गोड बातमी की अगोदर भंबेरी उडते ती सासुची. हे करु की ते करु काही समजत नाही. मग शांतपणे बसून विचार करून आठवून एकेक गोष्टीचे नियोजन करते. एक चांगला दिवस पाहून तिला न्हाऊ घालून गोड धोड जेवण करतांनाही पाटपाणी. रांगोळी दिवा वगैरे आणि नंतर देवासमोर बसवून चोरचोळी घातली जाते. हे गुपित असते म्हणून चोरचोळी किंवा ओटीचोळी असे म्हणतात. तीन चार महिने झाले की मग काय चोळीचा सिलसिला सुरू असतो. सूर्य उगवताना. चांदण्यात. बागेत. आमराईत. नावेत. गालीच्या वर. आणि किती तरी. मग नातेवाईक. ओळखीचे सुध्दा घरी बोलावून अंगणात बायकांना बोलावून हा कार्यक्रम करतात. गाणी असतात. मग राबता सुरू होतो. पदार्थांचा अमूक तमूक पाठवतात गोड आबंटतिखट चटणी भाजी. तळण. धपाटे दशम्या. ठेचा. लोणची. त्यामुळे तिच्या खाण्याची इच्छा पूर्ण होते नंतर एक मोठा डोहाळे जेवणाचा बेत ठरला जातो. हे मात्र ज्याच्या त्याच्या आवडीचा ऐपतीचा आणि परिसरातील पद्धतीनुसार.
फुलाची वाडी भरणे. हा प्रकार मला माहित नव्हता. पण इथे सूनबाईला मी केला होता. छान वाटले. एक पटले ते म्हणजे माझ्या मतानुसार. तिला हातात फुलांनी सजवलेला धनुष्यबाण देतात. व तो बाण ती लावून नेम धरते अशी पोजमध्ये फोटो काढून घेतात. खरच बाळंतपण म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा व अव्हानात्मकच असतो. हा पण जिंकायचाच आहे या तयारीने तिला सिद्ध रहावे लागते म्हणून धनुष्यबाण असावे असे वाटते..
पहिल्या वेळी माहेरी जायची पद्धत आहे. मग सातव्या महिन्यानंतर ती माहेरी जाते. पण हल्ली थोडा बदल झाला आहे. प्रकृती. तेथील गैरसोय व नोकरी मुळे तिची सोय इथेच केली जाते. मग सासूबाईंना खूपच टेन्शन येत. तरीही त्या पुढील स्वप्नात रमतात. आता पाहुणा की पाहुणी याची उत्सुकता. माझं अगदी मनापासूनचे मत आहे की प्रत्येक स्रीला मुलगाच हवा असतो. ती कितीही शिकलेली. उच्च पदावर कार्यरत असली तरीही तुम्ही माना अथवा न माना. काळानुसार मुलीचे स्वागतही जोरावर केले जाते. ती एक ईश्वरी देणगी आहे म्हणून आनंदाने स्विकारावे. आज्जी बाई मनोराज्यात.. बाळाला मी पायावर न्हाऊ माखू घालणार. त्या बायकांचे हात खरखरीत नको ग बाई माझ्या नातवाला त्रास होतो. काजळतीट. उदीची धुरी. पाळण्यात निजवून अंगाई. पाचवीची पुजा. बळीराणा देणे. घरोघरी पानसाखर वाटणे. मग मोठ्या थाटामाटात बारसं. झबली. कुंची. टोपी दुपटी. गोधडी स्वतःच्या जुन्या मवू साडीची. वाळे. बिंदल्या. लॉकेट. कुंचीला सोन्याचे पिंपळपान. चांदीची वाटी. चमचा. गुटीपात्र चांदीचे गोकर्ण म्हणतात. लहान सहाणे वर आपणच गुटी उगाळून दिली पाहिजे. सूनबाईला प्रमाण कळत नाही. त्याच वेळी सून बाईचे मसाज. शेकशेगडी. खीरी दहा दिवस. गरम गरम भात तुपाचे भरपूर सेवन डिंक लाडू. नियमित दोन वेळा पान खास पद्धतीचा विडा. घरात स्वच्छता. बाहेरचे येणाऱ्यांना पाय धुवून यायला सांगणे. खूपच काळजी घ्यावी लागते. मग बाजारात जाऊन रंगीबेरंगी उलन आणणे. टोपी मोजे. कोट. स्वेटर विणकामाच्या वेळी उलटसुलट टाके घालतानाच बाळाच्या भविष्यातील गोष्टीचा पण विचार याच पद्धतीने चाललेला असतो. यात किती सुंदर छान छान चित्रं रंगवली जातात आणि त्यातील आनंद व समाधान हे आज्जी झाल्याशिवाय कळत नाही..
खर तर हा सगळा खटाटोप केवळ नातवंडांसाठी असतो आणि म्हणूनच लेक आणि सून यांना समान समजून घ्यायला हवे. आणि मी अगदी हेच केले आहे याचा मला आनंद आहे. त्यामुळे नातवंड माझ्या वर खूप प्रेम करतात. आज्जी झाले आता पणजी व्हायचे आहे म्हणजे ऐटीत बाळाला घेऊन बसेन आणि सोन्याची फुले वाहून घेतले की कृतकृत्य झाले..
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply