भूतान म्हणजे land of dzongs, बुद्ध देवळांचा प्रदेश, बहुसंख्य जनता बुद्ध धर्मीय, त्याची तत्वे रोजच्या जीवनात अमलात आणतात. बहुतेक नागरिक पारंपारिक क्ध्तीचे जीवन जगतात. एकंदर आम जनता खाउन पिऊन सुखी आहे. देशात दोन महत्वाची शहरे, थिंपू व पारो, या दोन जागी आधुनिक व पारंपारीक राहणीमानाचा सुरेख मिलाप दिसतो. थिंपू मध्ये अनेक परदेशी कंपनीची ऑफीसे, जपानी गाड्या, उत्तम बंगले, आखीव रस्ते, हिरवी गार झाडी, अगदी प्रेमात पडणारे शहर, अशा जागी बिपीनला राहण्यास उत्तम बंगला त्यालाच लागून एक आलेशान बंगला होता, ज्याचे मालक होते तोंग्शे रिपो, जे उच्च भूतानी समाजातील एक प्रतिष्टीत व्यक्ती होते, शहरातील इथोमिथो या प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीचे मालक, बंगल्या पुढे व मागे सुंदर हिरवळ, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, त्या हिरवळीवर एकटा मुलगा रोज फुटबॉल खेळत असे, त्याचे नाव होते, डोंग्जे, मौशु पेक्षा दोन एक वर्षानी मोठा, दोघांची शाळा एकच, रोज सन्ध्याकाळी त्याचा खेळ बघत ती वेळ घालवत असे, ती तर बिचारी कायमची बुजलेली एखाद्या सशासारखी पायरीवर बसलेली असे.
एके दिवशी त्याचा फुट बॉल तिच्या बंगल्याच्या आवारात येऊन पडला. तत्परतेने तिने त्यांच्या घरी नेऊन दिला, त्यातून ओळख झाली, त्याचे आई वडील व तो अतिशय प्रेमळ व्तीला आग्रहाने घरी थांबवून घेत, आई प्रेमाने कुरवाळत असे, तिच्या जीवनात आशेचा किरण डोकावत होता. हळूहळू तिचा बुजरेपणा नाहीसा झाला होता. तिच्या विचाराना एक वेगळीच चालना मिळाली होते.
घरातील लायब्ररी एक अनमोल खजिना होता, भूतानचा इतिहास, सण, जंगले, हिमालयातील फिरण्याचे मार्ग, उत्तम फोटोंची पुस्तके, या दोन्ही मुलांना, त्याचे बाबा मनापासून त्यातील माहिती देत, डोंग्जेकडे अनेक जपानी खेळ होते, मौशु आता वेगळ्याच विश्वात फुलत होती.
बिपीन आपल्या कामात पूर्णपणे बांधला गेला होता, ही तर आता काळाची गरज होती. चुखा व परो या दोन गावांना त्याला वारंवार जावे लागत असे, घरात मौशु व जोगाना या दोघींचे राज्य होते. थिंपू ऑफीसच्या कामाची व्याप्ती वाढत चालल्याने एका अनुभवी सेक्रेटरीची गरज भासू लागली होती, ह्याची कुणकुण मृणाल पर्यंत पोहचली आणि ती तर एका पायावर या देशात जाण्यास तयार झाली. जीवनात काहीतरी सतत धाडस करायचे हा तिचा पिंडच होता. सरकारची मान्यता असल्याने तिचे थिंपूत येणे सहजरीत्या पार पडले. एके दिवशी सकाळी ऑफीस मध्ये शिरत होता. आणि त्याच्या कानावर ‘गुड मॉरनिंग बिपीन सर ‘ असा गोड आवाज त्याच्या कानावर पडला, आणि डोळ्यासमोर चक्क मृणाल उभी होते, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पूर्वीच्या भेटीच्या स्मृती चाळवत दोघे गप्पात रममाण झाले. बुद्धीबळाच्या पटावरील प्यादी आता वेगळ्याच मार्गाने पडणार होती.
जलसंपत्ती पासून वीज उत्पन्न करणारे अनेक प्रकल्प भूतान मध्ये भारताच्या मदतीने उभारले जात होते, तेथून तयार होणारी वीज भारतातील काही राज्यांना मिळते. या कामावर अनेक भारतीय इंजिनियर्स अहोरात्र कामात गुंतलेले आहेत, त्यांच्याकरता या देशात राहण्या बाबतचे नियम अतिशय शिथील आहेत. येथील सरकारचा विश्वास चीनपेक्षा भारतावर ज्यास्त असल्याने भारतीय लोकांना आदरपूर्वक वागवले जाते. पुनाखा हे ७० किमी अंतरावरचे दरीत वसलेले छोटे गाव जेथे डोंगरातून ९ किमी लांबीचा बोगदा खणून त्यातून अजस्त्र जल प्रवाहाचा वीज निर्मिती करता भला मोठा कारखाना उभारला जात होता. त्या जागी बिपीनला वारंवार जावे लागत असे. हा प्रवास एकट्याने करताना काहीवेळा आपण बायको व मुलीचे आयुष्य नेस्तनाबूत केले आहे असे विचार मनात येत पण ते काही क्षणच पण त्याच्या निष्ठुर मनाच्या कप्प्याची कवाडे क्षणार्धात उघडत आणि मी कसा सूड घेतला आहे या आनंदात मश्गुल होत असे. थिंपू मधील ऑफिसात रात्री ११११ वाजेपर्यंत काम करण्याचा उत्साह चांगलाच बहरत चालला होता. मृणालचे चुणचुणीत वागणे, लाघवी बोलण्याची नजाकत, त्याचे जीवन मृणालमय झाले होते. दोघांचे असे वेगळेच विश्व साकारत होते, दोघांच्या भूतकाळाला त्यात थारा नव्हता.
कलकत्त्यातील एका मध्यम वर्गात वाढलेली, आई बरोबर एकटीच राहत होती, ती ५ वर्षाची असताना घटस्पोट झालेला, पेशाने शिक्षिका मुलीला चांगले शिकवून कंपनी मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचा अनुभव मिळवून दिला. प्रथम पासून स्वच्छंदी आयुष्य जगणारी मृणाल मित्र मैत्रीणीत जरा ज्यास्तच रमणारी, मनमानी आयुष्य जगण्याची तिला चटकच लागली होती. बिपीन कलकत्त्यात वारंवार भेटत असे तेंव्हा पासून त्याच्या तडफदार व्यक्तीमत्वावर ती प्रथम दर्शनीच फिदा जाली होती. आणि आता थिंपूत राहण्यास उत्तम जागा भरपूर पगार, जीवनात योगायोग कसे घडून येतात, मुंबईचा कोण बिपीन कलकत्याची मृणाल आणि कुठे थिंपू, रेशीम गाठी कशा घट्ट बनतात हे कळतच नाही हे खरे.
बिपीनला जर्मनी वरून येणाऱ्या इंजिनीयर्स बरोबर महत्वाच्या चर्चा पारो ( विमानतळ ) ह्या गावी व पुनाखा या साईट वर करायची होती. तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाची संपूर्ण आखणी मृणालने केली होती. सन्ध्याकाळी ऑफीस सोडताना त्याने मृणालला सर्वांबरोबर यावे असे सुतोवाच केले. तिच्या मनाचा नेमका ठाव अजून लागत नव्हता, पण खडा तर टाकून पाहिला होता. या मीटिंगचा अनुभव तुला तुह्या भावी करीयर मध्ये फार मोलाचा ठरेल. तुझ्यापुढे ही एक सुवर्णसंधी आहे अशी एका बाजूनी भलावण केली, पण मी तुझ्यावर येण्याची अजिबात सक्ती करत नाही, विचार कर असा साळसूदपणा दाखवला. रात्री दोघे बरोबरच ऑफीस मधूनच बाहेर पडले, बाहेर प्रचंड गारठा आणी गार झोंबणारे वारे, बिपीनने आपला मफलर तिच्या गळ्याभोवती गुंडाळला, मृणाल गोड स्वप्नाच्या धुंदीत आपल्या घरी गेली, बिपीनच्या श्वासात ४ दिवस घालवायला मिळणार या कल्पनेत पार गुरफटून गेली, डोळ्याला डोळा लागत नव्हता, आयुष्यात आलेल्या अशा मोलाच्या संधीचा कसा उपयोग करायचा या विचारात ती मश्गुल झाली.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply