नवीन लेखन...

कुटुंब आणि आजची स्त्री

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी स्त्रीचं चार ओळीत यथार्थ वर्णन केलं आहे. ते म्हणतात,
“पोराटोरा, घरचा, भायला
बायलांर जास्ती वजां..
टिकली तेची लावन् समाळतत
पुरुष प्रधान,ती राजा..!!”

श्री. सौदागरांनी स्त्रीचं ‘राजा’ म्हणून अगदी योग्य वर्णन केलंय. स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो. पुर्वीच्या काळातही तिची भुमिका कण्याची होती, आजही आहे आणि उद्याही राहाणार आहे. कुटुंबांची व्याख्या काळानुसार बदलत गेली. माझ्या लहानपणी कुटुंब म्हणजे सर्व सख्खे-चुलत धरून १५-२० जणांचं असायचं. त्याकाळीही त्या विस्तारीत कुटुंबाचा कणा स्त्रीच असायची. त्या काळी, म्हणजे साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी, स्त्रीया शिकत असल्या, तरी ते तेवढ्यापुरतंच असायचं. कित्येकींना तर आई-वडिलांनी लग्न करून दिलं म्हणून शिक्षण सोडावं लागायचं. शिक्षणाचा संबंध तेव्हाच्या काळी आजच्यासारखा अर्थर्जनाशी लावलेला नव्हता.

कुटूंब ही संस्थाच मुळी स्त्रीयांमुळे सुरु झाली आहे. कुटुंब व्यवस्था अवतरण्यापूर्वी मनुष्य भटक्या अवस्थेत होता. शिकार, कंदुमळं जिथे मुबलक प्रमाणात मिळेल, अशा जागेच्या शेधात भटकत जायचं. अशी जागा मिळाली की तेथील अन्न
संपेपर्यंत तिथे राहायचं आणि त्या ठिकाणचं अन्न संपलं, की मग पुन्हा नविन जागेच्या शोधात निघायचं. हाच घटनाक्रम वर्षानूवर्ष चालू असायचा. त्या काळचं मनुष्य जीवन, माणसापेक्षा प्राण्यांच्या जवळचं होतं. पुढे कधीतरी शेतीचा शोध लागला आणि मग एकाच जागी राहूनही अन्न मिळवता येतं, हे माणसाच्या लक्षात आलं आणि भटका माणूस स्थिर झाला.

शेतीच्या शोधाला कारणीभूत झाली, ती स्त्री. याचाच अर्थ असा, की मनुष्य’प्राण्या’ला ‘माणूस’ म्हणून ओळख मिळवून दिली, ती स्त्रीने. शेतीचा शोध ही मनुष्याच्या उत्क्रांतीतील अतिशय महत्वाची घटना ठरली कारण ‘प्राण्यां’सम जीवन जगणारा माणूस, इथून पुढे ‘मनुष्य’ म्हणून जगू लागला. भटका मनुष्य स्थिर झाला आणि नवरा-बायको-मुलं कुटुंब व्यवस्था आकाराला आली. स्त्री जन्मदात्री होतीच, आता ती कर्तीही झाली..!

मनुष्यप्राण्याला माणूस बनवणारी आणि जिच्यामुळे कुटुंबव्यस्था जन्माला आली, ती स्त्री त्या कुटुंबाचा कणाच कशाला, पायाही न होती, तरच नवल. स्त्री हा कुटूंबव्यवस्थेचा पाया झाली, तो आजतागायत आणि पुढेही राहील. स्त्री ही नुसतीच कुटुंबाचा कणा नाही, तर जागायचं कशाला हे शिकवणाऱ्या संस्कृतीचा स्त्रोतही आहे. प्राणी अवस्थ्तून मनुष्य अवस्थेत येताना एक ठळक फरक घडला आणि तो म्हणजे मनुष्य सुसंस्कृत होत गेला. संस्कृतीला स्त्रीनेच जन्म दिला असावा, हे ‘संस्कृती’ या स्त्रीलिंगी शब्दांवरूनही कळते.

तेंव्हापासून ते कालपर्यंतच्या घटनांचा स्त्रीच्या संदर्भातून आढावा घ्यायचं म्हटलं, तर एक अख्खं पुस्तक होईल. त्यामुळे स्त्री आणि कुटुंब यांच्यातील संबंधावर आजच्या काळापुरता थोडासा स्पर्श या लेखात केला आहे.

कुटुंबाचा कणा असलेली स्त्री आज घर आणि कार्यलय अशा दोन आघाड्यांवर लढताना दिसतेय. तिची दमछाक होतेय हे खरं असलं, तरी शक्तीचा अमर्याद स्त्रोत असलेली ती, या दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे लढताना दिसतेय. पूर्विची विस्तारीत कुटूंब मेडकळीला येऊन आता न्युक्लिअर फॅमिलीची पद्घत आली. नवरा-बायको आणि एखाद दुसरं मुल असलेल्या या कुटूंबातील स्त्रीला कुटुंबाच्या वाढत्या खर्चला तोंड देण्यासाठी नोकरी करणंही गरजेचं बनलंय. यात मुलं, त्यांचं शिक्षण, संस्कार, कुटूंब आणि कार्यालयीन आव्हानं अशा देन्ही बाजू तिला सांभाळायला लागतातय. कालपर्यंत घरात असणारी स्त्री, अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्याने, तिची नवनविन क्षितिजं धुंडाळण्याची आसं वाढू लागली. कर्तुत्वाची नविन क्षेत्र तिला खुणावू लागली.

तिच्या आयुष्यात आता ‘करीयर’ नांवाची एक नविनच नवलाची गोष्ट आली. गेल्या काही वर्षातील सर्वच क्षेत्रातील घटनांवर नजर टाकली, तर घराबाहेरची जबाबदारीही स्त्री समर्थपणे पेलताना दिसते. असं असलं तरी, काही तुरळक अपवाद वगळता, जेंव्हा कुटुंब आणि करीयर यातील कुठलीही एक गोष्ट निवडायची पाळी येते, तेंव्हा मात्र स्त्री कुटूंबाला प्राधान्य देताना आढळते. पुरुषाच्या कर्तुत्वाला आभाळ मोकळं करुन देताना दिसते. उगाच नाही ‘प्रत्येक कर्तुत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असं म्हणत. आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था आता हळुहळू मागे पडताना आढळत असली, तरी अजून ती म्हणावी तशी संपलेली नाही. काही कुटुंबांमधे मात्र त्या कुटुंबातील स्त्रीतल्या पोटेन्शिअलला ओळखून तिला त्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचा खंबिर पाठिंबा मिळू लागलाय. हे चित्र अजुनही दुर्मिळ असलं, तरी आश्वासक आहे.

आजही कुटुंबाचा कणा स्त्री आहे आणि त्याचं कारण स्त्री ही जन्मदात्री आहे. निसर्गाच्या नविन पिढीच्या जडण-घडणीची जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली आहे आणि त्याकरीता तिच्यात विलक्षण शक्तीही भरलेली आहे. तिला भले अबला वैगेरे म्हणोत परंतू ती शक्तीमान आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रसंगी ती जो लढा देते, तो पुरुषाला कदापीही देणे शक्य नाही. म्हणून तर आपल्या पुरांणामधे जेंव्हा जेंव्हा देवांवर संकट कोसळलं, तेंव्हा तेंव्हा देवांनी केणत्या न कोणत्या देवीला साकडं घातलेलं आढळतं. विष्णूलाही भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनीरुप धारण करावं लागलं होतं. देव देवांच्या मदतीला स्वस्वरुपात धावल्याची उदाहरण अगदी दुर्मिळ आहेत..!

कुटुंबाचा पाया, कणा एवढंच कशाला तर प्रत्येक कुटुंबाचा जीवच स्त्रीमधे असतो. लहानपणीच्या गोष्टींत कसा एखाद्या राजाचा प्राण एखाद्या पोपटात ठेवलेला असायचा, तसा. स्त्रीशिवाय कुटूंबं अशक्य आणि कुटूंबाशीवाय समाज अशक्य. म्हणून तर स्त्री हा केवळ कुटुंबांचाच नव्हे, तर समाजाचा आणि पर्यायाने एखाद्या देशाचाच पाया असतो. म्हणून ज्या समाजात स्त्री दुय्यम होते, त्या समाजाचं भवितव्य अवघड होते. मध्यपूर्वेतील देशात आजही स्त्रीयांना, स्त्री म्हणून अनेक बंधनांना तोंड द्यावं लागतं. तेथील देश खनिज तेलामुळे समृद्ध जरी झाले असले, तरी संस्कृतीच्या पातळीवर ते अजून प्राणी अवस्थेतच आहेत. याचं कारण स्त्रीचं दमन. कुटुंब, समाज आणि देश यांचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर कुटुंब आणि स्त्री यांचं नातं ओळखून त्याप्रमाणे समाजव्यवस्था निर्माण करायला लागेल. स्त्रीमधील प्रचंड उर्जेला वाव द्यावा लागेल अन्यथा ती ज्वालामुखीसारखी उसळून बाहेर यायला वेळ लागणार नाही. फरक एकच असेल, ज्वालामुखी विध्वंस करतो तर स्त्री काहीतरी विधायक करेल. या दोघात साम्यही आहे. ज्वालामुखीच्या विध्वंसातून नवसर्जन होते आणि स्त्री तर स्वत:च सर्जन आहे.

— नितीन साळुंखे
9321811091

फोटो सौजन्य – जगद्गुरू इंटरनेट

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

3 Comments on कुटुंब आणि आजची स्त्री

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..