नवीन लेखन...

क्षमतांची संहिता

करंगळीवर उचललेला गोवर्धन, तळहातावर आणलेला द्रोणागिरी, पाण्यात बघून केलेला मत्स्यभेद सारं आपण लहानपणापासून ऐकत, स्वीकारत आलोय आणि त्याला आपण कधीही आव्हान दिलेलं नाहीए.

मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे. त्याबाबतीत आपण कस्तुरीमृगासारखे असतो. कोणीतरी मग ते आपल्या नजरेस आणून देते. क्षमता शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि अध्यात्मिकही असतात. त्या साऱ्यांची पुरचुंडी मानवाच्या इवल्याशा देहात निगुतीने बांधून ठेवलेली असते.या क्षमता कमी-अधिक प्रमाणात असतात आणि त्यांच्यातील प्रमाण व्यस्त असते म्हणजे काही ठिकाणी शारीरिक अधिक तर मानसिक कमी वगैरे! पण क्षमतांची भेट आपणांस देणगी म्हणून मिळाली असते आणि त्यांची एकदा ओळख पटली की त्यांच्या विकासाबद्दल प्राधान्यक्रम ठरविता येतात.

कोणतीही क्षमता साधारणपणे तीनपैकी एका वर्गवारीत येते-

१) ज्ञानाविषयक – सर्वसामान्य भाषेत आपण याला हुशारी म्हणतो, शालेय संदर्भात परीक्षेतील गुण /क्रमांक म्हणतो. पाठांतर ही एक क्षमता, स्मरणशक्ती ही आणखी एक क्षमता. वाचन, लेखन या साऱ्या पायवाटा मेंदूतून उगवतात.

२) कलाविषयक / कौशल्यविषयक – वाद्यवादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला! तसेच आपल्या बारा बलुतेदार संकल्पनेतील कुंभार, सोनार, लोहार इत्यादी बलुतेदार या साऱ्यांमधील क्षमता या वर्गवारीत येतात.

३) वर्तनविषयक – मानवी स्वभावात अनेक क्षमता असतात आणि बरेचवेळा त्या इतरांच्या लक्षात पटकन येतातही! उदाहरणार्थ कोठल्याही परिस्थितीत भावनांवर नियंत्रण ठेवणे, कायम हसतमुख असणे, बडबड करणे किंवा याच्या उलट गप्प राहणे.

आपल्यातील सुप्त क्षमतांचा आपणास प्रत्यय प्रसंगोपात्त येत असतो. दोन उदाहरणांवरून हे समजायला सोपे जाईल –

समजा एखाद्याच्या घरी मंगल कार्य आहे. अशावेळी घड्याळाचा, भोजनाचा, विश्रांतीचा विचार न करता त्या परिवारातील मंडळी दिवसरात्र धावपळ करत असतात आणि कार्य चांगल्यारितीने पार पडावे यासाठी अपार कष्ट करीत असतात. रात्री मोठ्या मुश्किलीने मिळणारी ३-४ तास झोपही अशावेळी ताजीतवानी करणारी वाटते. या सारखेच -जर घरातील एखादी व्यक्ती दवाखान्यात असेल तर जागरणांची गणती नसते. दिवसाचे ठराविक चक्र विसरलेले असते. म्हणजेच या सुप्त क्षमता आपल्यात असतातच पण फक्त अशा आणीबाणीच्या वेळी त्या दृश्यमान होतात. पुन्हा परिस्थिती सुरळीत झाली की आपण सामान्य जीवन जगायला मोकळे होतो.

खेळ हे आपल्या क्षमतांचे फक्त सादरीकरणाचे व्यासपीठ नसते तर स्वतःचा धांडोळा घेण्याचे आणि इतरांबरोबर ईर्ष्या व तुलनेच्या माध्यमातून विकास घडवून आणण्याचे आव्हान असते. तेथे एखादा वजन उचलणारा खेळाडू स्वतःच्या वजनापेक्षा पाचपट वजन सरावाच्या (माउलींनी यासाठी सुंदर शब्द योजला आहे- “नित्ययज्ञ!”) मदतीने सहज उचलू शकतो. एखादा धावपटू १०० मीटर अंतर ८-९ सेकंदांमध्ये लीलया पार करतो, मॅरेथॉनमध्ये सलग ४०-४२ किलोमीटर चालू शकतो. खेळाच्या मैदानावर शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लागतो. त्यातून राज्य,देश,ऑलिम्पिक आणि विश्वविक्रम स्थापित केले जातात आणि कालांतराने ते मोडलेही जातात. तासनतास व्यायामशाळेत घाम गाळणारा मल्ल वेगवेगळ्या कुस्तीच्या फडांमध्ये विविध पारितोषिके मिळवतो. क्रिकेटच्या मैदानावर सराव करणारा खेळाडू सातत्याच्या जोरावर शतकांचा, झेलांचा, बळींचा विक्रम करतो. राहुल द्रविड सारखा “द वॉल” संबोधन प्राप्त झालेला क्रिकेटवीर तासनतास खेळपट्टीवर संयम आणि क्षमतांच्या जोरावर टिकून राहतो. संघभावना, निर्णय घेण्याची कुवत, पराभव स्वीकारण्याची मानसिकता, मैदानावरील डावपेच आणि रणनीतीच्या क्षमता अशा खेळाडूंना वलय,लोकप्रियता आणि अढळपद मिळवून देतात.

आपणांस स्वतःचा वाचनाचा वेग (दर मिनिटाला किती शब्द) किंवा लेखनाचा वेग माहित असतो का? आपण वाचन-लेखनात सर्वसाधारण आहोत, त्यात आपल्याला गती आहे की आपण त्यात (इतरांपेक्षा) मागे पडतो या क्षमता आपण कधीतरी तपासून पाहतो का?नोकरीत दिवसाचा कितीतरी वेळ इमेल्स, पत्रे, बैठकांचा गोषवारा वाचनात जातो आणि ते समजून घेऊन त्यावर विचार करून निर्णय घेण्यात जातो. जर आपला वाचनाचा वेग चांगला असेल तर यातील काही वेळ नक्कीच वाचेल आणि तो इतर उत्पादक कामात वापरता येईल. तीच गोष्ट लेखनाच्या वेगाची! परीक्षेत वेळ कमी पडतो, पूर्ण प्रश्नपत्रिका न सोडवता बाहेर यावे लागते आणि मग सोपी टीका करायला मोकळे-“प्रश्नपत्रिका खूप लांबलचक होती.” बरेचदा खरे कारण असे असते की आपला लेखनाचा वेग कमी असतो म्हणून वेळ पुरत नाही (आणि तेवढ्याच वेळात इतरांचे मात्र सगळे प्रश्न सोडवून होतात).

एकेकाळी टायपिंगच्या परीक्षा मोठया जोमाने पार पडत. येथेही एका मिनिटात ३०, मग ४० असे करत १०० शब्द टाईप करण्याची क्षमता वाढविता येते. स्टेनो च्या कामाचे स्वरूपही असेच क्षमताधिष्ठित आहे. डिक्टेशन घेण्याचा आणि ते वहीत नोंदवण्याचा वेग दर मिनिटाला किती शब्द असा असतो.

आपल्या क्षमता किती होत्या, आता किती आहे आणि भविष्यात काय असतील याचाही विचार करायला हवा.

कालौघात काही क्षमतांचा ऱ्हास होतो. वयपरत्वे शरीराची झीज होत असते. कानांनी ऐकणे हळूहळू कमी होते.  डोळ्यांना दिसणे कमी होते. हृदयाची/ फुफ्फुसांची क्षमता कमी होते. म्हणून अशा अवयवांना सांभाळून घेण्यासाठी श्रवणयंत्रे, चष्मा किंवा लेन्स आणि पेसमेकर असे पर्याय निर्माण झाले आहेत. उतारवयात शरीर थकते -स्नायू दमतात, धावपळ केली की धाप लागते, अपचन होते. हा नैसर्गिकरित्या होणारा क्षय असतो आणि कितीही जीवनसत्वे प्राशन केली तरी केव्हातरी हात टेकावेच लागतात. त्यामानाने मन ताजे आणि सक्षम असू शकते- टवटवीत असू शकतात, शरीराने असहकार पुकारला तरीही! नवे शिकायला /अनुभवायला उत्सुक असू शकते.

“स्वतःमधील क्षमतांची तोंडओळख असायलाच हवी पण त्याचबरोबर इतरांमधील क्षमतांचा शोध घेणं तितकंच आवश्यक असतं” असं एलबर्ट हब्बर्ड म्हणतो. कारण आपल्या भात्यातील बाण माहीत असले की चांगल्या धनुर्धराचे वेध सोपे होतात. नेपोलियनला एकदा विचारले होते- “तू प्रत्येक युद्ध कसे जिंकतोस?” तो म्हणाला – “सोप्पं आहे. मला स्वतःच्या उणीवा आधीच माहीत असतात.”

आपल्यातील वैगुण्यांची / मर्यादांची तमा न बाळगता, आणि बलस्थानांची टिमकी न वाजविता पुढे जाता आले पाहिजे. कारण आपले वेगळेपण मर्यादांमुळे अधोरेखित होत असते. त्या ओळखून आपला रस्ता निवडावा, तपश्चर्या करावी आणि आत्मविकासपूर्वक वाटचाल करावी. त्यामुळे फक्त बलस्थानांवर अवलंबून राहू नये.

कोणतीही जबाबदारी अंगिकारण्यापूर्वी ती पार पाडण्यासाठी लागणाऱ्या क्षमता आपल्यामध्ये आहेत का याचाही शोध घेणे महत्वाचे असते. त्यासाठी स्वतःच्या बलस्थानांचे आणि न्यूनतेचे अध्ययन करणे आवश्यक असते. एखादे अवजड वजन उचलायचे असेल तर ते पेलण्याची अंगी कुवत आहे की नाही हे आधी माहीत असायला हवे. वर्गात जाऊन एखादा विषय शिकवायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी बरोबरच संभाषण कला, बोलण्याची ऊर्जा सारं हवंच. गिर्यारोहणा साठी दमसास, कणखर मनःशक्ती आणि प्रतिकूल वातावरणात (हवामान, निद्रा, अन्न) तग धरून राहण्याची इच्छाशक्ती लागते.

काही क्षमतांना आपण “दैवी ” मानतो, त्यांची नक्कल होऊ शकत नाही- लता मंगेशकरांचा आवाज – जो आता विश्वाचा झाला आहे, ब्रॅडमन नामक आख्यायिका आपण फक्त ऐकून आहोत, आईन्स्टाईन पुन्हा होऊ शकत नाही, गणिती शकुंतलादेवी कितवे आश्चर्य आहे माहीत नाही, ही काही युगकर्ती नांवे! या साऱ्यांनी आपल्या निसर्गदत्त गुणांना अखंड परिश्रमांचे, मेहनतीचे कोंदण घातले. त्यामुळेच ही मंडळी जगदविख्यात बनली आणि आपणा सर्वांसाठी “आदर्श   ” बनली आहेत.

पण काही व्यक्ती येताना असं दैव घेऊन येत नाहीत. जन्मजात किंवा नंतरच्या आयुष्यातील घटनांमुळे त्यांना ” कमतरतेवर ” आयुष्य काढावे लागते. पण प्रयत्नांती अशा दिव्यांग व्यक्ती साऱ्या वैगुण्यांवर मात करीत दैदिप्यमान यशाने झळाळतात. सुधा चंद्रन यांना एका अपघातात पाय गमावल्यामुळे नृत्यावरच काय पण चालण्यावरही बंधने आली होती पण “जयपूर फूट ” च्या मदतीने त्यांनी या व्यंगावर मात केली आणि नृत्याची आराधना सुरु ठेवली – कृत्रिम पायावर! हेलेन केलर यांचे उदाहरण नव्याने द्यायची गरज नाही. यांनी शीर कधीही झुकवलं नाही, ताठ मानेने जगाच्या आणि वाटेत भेडसावणाऱ्या समस्यांच्या नजरेला नजर भिडवली. कुसुमाग्रज सागराला उद्देशून म्हणतात -” किनारा तुला पामरा.” म्हणून सुरुवातीला मनुष्याला आपण” क्षमतांचे गाठोडे” अशी उपमा दिली.

या व्यक्ती आपल्या आयुष्याला अस्तित्व देतात, अर्थ देतात आणि थकल्यावर पाठीवर थाप मारीत नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करायला प्रोत्साहित करतात. त्यांच्यामुळे समाजाला सामुहिक चेतना, ऊर्जा मिळते. यांना आपण संग्रहालयात, इतिहासात, ध्वजावर आणि पुस्तकांमध्ये आदराने जतन करतो. त्यांच्या कहाण्या इच्छाशक्तीच्या आणि पराक्रमांच्या दंतकथा बनतात.

नोकरीच्या स्वरूपाप्रमाणे क्षमतांची वर्गवारी होत असते. कामाच्या स्वरूपाप्रमाणे शिक्षण, अनुभव याबरोबरच वेगवेगळ्या कौशल्यांची (शारीरिक, मानसिक) जाहिरात केली जाते. लेखी परीक्षा, मुलाखत अशा माध्यमांमधून उमेदवारांच्या क्षमतासंचांची चाचपणी केली जाते आणि त्याची नोंदही ठेवली जाते. त्यामधून संस्थेच्या गरजेशी मिळती-जुळती व्यक्ती निवडली जाते. सर्वसाधारणपणे संघभावना, निर्णय क्षमता, समस्यांचे निराकरण, सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी, कठीण प्रसंगांना तोंड देण्याची सवय अशा क्षमतांना पारखले जाते. वैमानिकाला लागणाऱ्या क्षमता निराळ्या, लेह/लडाख मधील उणे तापमानात तग धरून राहणाऱ्या जवानांच्या ठायी असणाऱ्या क्षमता वेगळ्या तर अंतराळवीरांना लागणाऱ्या वेगळ्या असे कामाच्या / व्यवसायाच्या निमित्ताने लागणारे क्षमतासंच बदलत असतात. खालच्या स्तरावरील पदांसाठी जबाबदाऱ्यांच्या प्रमाणात शारीरिक क्षमता अधिक जोखल्या जातात तर उच्चपदांसाठी बौद्धिक, भावनिक, मानसिक क्षमतांना प्राधान्य दिले जाते.

बहुमुखी प्रतिभेच्या धनी असलेल्या व्यक्तींना एकाचवेळी खूप व्यवधाने सांभाळता येतात आणि अनेकविध कौशल्यांची हाताळणी लीलया करता येते. वेल्डरला मोटर मेकॅनिकचे काम करता येते, बागेतील माळी यशस्वी वाहनचालक होऊ शकतो आणि कँटिनमधील वाढपी दवाखान्यात डॉक्टरांचा विश्वासू मदतनीस होण्याची क्षमता बाळगतो. वीरू सहस्त्रबुद्धे आठवतोय “थ्री इडियट्स ” मधला – वेळ वाचावा म्हणून एकाचवेळी दोन हातांनी लिहिणारा !

वाहनांचे संरचन (डिझाईन) करताना किंवा उदवाहक (लिफ्ट) च्या संदर्भात भार पेलण्याची क्षमता महत्वाची असते. साधारण प्रत्येकी ६८ किलो वजन धरून उदवाहक एकावेळी किती व्यक्तींची ने-आण करू शकेल याचा निर्देश तेथे केलेला असतो. वाहनाची क्षमता एक चालक अधिक प्रवासी संख्या अशी ठरविली जाते. मात्र मानवाचे क्षमतामापन अशा पद्धतीने होत नाही कारण त्यासाठी मापन व्यवस्था अस्तित्वात नाही. मानवाच्या क्षमता असीमित असतात आणि त्यांना कितीही मर्यादेपर्यंत खेचता येते.

आयुष्यातील (व्यक्तिगत आणि व्यावसायिक) आव्हाने आणि उद्दिष्ट्ये साध्य करायची असतील तर स्वतःमधील क्षमतांचा विकास करण्याला पर्याय नसतो. तात्कालिक अथवा दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट्ये एकदा ठरली की त्यांच्या पाठलागासाठी क्षमता सुसज्ज व्हायला हव्यात. असलेल्या पुरेशा आहेत का आणि त्यांचा विकास कसा घडवून आणायचा याचे नियोजन सुरु करायला हवे. आणि नसतील तर त्या कशा हस्तगत कराव्यात याची नीलप्रत (ब्ल्यू प्रिंट) आपल्या जवळ असावी अन्यथा ती उद्दिष्ट्ये सोडून द्यावीत.  भविष्यातील नव्या तंत्रज्ञानांचे स्वागत आणि स्वीकार करण्यासाठी स्वतःच्या भात्यातील जुन्या आयुधांवर विसंबून राहणे योग्य नाही. इंग्रजीत एक म्हण आहे- ” उद्याची युद्धे कालच्या शस्त्रांनी जिंकता येत नाहीत.” आज शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर हातात ढाल-तलवार अशी शस्त्रे असून चालणार नाही तर अद्ययावत विमाने आणि दारुगोळा असायला हवा तरच शत्रूचा नायनाट शक्य आहे.  त्यामुळे कालसुसंगत नव्या कौशल्यांची आणि क्षमतांची तोंडओळख आवश्यक आहे. “कृत्रिम प्रज्ञा, इंडस्ट्री ४. ०, मशीन लर्नींग” अशा भाषांशी, कसबांशी हातमिळवणी करावयास हवी अन्यथा टिकाव लागणार नाही. आयुष्याच्या प्रवाहात खूप गोष्टी कालबाह्य होत असतात त्यानुसार काही प्रसंगांमध्ये तरी “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असा पवित्रा स्वीकारायला हवा. ज्ञानाचे ग्रहण, कौशल्यांचे उपार्जन आणि वर्तनामध्ये सकारात्मकता हीच पुढची शिकवणी असायला हवी.

स्त्री-पुरुषांमध्ये नैसर्गिक भेद जसे आहेत,तसेच त्यांच्या क्षमतांमध्ये आहेत. प्रसंगानुरूप या क्षमतांची पारख होत असली तरी बऱ्याच बाबतीत (संयम ,सहनशीलता, भावनिक प्रतिसाद, प्रसंगांची ठाम हाताळणी, झुंजण्याच्या प्रवृत्ती आणि सहजासहजी हार न मानणे इत्यादी ) स्त्रिया एक पाऊल पुढे असतात. जित आणि जेता क्षमतांच्या आणि संधींच्या बाबतीत जवळपास सारखे असतात पण विजिगिषु वृत्ती ही क्षमता जेत्याच्या पारड्यात वजन टाकते आणि लढतीचे चित्र बदलून टाकते. एखाद्या “शेलारमामाने” परतीचे दोर कापले की मावळे बघता बघता हातून गेलेला गड परत मिळवू शकतात.

“तुम भी ऊंचे बन सकते हो! छू सकते हो नभ के तारे!! “अशी ग्वाही कोणीतरी दिली की आपल्या शिडात वारे भरू शकते. ही अशी संहिता सतत जवळ बाळगायला हवी – कधी त्यात वेळप्रसंगी भर घालायची, कधी काही अनावश्यक टाकून द्यायचे म्हणजे मग सर्व प्रसंगांना सर्वदा सज्ज राहता येते.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..