कुठे कशी भेटू तुला,
घर भरले पाहुण्यांनी,
चोरटी ती पहिली भेट,
गेली मला थरथरवुनी ,!!
होता आपुली नजरानजर,
माझी न राहिले मी,
दुसरे काही नसे डोळ्यात,
जीव कातर कातर होई,–!!!
घर अपुरे पडे आता,
जरी असे ते दुमजली,
स्वतःचाच नसे पत्ता,
तुलाच शोधे ठिकठिकाणी–!!!
साजिरी मूर्त बघता,
अंत:करण फुलून येई,
आत होते चलबिचल,
छळते जिवाला अस्वस्थता,–!!!
पाहते तुझ्या प्रत्येक कृतीला, न्याहाळून ग बाई,
मनात मात्र उठे वादळ,
ढवळून निघते सारी शांतता,–!!
लागला रोग कोणता,
खाणेपिणे सुचतच नाही, काळजात उठते आवर्त,
रात्रीचा काळ तर जागता,–!!!
नुसते पहाया जीव पिसा,
ओढ किती तुझ्या स्पर्शाची,
डोळे फक्त भिरभिरत,
कुठे दिसशील ओझरता,–!!!
आवाज तुझा केवळ ऐकण्या, अधीर मी होते केवढी,
जिवाचा मग करून कान,
ऐकते रे मी बापुडी,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply