कलकत्याहून येताना बिपीन साहेबांची स्वारी एकदमच खुशीत होती, कंपनीला मोठाली बरीच कामे मिळाल्याने भरभराटीचे दिवस उगवले होते. येताना संगीताला बंगाली साड्या, गाऊन, गळ्यात घालायच्या मण्यांच्या माळा, मौशूला ड्रेसेस, खेळणी, विविध प्रकारच्या बंगाली मिठाया, खैरातच केली होती. मंगला बाई रजेवर असल्याने संगीता घरीच होती. बऱ्याच दिवसांनी आज दोघांनी रतीसुखाचा आनंद लुटला होता, या आनंदापुढे सगळी भांडणे नाहीशी होतात. सकाळी मौशु शाळेत गेल्यावर दोघांच्या मजेला उत आला होता. संध्याकाळी नटून थटून सगळे जण हॉटेल मध्ये गेले होते.
रात्री गप्पा गोष्टी करताना बिपीन गंभीरपणे सांगू लागला ‘संगीता आता आमची बरीच कामे सिक्कीम व नेपाळ मध्ये सुरु होणार आहेत, मला बरेच फिरावे लागेल, काही महिने मला तेथेच राहावे लागेल. मला असे वाटते की तू काही वर्षाकरता बॅंकेची नोकरी सोडावीस, आपल्या त्रिकोणी कुटुंबात आणखीन एकाची गरज आहे आणि मुलाना आईच ज्यास्त लागते नाही का? संगीता गप्पच होती, थोड्याच महिन्यात तिची झोनल मॅनेजर म्हणून नियुक्ती होणार होती, शब्दाने शब्द वाढवत उगाच खटके नकोत म्हणून तिने विषय बदलत त्याच्या कामा बद्दल माहिती विचारू लागली. दोन महत्वाकांक्षी व्यक्ती एकमेकांसमोर टक्कर देण्यास सज्ज होत्या. संगीता दोन मुलांची जबाबदारी घेण्यास तयार तर नव्हतीच, आणि नोकरी सोडून घरात बसण्याचा विचारही करू शकत नव्हती, तिच्या मनाच्या पठडीतच बसणारे नव्हते. मंगलाबाईवर दोन मुलांची जबाबदारी मी मुळीच टाकणार नाही, आपली चाललेली गाडी सुखाची आहे, तू कामाकरता जरूर बाहेर राहू शकतोस.
त्याचा पुरुषी अहंकार डिवचला गेला होता, ठिणगी तर पडली होती, आगीचा डोंब केंव्हा उफाळेल हे कालच ठरविणार होता. संगीताने त्याला ण सांगताच संतती नियमाची व्यवस्था केल्याने ती त्या बाबत निर्धास्त होती.
रात्रीचे १२ वाजून गेलेले. संगीता थकून पलंगावर पहुडलेली, बिपीनची येण्याची वाट पाहात जागे राहण्याचा प्रयत्न करत होती, १ वाजता स्वारी दारूच्या पूर्ण नशेत बेडरूममध्ये शिरली, प्रेमाचे शिसारी आणणारे चाळे करत जबरदस्तीची परिसीमा गाठली होती, काही मिनिटातच संभोगाचे अंतिम क्षणिक सुख मिळवून तो गाढ झोपी गेला. दारूच्या वासाने आणि या किळसवाण्या प्रकाराने तिच्या भावनांचा चोळामोळा झाला होता. त्याच्या वागण्यातील बीभत्स अहंकाराने ती होरपळून निघाली होती.
बिपीन कामानिमित्त बाहेर गावी गेल्याने तिला हायसेच वाटले होते. ही संधी साधून आईला राहण्यास बोलाविले होते. संध्याकाळी मौशु शाळेतून आली, आणि आईला पाहून ती प्रथम बुजलीच, दोघींचा फारसा सहवास नव्हताच, पण हळूहळू आजीशी छान गट्टी जमली, पत्ते, खेळणी, एकमेकींना गोष्टी सांगता रात्रही पुरली नाही. लहान मुले किती निष्पाप असतात ना! कित्येक वर्षांनी संगीता व आई मनमोकळे पणाने गप्पागोष्टीत दंग झाल्या होत्या. शेवटी आईची माया, तिच्या संसारातील कटू कथा ऐकून आई तर अतिशय दु:खी झाली होती, पण ती तरी काय करू शकणार होती. आईच्या आग्रहास्तव हिंदू कॉलनीमधील आपल्या माहेरी तिघी जणी आल्या. दारावरील नाव शैलजा मराठे हे मराठी नाव आणि आपल्या घरावर नायर नाव तिला कुतहूल वाटले, ती आईला खोदून विचारत होती, पण संगीताने दुर्लक्ष करत विषय बदलला, दोघी जणी इतक्या खुश होत्या, मायेच्या पांघरुणाची गोडी अवीट होती. दोन दिवसांनी मौशूच्या हट्टामुळे आजी त्यांच्याबरोबर परत बांद्र्याच्या घरी आली. यावेळी बिपीन पुढे न नमता आईला आपल्या घरी काही दिवस ठेवायचेच असा निश्चय केला, मौशुची ती गरज आहे हे त्याच्या गळी उतरवायचंच. संगीता परत कामावर रुजू झाली होती, आजी मौशु बरोबर छान वेळ घालवत होती, आज तीची शाळा अर्धा वेळच असल्याने आजी लवकरच तिला घेऊन घरी आल्या होत्या, तिला कौतुकाने जेवण भरवीत होत्या, अचानक घराची बेल वाजली, आणि बिपीन दारात दत्त उभा, आजी गोंधळूनच गेल्या, सावरतच त्या मौशूला हाक मारत प्रेमाने बोलू लागल्या हे बघ कोण आले आहे?आजीना पाहताच त्याचे डोके तर सणकलेच पण मौशु तर इतकी येऊन बिलगली त्यामुळे स्वारी जरा नरमली. आपल्या खोलीत जाऊन तिचे लाड करू लागला, प्रेमाचा जरा अतिरेकच आहे असे आजीला वाटत होते. आईची साधी चौकशीही केली नाही, आईनी प्रेमाने त्याचे जेवणही वाढण्यास सुरवात केली, पण मला काही जेवायचे नाहीये, असा नन्नाचा सूर लावला. आज संगीताला येण्यास बराच उशीर होणार होता, मौशु काय? ती टीव्हीत रमली होती. आईला काही सुचत नव्हते, तोच स्वारी आईंना सांगू लागली, ’मी आता घरीच आहे, तिची आई तर १२ शिवाय उगवतच नाही, खर तर तुम्हाला थांबायची गरजच नाही, आत्ता तुम्हाला घरी जाताना गर्दी पण कमी मिळेल. हे कटू शब्द तिने ऐकले आणि तात्काळ बॅग भरली आणि घरी जाण्यास निघाली, मौशु झोपलेली असल्याने एक क्षणभरही न घालवता जड अंत:करणाने घरी जाण्यास निघाली. अनंत विचारांचे काहूर माजले होते, मुलीचे व नातीचे सुख आपल्याला नाही हे कटू सत्य पचविणे फारच जड जाणार होते.
संगीताचे काम लवकर आटोपल्याने ती लवकरच घरी पोहचली. येताना आईला मनापासून आवडणारा खरवस आणला होता. घरात शिरताच दारात बिपीन, आणि निघून गेलीली आई, परत रागवा रागवी, दोघांचा चढलेला पारा भांडणाने परिसीमा गाठली होती. क्रूर नियतीची पावले वेगाने पडत होती.
मौशु जसजशी मोठी होत होती, तसतशी मंगला बाईंचे ऐकेनाशी झाली होती. त्यात हल्ली बिपीन बराच वेळ घरात थांबत असे, तिचे लाड आणि प्रेम अतीच होत चालल होत. मंगला बाईना कधी एकदा कामावरून काढू याची त्याला घाई झाली होती. संगीताची कोंडी करण्याचा सुप्त डाव त्याने खेळण्यास सुरवात केली होती.
एके रात्री त्याने संगीता बरोबर आपला नेहमीचा वादाचा विषय काढला. ’संगीता, तू आई म्हणून मौशूच्या वाट्याला फारशी येतच नाहीस. मंगला बाई काय आईची जागा घेऊ शकत नाहीत आणि ते मला आवडतही नाही, आता मात्र संगीताचा तोल सुटला, ’हे बघ मी नोकरी सोडून घरात नुसती मुलीकडे लक्ष ठेवण्याकरता थांबणार नाही, माझ्या दृष्टीने त्या तिला व्यवस्थित सांभाळतात, बरे एकीकडे तू म्हणतोस तुझे टुरिंग चालूच राहणार आहे, त्यातून तुला जेव्हां घरी राहून मौशुला वेळ देऊ शकतोस, पण मंगला बाई घरात राहणे नितांत गरजेचे आहे. बिपिनचा अहंकार हादरून गेला होता, आता डोक्यात सूडचक्राचे थैमान माजले होते, माझ्या कोणत्याही मताला संगीता ठुकरावून लावत होती. त्याची पावले वेगळ्याच दिशेने पडत होती.
एके दिवशी सकाळी त्याने संगीताला आपल्या एक धाडसी प्रस्ताव मांडला. ’मी काही महिने घरातूनच काम करणार आहे, काही काळ आपण आपल्या भूमिकाच बदलू या, मी घर सांभाळतो, तुझा पगार चांगलाच आहे. समाजापुढे आपण एक वेगळा आदर्श ठेऊ शकू. काळाची पावले ओळखायला हवीत. आणि मी काही कंपनी सोडत नाही माझी सल्लागार म्हणून नेमणूक राहील. त्याच्या या विचित्र निर्णयाने ती चांगलीच बुचकळ्यात पडली. याच्या घरे राहण्याने मंगला बाईंची चांगलीच कुचंबणा होऊ लागली. आता तर बिपीन व मौशु विरुद्ध त्या अशी विचित्र कोंडी सुरु झाली. एके दिवशी त्यानी गोड शब्दात आपण काम सोडत असल्याचा निर्णय संगीताला सांगितला, तिने नाना परीने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला पण फासे उलटे पडत होते. त्यांचे वास्तव्य संपले आणि तिच्या पुढे गंभीर प्रश्न उभा राहिला, मौशुचे काय करायचे? तत्परतेने तिची शाळेत नेण्या – आणण्याची, सन्ध्याकाळी बागेत खेळावयास नेण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. मौशूला तर बाबा फारच आवडायला लागला होता. कोणताही वितंडवाद नको म्हणून संगीता बिपीनशी फारसा संवादही करत नसे. ती बाया मिळविण्याच्या जेवढी प्रयत्नात होती, तेवढाच तो प्रत्येक गोष्टीत मोडता घालत होता. संसाराची घडी विस्कटत चालली होती. दिवसा मागून दिवस चालले होते, नशिबात काय वाढून ठेवले आहे हे कालच ठरवणार होता.
डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply