व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख
माणसामाणसांच्या नात्यातून कुटुंब बनते, तर नात्यांपलीकडील भावनांतून परिवार घडतो. परिवार उमजायला भावनांची गरज असते. कुटुंब आणि परिवार यातील परस्पर भिन्नता, पूरकता विषद करणारा लेख
कुटुंब आणि परिवार हे दोन्ही शब्द उच्चारताच प्रेम, जिव्हाळा, आधार, विसावा, बांधिलकी हे सारे भाव आपल्याला जाणवतात.
‘आपलेपणा’च्या मुशीतूनच हे दोन्ही शब्द तयार झाले आहेत. सर्वस्वी परावलंबी असा नवजात चिमुकला जीव जेव्हा भूतलावर अवतरतो, तेव्हा त्याच्या पोषणासाठी, संवर्धनासाठी कनवाळू जगन्माऊली अशा परमेश्वराने त्याच्या जन्मदात्रीजवळ दुधाची शिदोरी दिलेली असते. एवढेच नव्हे, तर त्याच्या मातापित्यांच्या हृदयात विलक्षण प्रेमाचा झराही निर्माण केलेला असतो. त्या चिमण्या जिवाला एवढे निरागस गोजिरे रूप देवाने बहाल केलेले असते, की त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याबद्दल माया वाटावी आणि त्या मायेच्या छायेखाली तो परावलंबी जीव बघता बघता स्वावलंबी बनावा!कोणत्या कुटुंबात आपला जन्म व्हावा, हे माणसाच्या हाती नसते, हे वास्तव असले तरी भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा येथे आधार घ्यावासा वाटतो. ज्याची सन्मार्गावरून वाटचाल सुरू झाली आहे, अशा माणसाला मध्येच मृत्यूने गाठले तर त्याची ती वाटचाल विरून जाते का, या अर्जुनाच्या साक्षेपी प्रश्नावर भगवंतांनी दिलेले उत्तर फार दिलासादायक आहे. ते म्हणतात, “अरे बाबा, सत्कर्म करणारा कोणीही कधीही दुर्गतीला जात नाही, उलट सन्मार्गाची वाटचाल मध्येच खंडित झालेल्या त्या योगभ्रष्टाला…
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ (अ.६ श्लो.४१)
सुसंस्कारांनी अत्यंत संपन्न अशा कुटुंबात पुढील जन्म मिळतो ” याचाच अर्थ माणसाच्या पूर्व संचितानुसार, प्रवृत्तीनुसार त्याला तसे कुटुंब लाभत असते.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला पहिला आकार त्याच्या कुटुंबातूनच प्राप्त होतो. या आपल्या आकाराला पैलू पाडणे मात्र ज्याच्या त्याच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे. सर्व माणसांना जीवनाच्या कृतार्थतेसाठी ऋषी, पितर, मनुष्य, भूतमात्र व देव यांचे जन्मजात ऋण असते अशी भारतीय नीतिकल्पना आहे. ऋषींचे ऋण स्वाध्यायाने, पितरांचे ऋण स्वधर्मपालन करणारी प्रजा निर्मून फिटते. अर्थात ब्रह्मचर्याश्रमातील आपले अध्ययन व्यवस्थित, मनापासून केले आणि आयुष्यभर विद्यार्थी वृत्ती जोपासली की ऋषींचे ऋण फेडले जाते. शिक्षणामुळे अर्थार्जनही चांगले होऊ शकते. नंतर गृहस्थाश्रम स्वीकारून आपल्या कुळाचा वंश पुढे चालविला की पितरांचे ऋण अंशतः फिटते. अंशत: अशासाठी की नंतर वृद्ध झालेल्या मातापित्यांना समाधानात ठेवण्याने पितरांचे ऋण पूर्ण फिटते. ही दोन ऋणे रक्ताच्या नात्याने बांधलेल्या कुटुंबाच्या चौकटीत फेडता येतात. मात्र नंतरच्या मनुष्य आणि देवांचे ऋण फेडण्यासाठी कुटुंबाहून व्याप्तीने मोठा असलेल्या, मानलेल्या नात्याचा परिवार लागतो.
कुटुंबासारखेच आपलेपण परिवारात असते, किंवा असले पाहिजे. माणसामध्ये जन्मजात असलेल्या ‘मी आणि माझे’ या भावनेचा विस्तार कुटुंबाकडून परिवाराकडे होताना दिसतो. चुलत, आत्ये, मामे, मावस भावंडांची कुटुंबे एकत्र आल्याने आईवडील व मुले या चौकोनी कुटुंबाची व्याप्ती वाढते. यांच्यातील आपलेपणाचा भाव वृद्धिंगत व्हावा, म्हणूनच कुळधर्म, कुळाचार, कौटुंबिक कार्ये एकत्र मिळून पार पाडली जातात. त्यामुळे सुखदुःखाच्या प्रसंगी एकटेपणाची खंत राहात नाही. पण हा झाला कौटुंबिक रक्ताच्या नात्यांचाच परिवार. पण विशिष्ट ध्येयधोरणांनी, श्रद्धांनी एकत्र बांधले गेलेल्या माणसांचा, नातेसंबंध नसताही निर्माण होणाऱ्या परिवारामुळे खरा आंतरिक विस्तार होऊ शकतो.
या परिवारातील प्रमुख स्थानावरच्या व्यक्ती एकापेक्षा अनेक असू शकतात. त्या व्यक्तींचे आयुष्य पारदर्शी व सर्वसमावेशक असावे लागते. तरच ते आपल्या परिवाराला घट्ट बांधून त्याचे संवर्धनही करू शकतात.
‘परिवार’ या शब्दातच मांगल्य आहे. तो विधायक कार्यासाठीच निर्माण होतो. विघातक कार्यासाठी जे एकत्र येतात, त्यांना ‘परिवार’ म्हटले जात नाही. ती फक्त संघटना असते. उदाहरणार्थ दहशतवादी संघटना. ‘परिवार’ हा मात्र मानवतेच्या पूजेसाठीच असतो. वर उल्लेखलेले मनुष्य व देवऋण या परिवाराद्वारे फेडता येतात. गरजवंत, असहाय्य माणसांना आधार देण्याने मनुष्यऋण फेडता येते. ही मानवतेची भावना माणसात मूलतः असतेच, फक्त ती जागृत करून प्रज्वलित करावी लागते.
एखाद्या नैसर्गिक आपत्तीने कोसळून पडू पाहणाऱ्या माणसांना हात देऊन परत उभे करायचे काम अशा परिवारातून होते. देशाच्या संस्कृतिजतनाचे, संरक्षणाचे कार्यही या परिवाराकडून घडते. हा परिवार किती घट्ट बांधला जाऊ शकतो व विस्तारू शकतो, याचे साक्षात उदाहरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात आपल्याला दिसते.
देवऋण फेडणाऱ्या मानवाच्या परिवाराची कक्षा तर क्षितिजाहूनही अधिक वाढते. येथे ज्ञानोबा माऊलींच्या विख्यात ओवीची आठवण होते.
हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।
केवळ आपल्या देशातील लोकांसाठीच नव्हे तर सर्व जगातील लोकांच्या, प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी जे झटतात, त्यांचा परिवार देवऋण फेडू शकतो. अवघ्या विश्वालाच स्वतःचे घर मानणाऱ्या महामानवाचा परिवार चराचरच होतो.
– डॉ. अनुराधा कुलकर्णी
(व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख)
Leave a Reply