माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला (‘वाटेवरच्या कविता’) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.
सुरेंद्र देशपांडे- आमचे नातेवाईक (खरेतर जिंदादिल मित्र) यांचा तात्यासाहेबांशी जिव्हाळ्याचा घरोबा होता. (सुरेंद्र देशपांडे यांचे पिताजी तात्यासाहेबांचे जिवलग स्नेही ! तो स्नेह पुढील पिढीतही उतरला होता.)
सुरेंद्र आम्हाला तात्यासाहेबांकडे घेऊन गेले. अकृत्रिम स्नेहाने अपरिचितांचेही स्वागत करणे ही तात्यासाहेबांची खासियत ! (उगाच आख्खे नाशिक शहर त्यांच्या अधिपत्याखाली नव्हते ! एका कवीची एका गावावर अधिसत्ता हे आजच्या काळात दुर्मिळच नाही का?) परिचय झाल्यावर थोडे बोलणे झाले.
मी भीत -भीत त्यांना – “काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही” या गाण्याची पार्श्वभूमी विचारली . शांतपणे ते म्हणाले -“हे एक प्रेमगीत आहे.” माझी समजूत काही वेगळीच होती म्हणून मला वेगळे उत्तर हवे होते पण…
कवितांची वही ठेवून घेत ते म्हणाले – “वाचून कळवितो.”
निघताना मी त्यांना म्हणालो – “आपल्याला ज्ञानपीठ मिळाल्यावर मी इस्लामपूरहून अभिनंदनपर पत्र पाठविले होते आणि आपण स्वहस्ताक्षरात त्याची त्वरित पोचही पाठविली होती. (आजही त्यांचे ते पत्र माझ्या संग्रही आहे.)
यावर तोच शांत स्वर म्हणाला – “हो ! जवळ जवळ १०,००० हून अधिक पत्रे आली होती ,त्या सर्वांना मी लेखी पोच देऊन शुभेच्छांचा स्वीकार केला.”
ही “अभिजात” असण्याची खूण !
साहित्यिक म्हणून तर ते आपल्या नजरपल्याड होतेच पण एक व्यक्ती म्हणूनही ते तितकेच थोर होते. सहसा हे कॉम्बिनेशन मला आढळत नाही, बहुदा माझ्या निरीक्षणाला /अनुभवाला हा अपवाद असावा.
काही दिवसांनी त्यांचे छोटेसे अभिप्राय -पत्र आले. काव्यसंग्रह आणि आम्ही भरून पावलो!
–डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply