क्षितिजी आभाळ टेकलेले, विस्तीर्ण असूनही झुकलेले,
आहे केवढे मोठे तरीही,
नतमस्तक होऊन वाकलेले,
झाड आहे बहरलेले,
पाना फुलांनी लगडलेले,
अंगोपांगी त्याच्या भरलेले,
पण तरीही संन्यस्तपणाने,
सदैव कसे झुकलेले,
फांदी फांदी फुललेली,
असंख्य जागी डंवरलेली, फळाफुलांनी वाकलेली
तरीही लीन झालेली,
पिकले फळ झुकलेले,
गोड–गोड मऊ झालेले,
फांदीला खाली लागलेले,
समर्पित, आयुष्य केलेले,-!
आभाळी ढग भरलेले,
नवसंजीवने ओथंबलेले,
काळे होऊन वाकलेले,
तरीही ताठा सोडलेले,
थेंब पावसाचे टपटपते,
धरेवरती खालवर येणे,
तिला अमृत पुरवतांही,
सदा,नत की झालेले,
काय शिकवतो निसर्ग
ज्याचे त्याने ठरवावे,
कितीही मोठे झाले तरी,
लहान राहून वागावे,–!!
विनम्रतेत मोठेपण असे,
अहंपणा कधीच नसावा,
निसर्गातील पहा उदाहरणे,
तसा धडा घे मानवा,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply