संगीता मुंबईतील एकाकी अर्थहीन आयुष्य रेटत होती. आता अश्रू सुद्धा आटून गेले होते, बॅंकेच्या कामात दिवस कसा बसा ढकलला जात असे, संध्याकाळ झाली की मनात वाईट विचारांचे काहूर माजत असे, रात्र तर वैऱ्याचीच असे, विजय व आईचा खंबीर आधार पाठीशी असल्याने दिवस पुढे जात होते, टे दोघे आपल्या परीने तिचे मन रीझविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते, जेवायचे म्हणून जेवायचा प्रयत्न करीत होती, काळवंडलेला चेहरा, कृश होत चाललेली शरीरयष्टी, सर्व चैतन्यच लोप पावले होते.
पोलीस ठाणे, चौकशीचा माहोल हे सर्व काळामागे नाहीसे झाले होते, जीवनातील प्रत्येक क्षण ओबड धोबड धोंड्या सारखा वाटेत येत होता, ना तो ढकलता येत होता, व ढकलावा तर मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करत होता, आता मौशु कशी दिसत असेल? रडून रडून काय करत असेल? नाना विचारांच्या वादळात तिचे तारू वारंवार खडकावर आपटत होते, अंधारातून अंधाराकडे चालले आयुष्य संपवण्याचे विचार मनात पिंगा घालत होते, कोणत्या आशेवर जीवन पुढे ढकलायचे? जगायचे तरी कशासाठी आणी कोणासाठी? यक्षप्रश्न कधीच न सुटणारे होते.
परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात. बिपीनच्या गत जीवनात डोकावून पाहण्याची तिला गरजच वाटत नव्हती. आपल्या दोघांच्या मिया बीबीच्या संसारात मौशुचे स्थान काहीच नसेल, ती आता मोठी झालेली आहे, आणि तिला सांभाळणारी जोगाना तिला आई समान आहे, या गोष्टी स्पष्ट कल्पना दोघांचा मार्ग मोकळाच झाला. दोघे चतुर्भुज झाले आणि मौशूच्या जीवनात म्हणाला एका नव्या आईचे आगमन झाले. अभागी मौशु आघातावर आघात झेलत होती. एक संसार उध्वस्त करून एका नव्या संसारात बिपीनने मोठया आनंदात प्रवेश केला होता. काळाची पावले वेगाने पडत होती.
मौशुनी आर्ट्स कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता, तिने भूतानी, हिंदी व इंग्रजी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. डोंग्जे रिनपोचे यांचे स्थान वड्लांपेक्षा फार वरच्या दर्जाचे होते. तिच्यावर उत्तम संस्कार देण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता.
गेली अनेक वर्षे ते मौशुचा सर्वांगीण बाजूने विचार करताना त्यांच्या हळूहळू असे ल आले होते की या मुलीच्या जीवनात असे काहीतरी अघटीत घडलेले आहे की ज्यामुळे तिच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात झालेला आहे, पण तो आता खोल मनात दबलेला आहे. काहीवेळा त्याना वाटे की हिला तिचा गतकाळ विचारावा, पण दुसऱ्या क्षणी वाटे नको, आपण जखमेवरची खपली काढले तर ती भळभळा वाहत राहील, आणि तिला सावरणे फारच कठीण जाईल. पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा तिच्या जीवनाला नवीन कलाटणी दयावी लागेल. पावले फार शिताफीने टाकावी लागतील.
बायको व आपल्या मुलीचे जीवन उध्वस्त करण्याचा आसुरी आनंद बीपिन आपल्या नव्या जीवनात लुटत होता, एका विकृत प्रवृत्तीचा विजय झाला होता, पण तो कायमचा राहणार का? हे काळच ठरवणार होता. मौशूच्या जीवनाला कलाटणी रिनपोचे देणार का?
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply