नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी जम्मू येथे झाला.त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जलंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. १९३१ साली कोलकात्यात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’ साठी करारबद्ध केले. १९३२ मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर्. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन मे’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’ निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करू क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृध्द करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मुव्हिटोन ‘ या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शुध्द कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहाँ हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भीडत. सैगल यांच्या गायकीवर शास्त्रशुध्द गायकीचेही संस्कार झाले होते. उस्ताद फैयाज खाँ यांची तालीमही काही दिवस त्यांना मिळाली होती. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, ‘चाह बरबाद करेगी ‘(शाहजहाँ), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’ (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभु मोहे’ (धूप छाँव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत तसेच ‘बाबूल मोरा’ ही भैरवीतल्या करूण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. मा. सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. मा. सैगल यांचे यशस्वी चित्रपट दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन). त्याचबरोबर बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये केला होता. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।

सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. मा. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..