गाणगापूर क्षेत्र म्हणूनच प्रसिध्द आहे. दत्त संप्रदायाचे प्रमुख असे हे तीर्थ क्षेत्र आहे.
गाणगापूर क्षेत्राच्या संदर्भात विशेष गोष्ट म्हणजे नृसिहसरस्वतीना वासर ब्रह्मेश्वर येथे सायंदेव भेटले होते. नृसिंह सरस्वतीचे ते निजि शिष्य होते. निजानंदगमनाच्या वेळी जी चार प्रसाद पुष्पे पाठविली होती त्या पैकी एक पुष्प सायंदेवाना मिळाले. होते. हे सायंदेव कडगंचीला रहात होते. नृसिंहसरस्वतीनी त्याना १५ वर्षांनी गाणगापुरला भेट सांगितले. त्या प्रमाणे सायंदेव गाणगापुरला म्हणून आले. त्यांच्या कुटूंबावर नृसिंहसरस्वतींची कृपा झाली. त्यांच्या वंशात सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. ज्यानी गुरुचरित्र या ग्रंथाची रचना केली. ते सायंदेव गाणगापूरच्या क्षेत्रातच नृसिंहसरस्वतीच्या सहवासात राहिले. कानडी भाषेत त्यानी रचना केली गाण्गापुरात कानडी भक्तांचा वावर असला तरी महाराष्ट्रातून अनेक भक्त गाणगापुरला जात असतात. अशाप्रकारे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यातील दत्त भक्तांना गाणगापूर हे अत्यांत जवळचे व महत्वाचे तीर्थ आहे. कृष्णाकाठ सोडून २० वर्षे गाणगापुरास राहण्याचा श्री नृसिंहसरस्वती यांचा मानस या दोन भाषिक संस्कृतीला एकत्र करण्याचा होता. असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. सर्व समावेशक व समन्वय हाच हेतू या अवताराचा होता.
–श्री गणेश हरी कुलकर्णी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ८ वा, (अंक ३२)
Leave a Reply