नवीन लेखन...

कुंकू – हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..

लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे.

एक हिन्दू संस्कृती (आता हा धर्म म्हणून मान्यता पावलाय..!) सोडली तर, स्त्रीयांनी कपाळावर काहीही लावण्याची अन्य कोणत्याही धर्मात प्रथा नाही, नसावी. हिन्दूंनी या कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातलेली असल्याने, कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारा हिन्दू हा जगातील एकमेंव धर्म असावा..! म्हणून या लेखात फक्त हिन्दू स्त्री तिच्या कपाळावर धारण करत असलेल्या कुंकवाबद्दल लिहिणार आहे. हिन्दू पुरुषांतही कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे, मात्र त्यावर मी या लेखात लिहिणार नाही.

हा कुंकवाचा इतिहास नाही, तर माझ्या नजरेतून मला स्त्रीयांच्या भाळीचं कुंकू कसं दिसतं, ते लिहणार आहे. या लेखाला मी गतवर्षी आणि त्यापुर्वी तीन वेळा हरिद्वार-ऋषिकेषच्या गंगातटावर हिन्दू संस्कृतीचं जे विराट दर्शन घेतलं, त्यातून मी जे अनुभवलं त्याची पार्श्वभुमी आहे. या लेखाचं सार सांगायचं तर, हिन्दू संस्कृती किंवा धर्म शांतपणे आणि चिवटपणे जिवंत ठेवण्याचं काम हिन्दू स्त्रीयांनी मोठ्या चिकाटीने केलेलं आहे. या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या खेड्यातील वा शहरातील, कोणत्याही जाती-प्रान्त-पंथाच्या स्त्रीयांच्या कपाळी विराजमान असलेल्या एवढ्याश्या कुंकवा-टिकलीने हिन्दुत्वाला, ते मानणाऱ्या लोकांशी घट्टपणे चिटकवून ठेवलंय, असं मला सारखं वाटतं.

हिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरची टिकली हा या धर्मातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच माझ्या कुतुहलाचा विषय. कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी देशाच्या ज्या ज्या भागात जाणं झालं, तेथील सर्व स्तरातील हिन्दू स्त्रीयांमधे कपाळावर कुंकू असणं आणि ते मोठ्या अभिमानाने (वा श्रद्धेने म्हणा हवं तर..!) भाळी धारण करणं हे समान लक्षण मला दिसलं. जात कोणतीही असो, पंथ कोणताही असो, प्रांत कोणताही असो अथवा भाषा कोणतीही असो, उभ्या-आडव्या पसरलेल्या आपल्या देशातील हिन्दू स्त्रीयांत समान धागा आहे, तो त्यांच्या कपाळावर त्यांनी धारण केलेल्या कुंकवाचा वा सध्या टिकलीचा..!

आपल्याकडे कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातली गेली आहे. हिन्दू स्त्रीच्या सौभाग्याची ठसठशीत अशी ती खुण आहे. ती तशी असली तरी, परंतू मला ती स्त्रीयांच्या कपाळावरची हिन्दुत्वाची अभिमानाने मिरवली जाणारी ध्नजा आहे असं जास्त वाटते. कारण आपल्या देशातील विविध प्रांतात, हिन्दू स्त्रीयांमध्ये सौभाग्य दर्शवणारी अलंकार चिन्ह वेगवेगळी असली तरी, कपाळावरचं कुंकू सर्वांच्यात समान आहे. कपाळावरच्या या एवढ्याश्या ठिपक्याने अख्खा देश हिन्दुत्वाच्या धाग्याने नकळतच जोडून ठेवलाय असं मला जे वाटतं, ते यामुळेच. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, हिन्दुत्वाची सतत समोरच्याला नकळतची जाणिव हा एवढासा ठिपका करून देत असतो, असं मला तरी वाटतं. म्हणून हिन्दुत्व असं कपाळावर राजरोस आणि अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्रीया आणि त्यांचं कुंकू माझ्या कौतुकाचा आणि निरिक्षणाचाही विपय आहे.

कुंकवाची सांगड सौभाग्याशी घालून आपल्या पूर्वजांनी हिन्दू संस्कृती व पर्यायाने धर्म कसा जिवंत राहील, याची सोय करून ठेवली आहे, असं मला वीटतं..! कुंकवाचा संबंध त्यांच्या सौभाग्याशी घातल्यामुळे, स्त्रीया ते प्राणपणानं जपतात. माझ्या मते, त्या एका अर्थानं हिन्दुत्वाची जपणूक करतात. आपल्या महाराष्ट्रात तर एखादी स्त्री कुणाच्या घरी पहिल्यांदाच गेली असेल, तर तिला आवर्जून कुंकू लावलं जातं. एकमेंकीला कुंकू लावणं म्हणजे, मला तरी त्या एकमेकीला हिन्दुत्वाचं वाण देतायत असं वाटतं.

कुंकू, टिकली हा सौभाग्य अलंकार जरी मानला गेला असला तरी, हिन्दू धर्मिय सर्व वयातील मुली/स्त्रीया, सधवा वा विधवा, कुंकू-टिकली धारण करतातच, फक्त त्यांच्या रंगात फरक असतो. पोर्तुगिजांनी जेंव्हा गोवा काबिज करून त्यांच्या धर्माचा पाशवी वरवंटा गोव्यावर फिरवायला सुरूवात केली, तेंव्हा त्याची सुरुवात त्यांनी गोव्यातील हिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरील कुंकू पुसण्यापासून केली, हे अनेक अभ्यासकांनी नोंदवून ठेवलं आहे. कपाळावर कुंकू दिसलं की कठोर शिक्षा पोर्तुगिज करत, कारण कपाळावरील कुंकू हिन्दुत्वाची ठळक निशाणी आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी पहिला घाव स्त्रीयांच्या कुंकवावर घातला. यासाठी श्री.महाबळेश्वर सैल यांचं ‘तांडव’ हे मराठी पुस्तक किंवा श्री. अ. का. प्रियोळकरांचं ‘The Goa Inquisition’ हे इंग्रजी पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं.

या पार्श्वभुमीवर हल्लीच्या माॅडर्न कल्पनांमुळे कुंकू-टिकली न लावता कपाळ बोडकं ठेवण्याची जी फ्याशन आली आहे, त्यामागे हिन्दू संस्कृती शांतपणे नाहीशी करण्याची एक चलाख चाल असावी असं मला वाटतं. काॅनव्हेंट शाळांच्या नियमांत कपाळावर टिकली धारण करणं बसत नाही, त्या मागे हेच तर कारण नसेल ना असंही मला वाटतं. पोर्तुगिज, मुस्लीम वा परधर्मीय शासकांनी एके काळी आपल्या मुली-स्त्रीयांना जबरदस्तीने नाकारायला लावलेली गोष्ट, आज आपणंच पुढाकार घेऊन, आपल्या पोरी-बाळींना हौसेनं करायला लावतो आहोत हा काळजीचाही विषय आहे. यात आता मनाप्रमाणे वागण्याचं आणि राहाण्याची व्यक्ती स्वातंत्र्याची भावनाही येऊन मिसळल्यामुळे, यावर काही बोलायचीही सोय उरलेली नाही.

कुंकू-टिकलीचा सौभाग्याशी किंवा हिन्दुत्वाशी जसा संबंध आहे, तसा तो सौंदर्याशीही आहे. कपाळावरील तो एवढासा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जेवणातल्या मिठाएवढी भर घालतो असं मला वाटतं. मिठाएवढी का, तर मिठाशिवाय जेवण अळणी, म्हणजे बेचव लागतं. कपाळावर कुंरू किंवा टिकली धारण न केलेली कोणत्याही वयाची स्त्री मला ती सुंदर असुनही तशी वाटत नाही. पुन्हा कोणत्या प्रकारच्या जेवणात मीठ कधी घालावं, याचे काही नियम आहेत (अशी माहिती काही सुगरणींनी दिली) आणि त्यामुळे जेवणाच्या चवीत फरक पडतो (हे ही त्यांनीच सांगीतलं). अगदी तसंच कुंकू किंवा टिकलीची जागा आणि आकार किंचित जरी रोजच्यापेक्षा इकडे-तिकडे झाला तरी, त्या स्त्रीच्या दिसण्यात बराच फरक पडतो, असंही माझं निरिक्षण आहे (हे सहजचं निरिक्षण आहे. मी येता-जाता स्त्रीयांच्या कपाळाकडे निरखून पाहातो असा याचा अर्थ घेऊ नये.). अर्थात कुंकू-टिकलीचा स्त्रीच्या सौंदर्याशी मी लावलेला संबंध प्रत्येकाला (आणि प्रत्येकीला) मान्य असेलच असं नाही.

आता थोडसं वेगळं. काही वर्षांपूर्वी मी एका दिवाळी अंकात एका चित्रकाराची कथा वाचली होती. कथा आता निटशी आठवत नाही, मात्र त्या कथेचा सारांश मात्र लख्ख आठवतोय. कथेतल्या त्या चित्रकाराला एका स्त्रीचं नग्न चित्र काढायचं असतं. तो माॅडेल म्हणून एका स्त्रीला निवडतो आणि त्या स्त्रीला निर्वस्त्र होऊन त्याच्या समोर पोज घेऊन बसायला सांगतो. तो तिच्या नग्न देहाची अनेक रेखाटनं करतो, पण काही केल्या त्तिचं त्याला हवं तसं चित्र त्या रेखाटनात उतरत नाही. हा समर्थ चित्रकार असुनही काहीतरी चुकतंय याची त्याला जाणीव होते, पण नक्की काय हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. तिची नग्नता काही केल्या त्याला त्याच्या चित्रात पकडता येत नव्हती. विचार करता करता अचानक त्याचं लक्ष तिच्या कपाळावरील कुंकवाकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की, त्या ती माॅडल म्हणून बसलेली स्त्री संपूर्ण नग्न असली तरी, तिच्या कपाळी असलेलं बारीकसं कुंकू मात्र तसंच आहे. तो चित्रकार तिला ते कुंकू काढायला लावतो आणि मग लगेच दुसऱ्या क्षणाला त्या स्त्रीची नग्नता चित्रात बरोबर उतरवतो. त्या स्त्रीच्या कपाळावरचं ते एवढंसं कुंकू, त्या स्त्रीला ती पूर्ण निर्वस्त्र असुनही नग्न होऊ देत नव्हतं. केवळ आणि केवळ त्या कुंकवामुळेच ती माॅडेल त्या चित्रकाराला नग्न वाटत नव्हती आणि म्हणून तिची नग्नता त्त्याच्या मनात आणि मनातून चित्रात उतरत नव्हती. एका ओळीत सांगायचं तर, स्त्रीच्या कपाळावरचं एवढसं कुंकू किंवा टिकली तिच्या संपूर्ण देहाच्या वस्त्राचं काम करतं. तुम्ही जर भारतीय न्युड पेंटींग्स पाहिली असतील तर, त्यातील बऱ्याच चित्रात, चित्रातील त्या नग्न स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसतं. सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत खरं आहे असं म्हणण्यास हरकत नसावी. कुंकू स्त्रीच्या वस्त्राचं काम करतात..!

निर्वस्त्र स्त्रीची नग्नता लपवून तिला सौंदर्य बहाल कारयचं सामर्थ्य त्या एवढ्याश्या ठिपक्यात आहे. सौभाग्य चिन्हात कुंकवाचा समावेश करण्यामागे आपल्या पूर्वजांनी हा विचार केला असावा, असं मला सारखं वाटतं. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘न्युड’ या मराठी चित्रपटाची पेपरातली जाहिरात तुम्ही पाहिली असेल. जाहिरातीतील स्त्रीयांच्या कपाळी रंगवलेलं ठसठशीत लाल रंगातलं कुंकू, न्युड म्हटल्यावर आपल्या मनात जे चटकन ‘नागडं’ चित्र उभं राहातं, त्या चित्राला छेद देतं असं मला वाटतं.

सौंदर्यवद्धी, धर्म आणि लज्जारक्षणाचं कार्य गेली अनेक शतक करणारं हे कुंकू किंवा टिकली आताशा मात्र वेगाने आपल्या जीवनातून फॅशनच्या नांवाखाली हळूहळू लोप पावत चाललं आहे. (गैर)सोय म्हणून म्हणा किंवा ग्लोबलायझेशनचा परिणाम म्हणून म्हणा किंवा टिकली लावणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे या समजुतीने म्हणा, कुंकू किंवा टिकली लावणं कमी कमी होत चाललंय. केश-वेशभुषेच्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा झालेला किंवा होत असलेला विपरीत अविष्कारही याला कारणीभूत असावा असं मला वाटतं. (अर्थात प्रत्येक व्यक्तीने आपण कसं राहावं हे ठरवण्याचा तिचा अधिकार मला मान्य आहे. हे लिहावं लागतं, नाही तर त्यावर उगाच वाद होतील.)

हल्ली तर स्त्रीच्या अंगावरील वस्त्रही, वरचं आणखी वर आणि खालचं आणखी खाली अशी, आखडत चाललीत, तिथे एवढीशी बिचारी टिकली कसली टिकणार? शक्य तेवढं ‘दाखवणं’ हाच समाजाचा स्थायीभाव आणि स्वभावही होत चाललेला आहे. कदाचित हे आधुनिकतेचं लक्षण असेलही परंतू माझ्यासारख्या ‘हमारे जमाने मे’वाल्यासाठी मात्र हे चिंतेचं कारण वाटतं.

हल्ली झाकण्याचा नाही तर दाखवण्याचा जामाना आहे, चालायचंच..सर्वच क्षेत्रातला नागडा निर्लज्जपणाच जिथे मोठा सद्गुण ठरतोय, तिथं लाजेनं मान खाली घालणं सहाजिकच आहे..!!

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

सूचना-
१. ज्यांच्यात स्त्रीयांनी कुंकू वा टिकली लावण्याची प्रथा नाही, त्यांच्या कुंकू-टिकलीकडे पाहायच्या भावना आणि दृष्टी वेगळी असू शकते. मी हिन्दू संस्कृतीच्या दृष्टीने हा लेख लिहिलेला आहे, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावं.

 

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..