– कुमारजींच्या स्वरांनी मेंदू भंजाळून गेला होता.
सकाळपासून.
आकाशवाणीवर सकाळी सकाळी कुमार गंधर्वांचं निर्गुणी भजन लागलं आणि अंगावरची चादर दूर फेकून तो ताडकन उठला.
‘ हे आजच का लागावं गाणं ? ‘
त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला आणि काहीच न सुचल्यानं सैरभैर होऊन तो बाहेर पडला.
आणि वर्क फ्रॉम होम ची आठवण झाली, तसा पुन्हा घरी परतला.
दिवसभराचा वैताग पूर्ण करून तो पुन्हा बाहेर पडला.
कुमारजींच्या स्वरांनी त्याचा मेंदू पोखरायला सुरुवात केली.
कुदरत की गत न्यारी…
असं काही झालं की त्याची पावलं रत्नदुर्ग किल्ल्याकडे वळायची.
भगवतीला बाहेरूनच नमस्कार करून तो टेहळणी बुरुजामध्ये जायचा.
आत्ताही तो तसाच गेला आणि स्तंभाच्या पाठी असलेल्या टेहळणीच्या जागी जाऊन बसला.
ती जागा त्याची आवडती जागा होती.
तिथून बाहेर डोकावलं की तिन्ही बाजूला पसरलेला निळाशार समुद्र दिसायचा. पार दूरवर पसरलेलं अथांग पाणी. वर निळं आभाळ. मधूनच स्वैरपणे विहरणारे पक्षी आणि खालच्या बाजूला दिसणारी मुंग्यांसारखी माणसं. मधूनच केव्हातरी जेटीला बिलगून उभी असणारी होडकी.
हे नेहमीचं दृश्य. दीर्घ परिचयाचं. पण नवलाईचं असल्यासारखा तो पाहायचा.
आजसुद्धा एकटक नजरेनं तो पहात होता.
आणि अचानक त्याला बुरुजाला लागून असलेल्या डोंगरावर बकरी दिसली. स्वतःचा तोल सावरत ती झाडाचा पाला ओरबाडून खात होती.
डोंगरातल्या त्या अरुंद वाटेवर असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी होती. तो बकरीला दूर जाऊ देत नव्हता. हातातल्या काठीनं कधी तिला मारत होता. तर कधी झाडाची फांदी वाकवून झाडाचा पाला ओरबाडू देत होता.
कितीतरी वेळ तो हे दृश्य बघत होता.
आणि अचानक पुन्हा कुमारजींचा धीरगंभीर आवाज त्याच्या मनात घुमू लागला…
कुदरत की गत न्यारी…
त्यानं त्या बकरीकडे एकदा पाहिलं.
माणसाकडे पाहिलं आणि त्याला काहीतरी चमत्कारिक जाणवलं.
त्या बकरीला हे महित्येय की आत्ता हा माणूस झाडाचा पाला ओरबाडू देतोय, वेळ प्रसंगी स्वतः ओरबाडून तिला खायला देतोय.
पण उद्या हाच माणूस तिच्या गळ्यावरून सुरा फिरवणार आहे.
मसाला भरून शिजवून खाणार आहे.
माहित्येय का हे तिला ?
तो अस्वस्थ झाला.
बकरीला सांगायला हवं, की बाई गं, आज तू हे सगळं मिळणारं, आनंदानं ओरबाडून खाते आहेस, पण तिकडे धार लावलेला लखलखीत सुरा अधीर झालाय तुझ्या मानेवरून फिरायला…
सांगावं का ?
सावध करावं का ?
आणि त्याच क्षणी त्याच्या मनात स्वर रुंजी घालू लागले..
कुदरत की गत न्यारी…
नको त्या वेळी नेमकं हेच निर्गुणी भजन का आठवतं आपल्याला ?
पुन्हा ती बकरी दिसली त्याला.
ओरबाडून ओरबाडून पाला खाल्यानं पोट टम्म भरलेलं दिसत होतं.
त्याला वाटलं आपण सगळे बकरीच आहोत.
मिळेल ते, दिसेल ते ओरबाडून खाणारी बकरी.
गरज असो नसो ओरबडत राहायचं.
नाही ओरबडायला मिळालं की सरकारच्या नावानं बोंबलत फिरायचं.
कुणी ओरबडायला देत असेल तर त्याच्याकडे आधाशीपणानं धावायचं.
जो देईल त्याच्या नावानं चांगभलं म्हणायचं. ओरबडायचं. खायचं. पोट फुटेस्तोवर खायचं.
जे हक्काचं आहे तेही खायचं. जे हक्काचं नाही तेही खायचं.
निसर्गाला धुडकारून निसर्गातलंच खायचं. शेजाऱ्यापाजाऱ्यांचं खायचं.स्वार्थाला खायचं आणि परमार्थाला खायचं.
त्यासाठी कुणाच्या तरी हातात आपल्या गळ्यातली स्वाभिमानाची दोरी द्यायची.
आणि म्हणायचं.
चांगभलं !
वेळ येते तेव्हा गळ्यातली दोरी केव्हा कोण तोडतं, कोण मानेवरून सुरा फिरवतं, ते कधी कळतच नाही.
तेव्हा सारं संपलेलं असतं.
डोंगर अवघड असतो.
त्यातल्या वाटा अरुंद असतात.
खाली खोल अथांग समुद्र असतो.
लहानशी चूक.
कपाळमोक्ष ठरलेला.
तरीही कळत नाही.
कुदरत की गत न्यारी !
कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला.
त्याच्या लक्षात आलं,
सगळ्याला उशीर झालाय.
सगळं संपत आलंय.
कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय…
कुदरत की गत न्यारी !
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply