MENU
नवीन लेखन...

कुत्र्यांशी मैत्री

बहुतेक सर्व माणसाळलेले प्राणी हे माणूस शेती करून स्थिर जीवन जगू लागल्यांनंतर माणसाळले गेले आहेत. माणसानं शेतीची सुरुवात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी केली. शेती करण्याच्या अगोदर हजारो वर्षं माणूस हा शिकारीवर जगत होता. कुत्रा हा असा एकच प्राणी असावा की, ज्याची माणसाशी मैत्री, माणूस शिकार करून जगत होता त्या काळापासूनची आहे. आतापर्यंत सापडलेले कुत्र्यांचे काही अवशेष, कुत्रे हे दहा हजार वर्षांच्या अगोदरच्या काळापासून अस्तित्वात असल्याचं दर्शवतात.

कुत्र्याची उत्क्रांती ही लांडग्यापासून (ग्रे वोल्फ) झाली असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून येतं. लांडगे हे शिकार करून जगणारे मांसाहारी प्राणी. शिकार करणाऱ्या माणसांच्या जवळपास राहिल्यानं, माणसानं टाकून दिलेल्या शिकारीचा भाग आयताच मिळू शकतो, हे या लांडग्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे लांडगे हे माणसांच्या आसपास घुटमळू लागले. त्यानंतर त्यातील काही लांडगे हे माणसांना शिकारीला मदतही करू लागले. माणसाच्या संपर्कात आल्यानंतर, यांतील ‘मवाळ’ लांडग्यांची हळूहळू उत्क्रांती होऊन त्यांचं रूपांतर कुत्र्यांत झालं आणि हे कुत्रे माणसाचे मित्र बनले. कुत्रे व माणसांच्या या मैत्रीची सुरुवात कुठे व केव्हा झाली, याचा अनेक संशोधक गेली अनेक वर्षं शोध घेत आहेत.

इंग्लडमधील डर्‌हॅम विद्यापीठातील अँजेला पेरी यांनी याच विषयावर, इतर विद्यापीठांतील आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या अलीकडील संशोधनातून, काही अतिशय महत्त्वाची माहिती बाहेर आली आहे. अँजेला पेरी आणि तिच्या सहकाऱ्यांनी जगभरच्या सुमारे दोनशेहून अधिक प्राचीन कुत्र्यांच्या जनुकीय आराखड्यांचं अधिक तपशिलवार विश्लेषण केलं. त्यात त्यांना सर्व अमेरिकन कुत्र्यांत ‘ए२बी‘ ही एक विशिष्ट जनुकीय खूण आढळून आली. या खुणांतील फरकांवरून, अमेरिकन कुत्र्यांचे सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी चार वेगवेगळे गट निर्माण झाल्याचं त्यांना दिसून आलं. उत्तर अमेरिकेतील मानवी वसतीची सुरुवातही सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी झाली असावी. ही माणसं, आजच्या रशियातील सायबेरिआतून स्थलांतरित झालेली माणसं असल्याचं जनुकीय अभ्यास दर्शवतो. या दोन्ही घटना जवळपास एकाच काळात घडल्या आहेत, हे लक्षात घेण्याजोगं आहे!

आपल्या संशोधनात अँजेला पेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यानंतर आणखी एक पुढचा टप्पा गाठला. ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली. उत्तर अमेरिकेत आलेल्या माणसांचं सायबेरिअन मूळ, अमेरिकेत आलेल्या कुत्र्यांचं सायबेरिअन मूळ, दोन्ही घटना घडण्याच्या काळातील साधर्म्य, यावरून कुत्रे हे या सायबेरिआतील माणसांबरोबरच उत्तर अमेरिकेत पोचल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला.

या सर्व संशोधनावरून अँजेला पेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुत्र्याच्या उत्क्रांतीचं व कुत्र्याच्या माणसाळवण्याचं चित्रं उभं करणं शक्य झालं आहे. जेव्हा कुत्र्यांची निर्मिती झाली तो काळ होता, तेवीस हजार वर्षांपूर्वीचा. हा काळ हिमयुगाचा काळ होता, म्हणजे अत्यंत तीव्र थंडीचा! सायबेरिआतील हवामान तर अतिथंड. त्यामुळे इथल्या माणसांना काय किंवा लांडग्यांना काय… कुठल्यातरी त्यातल्या त्यात उबदार प्रदेशाचा आश्रय घ्याला लागला होता. त्यामुळे ही माणसं आणि हे कुत्र्याचे पूर्वज वायव्य सायबेरिआतील उबदार प्रदेशात मुक्कामाला आले असावेत. एकाच प्रदेशात राहिल्यानं ही माणसं आणि लांडगे एकमेकांच्या संपर्कात आले व तिथूनच हे लांडगे माणसाळायला सुरुवात झाली. हिमयुग ओसरल्यानंतर, वायव्य सायबेरिआतल्या या कुत्र्यांचं सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी, माणसांच्या साथीनं पूर्वेकडे अमेरिकेत व पश्चिमेकडे युरोपात स्थलांतर झालं असावं.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/5yti6ce5ik0?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: John Woodhouse Audubon and William E. Hitchcock – Linda Hall Library

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..