माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्याशी ताजे होत डवरले. विलासराव देशमुख हे उत्तम अभ्यासक होते. त्यांची मुलाखत घेताना त्यांना
कोणत्याही विषयावर प्रश्न विचारला तरी उत्तर त्वरित तयार असायचे. अत्यंत हजरजबाबी व्यक्तीमत्त्व म्हणून विलासराव ओळखले जायचे. विलासराव कोणत्याही विषयावर अत्यंत सहज बोलायचे. त्यामुळे बाकी मंत्र्यांच्या मुलाखती आणि विलासरावांची मुलाखत यामध्ये खूप तफावत असल्याचे मला जाणवत असे. बाकी मंत्र्यांची मुलाखत घेताना अमूक प्रश्न विचारावा की नको असा प्रश्न मला पडतो. पण, विलासरावांच्या बाबतीत असे कधीही घडले नाही. कोणत्याही प्रश्नाचे ते सहज उत्तर द्यायचे. त्यांना तिरकसपणे विचारलेल्या प्रश्नांचा कधीही कधी राग यायचा नाही. किंबहुना त्याबाबत त्यांनी कधीही गैरसमज करुन घेतला नाही. कोणत्याही प्रश्नाचे ठामपणे उत्तर देण्यासाठी ते सज्ज असायचे. त्यांची मुलाखत म्हणजे ‘मुलाखत’ असे मला कधीही वाटले नाही. आमच्या मुलाखतींना गप्पांचेच स्वरुप असायचे. विलासराव मुलाखतीसाठी कायम वेळेवरच पोहोचत असत. त्यांच्या बोलण्यात उत्स्ङ्गूर्तता आणि मिश्किलपणा असल्याने त्यांची मुलाखत नक्कीच रंगतदार होणार याची मला नेहमी खात्री असायची.
विलासरावांचे व्यक्तीमत्त्वही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अत्यंत प्रसन्न होते. डोळे मोठे करुन टाळी देत विनोदाला दाद देणे ही त्यांची खास स्टाईल होती. त्यांची आठवण झाली तरी मला त्यांची ही स्टाईल आठवते. मुलाखतीच्या वेळीही त्यांची ही स्टाईल हायलाईट होतच असे. मुलाखतीदरम्यान मी त्यांना हलके ङ्गुलके प्रश्न विचारले तसे गंभीर प्रश्नही विचारले. प्रश्नाचे स्वरुप लक्षात घेऊन ते उत्तर देत. त्यांचा स्वभाव जसा मिश्किल तसाच गंभीरही होता. गंभीर प्रश्नावर बोलताना ते कधीही विनोद करायचे नाहीत. मात्र, वातावरण गंभीर होत असेल तर ते कसे अलगद हलके करायचे हे विलासरावांना प्रभावीपणे जमायचे. एखाद्या विषयावर पोकळ बडबड करणे किंवा गोल गोल विधाने करणे हे विलासरावांना कधीच जमले नाही. मुलाखतीदरम्यान मी त्यांना काही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचे अगदी मुद्देसूद, साध्या आणि सोप्या भाषेत आणि सर्वसामान्यांनाही सहज कळेल अशा शब्दात विलासराव उत्तर द्यायचे.
विलासरावांचा हिंदी आणि उर्दू भाषेवरही हातखंडा होता. उर्दू आणि हिंदीवर पगडा असणारी मराठी माणसे थोडीच. पण विलासरावांचे या दोन्ही भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. एका माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचेही अशाच प्रकारे उर्दूवर प्रभुत्व होते. त्यावेळी एका सभेत या मंत्र्यासमोर विलासरावांनीही उर्दूत व्याख्यान करत ती सभा गाजवली होती. आजही मला ती सभा आठवते. उर्दूतील अनेक काव्यरचना आणि साहित्याचा अभ्यासही त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. अर्थात त्यांनी आपले हे ज्ञान उगीचच केव्हाही दाखवले नाही. पण गरज पडेल तेव्हा ते याचा अत्यंत खुबीने वापर करत असत.
आमच्या अशा मुलाखत नावाच्या गप्पांमध्ये उल्हास पवारही सहभागी असतील तर मग या गप्पा अतिशय रंगतदार होऊन जायच्या. विलासराव युथ कॉंग्रेसच्या आठवणींबाबत नेहमीच भरभरुन बोलायचे. त्याकाळी उल्हास पवार हे युथ कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष होते आणि विलासरावांची उस्मानाबाद युथ कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याकाळातल्या जुन्या आठवणी जागवणे सांगणे विलासरावांना खूप आवडायचे. युथ कॉंग्रेसच्या अंतर्गत राबवलेल्या योजना, सळसळत्या उत्साहात केलेली आंदोलने, तरुण मुलांनी दिलेली साथ याविषयी विलासराव बोलायला लागले की त्यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटायचे. किंबहुना, त्यांना थांबवणे अवघड पडे, इतक्या उत्साहात ते या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात रमून जात असत.
सकारात्मक आणि आशावादी दृष्टीकोन ही विलासरावांची जमेची बाजू होती. त्यांच्याकडे जाणारा कधीच निराश होऊन परतला नाही. याचेच ङ्गलित म्हणून सर्वसामान्यांनी त्यांना सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन पोहोचवले.विलासरावांचा आधुनिक आणि शैक्षणिक क्षेत्राबाबतचा व्यापक दृष्टीकोन त्यांच्या बोलण्यातूनही जाणवत असे. शिक्षण ही काळाची गरज असल्याचे ते वारंवार बोलत असत. त्यांनी स्वत: पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून बीए आणि बीएससी पदवी प्राप्त केली. शिवाय, आयएलएस लॉ कॉलेजमधूनही एलएलबीची पदवी मिळवली. शिवाय मराठवाड्यासह मुंबईतही काही महाविद्यालये सुरू करून आपला शैक्षणिक दृष्टीकोन समाजासमोर मांडला. ऐंशीच्या दशकात जपान, थायलंड, ङ्गिलीपिन्स, तैवान आणि हॉंगकॉंग देशांचा दौरा करुन त्यांनी तेथील आधुनिकता अभ्यासली. पुढे ते जर्मनी, ङ्ग्रान्स, इंग्लंड, अमेरिकेचाही अभ्यासदौरा करुन आले. तेथील आधुनिकतेचा आपल्या देशाला आणि पर्यायाने महाराष्ट्राला कसा ङ्गायदा होईल याबाबतचा विचार ते नेहमी व्यक्त करत असत. मुलाखतीतूनही त्यांनी बरेचदा आधुनिकता आणि शैक्षणिक दृष्टीकोनाचा कसा पुरस्कार करायला हवा, हे बोलून दाखवले.
विलासरावांची आणि माझी बरेचदा गाठभेट झाली. पण, त्यांच्यासोबतचा एक प्रसंग माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय प्रसंग आहे. नोकरी सोडून दिल्यानंतर सूत्रसंचालन करण्याच्या माझ्या कारकीर्दीला २५ वर्षे झाली तेव्हा माझ्या पत्रकार मित्रांनी दादर क्लबमध्ये एक अनौपचारिक मेळावा आणि जेवण आयोजित केले होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपतींचा मुंबई दौरा होता. त्यामुळे साहजिकच विलासराव या कार्यक्रमाला येणार नाहीत, असे सर्वांना वाटत होते. परंतु, उशीरा का होईना पण शब्द दिल्याप्रमाणे विलासराव कार्यक्रमाला आले होते. विमानतळावर राष्ट्रपतींना निरोप देऊन ते मेळाव्याला पोहोचले. ते मेळाव्यात भेट घेऊन लगेच ते निघतील असेही अनेकांना वाटत होते. पण, बराच वेळ मेळाव्यामध्ये उपस्थित राहून त्यांनी सर्वांनाच अचंबित केले. या मेळाव्यादरम्यान त्यांनी माझ्या कुटुंबियांशी, मित्रांशी, उपस्थित पत्रकारांशी अगदी निवांत आणि दिलखुलास अनौपचारिक गप्पा मारल्या.
मी मुलाखतकार. पण विलासरावांची मुलाखत म्हणजे मुलाखत असे कधी मला वाटलेच नाही. त्यांच्याबरोबर मी बिनधास्त गप्पा मारत असे. त्यामुळे विलासरावांची मुलाखत घ्यायची असे म्हटले तरी
मला कधीच टेंशन आले नाही. कदाचित हेच विलासरावांच्या मोठेपणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. असा हा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा दिलखुलास माणूस आज आपल्यात राहिला नाही, याचे दु:ख त्यांच्यावर प्रेम करणार्या प्रत्येकाला सतत बोचत राहणार आहे.
– सुधीर गाडगीळ
— सुधीर गाडगीळ
Leave a Reply