नवीन लेखन...

कुटुंब की करिअर?

“अभिनंदन सुरुची तुझं प्रेझेन्टेशन फारच मस्त झालंय. तू ज्या गोष्टी आज मांडल्यास त्या ऐकून आपले डायरेक्टर तर फारच खूष झाले. आपल्या कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी तू जमवलेली माहिती आणि संशोधन अतिशय कौतुकास्पद आहे. नवीन प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होणार आणि त्यात तुझा महत्त्वाचा वाटा असणार’.

‘धन्यवाद सुजय… आणि हो… तुझंही अभिनंदन. कारण या प्रोजेक्टचा मॅनेजर तू आहेस…
माझे विचार आणि कल्पना तुला प्रत्यक्षात आणायच्या आहेत.”

‘अरे… हो… तू सोबत असताना त्यात अवघड काय आहे? आपण नक्कीच हा प्रोजेक्ट यशस्वी करू.’

सुजयला सुरूचीची हुशारी, हजरजबाबीपणा, तिची धडपड आणि हाती घेतलेले काम मनापासून पूर्ण करण्याची उमेद सगळंच खूप आवडायचं. एवढंच नाही तर तिचा वक्तशीरपणा, फॉर्मल आणि अंगभर कपड्यांमध्ये तिचे वावरणे, सर्वांशी आदबीने बोलणे, सतत हसतमुख असणे… सुरुचीचे कामच नाही तर तीच सुजयला आवडायला लागली होती. तिचे प्रेझेन्टेशन चालू असताना तिच्याकडेच तो एकटक बघत राहायचा. तिचा आवाज त्याच्या कानावर येत राहायचा… पण तो वेगळ्याच दुनियेत असायचा. नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने तर आता दोघे सतत बरोबर असायचे त्यामुळे तर दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आणि एक दिवस सरळ त्याने तिला प्रपोज केलं. सुरुचीलाही सुजय आवडू लागला होता. तो कर्तबगार, हुशार, मेहनती आहे आणि दिसायलाही रुबाबदार आहे हे तिला माहिती होतं, परंतु तिने विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला. मला रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट मध्ये करीअर करायचे आहे, लग्नानंतरही मी माझे क्षेत्र सोडणार नाही. याबाबत तूही विचार कर असे त्याला सांगितले. सुजयने याबाबत संमती दर्शवली. त्याच्या आईवडिलांनाही सुरूची ‘सून’ म्हणून अगदीच पसंत होती आणि सुरूचीच्या आई वडिलांनाही सुजय ‘जावई’ म्हणून खूप आवडला. दोघांचे लग्न अगदी थाटामाटात पार पाडले.

दोघेही एकाच कंपनीत एकाच प्रोजेक्ट वर काम करीत होते. तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मात्र सुरूचीला दुसऱ्या कंपनीमध्ये खूप चांगली ऑफर मिळाली आणि ती नवीन ठिकाणी रूजू झाली. लग्नानंतर चार महिन्यातच तिची नवीन नोकरी सुरू झाली, त्यामुळे पहिल्या वर्षातील सणवार, घरगुती समारंभ यामध्ये सहभागी होणं तिच्या दृष्टीने अवघड होते. बऱ्याच वेळा ऑफिसमधून यायलाही तिला उशीर व्हायचा. रिसर्च वर्कमध्ये ती पूर्णतः बुडालेली असायची. कधी कधी एखादा रिझल्ट मिळेपर्यंत लॅबमध्ये थांबावं लागायचं. घरातल्या कामकाजात वेळ देणं तर तिला अगदीच अशक्य होते. तिचे हेवी वर्क शेड्यूल अॅडजस्ट करणे घरच्यांसोबतच सुजयलाही अवघड जात होते. घरच्यांसाठी वेळ देणं तिला जमत नव्हतं आणि ही गोष्ट सुजयला फारच खटकत होती. दोघांमधील चिडचिड वाढत गेली. दोघांमधील अंतर वाढत होते. सुजय काही बोलायला लागला की ती म्हणायची, लग्नाअगोदरच माझ्या “तुला करिअरबाबत, माझ्या ध्येयाबाबत मी सांगितले होते, तेव्हा तू त्याचा स्वीकार केला होतास. मग आत्ताच असा का वागतोस? तुझ्या घरच्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी तुझी आहे.’ तो घरच्यांना काही समजावून सांगू लागला तर आई म्हणायची, ‘सुजय… आम्हीही नोकरी केली पण घरदार सोडून नाही. लग्न झाल्यानंतर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे ठरवायला नको का? स्वतः मंगळागौरीच्या दिवशीही हिने सुट्टी घेतली नाही. पूजा करून अर्धा दिवस ऑफिसला जाऊन आली. कुळधर्म, कुळाचार हे करायला तर ती कधीच घरी नसते. तू आमच्या एकुलता एक मुलगा… आमच्यानंतर सगळं तुम्हांलाच सांभाळायचे आहे. तिला या गोष्टी कधी समजणार?’

आईचं ऐकावं की पत्नीचं ऐकावं हे सुजयला कळायचं नाही आणि सर्व राग सुरूचीवर निघायचा. दोघांची चांगलीच जुंपायला लागली. लग्नाअगोदर सुरूचीचा सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास सुजयला लोभावून टाकायचा पण आता ती उगाचच करिअरच्या मागे धावते असे त्याला वाटायला लागले होते. ‘मला एकटीला पुढे जाण्याची संधी मिळते आहे आणि आपण मागे पडू की काय? हा त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जातोय’ असे सुरूचीला वाटायला लागले. माझ्या करिअरला तो दुय्यम समजतो आहे असा तिचा समज झाला होता. वादविवाद आणि मतभेद फारच वाढले आणि सुरूची तिच्या माहेरी निघून गेली.

करिअरिस्ट पॅरेन्टसने वाढलेली सुरूची माहेरी आली तेव्हा तिच्या पालकांनी तिलाच सपोर्ट केला. सासरी ती पारंपरिक ओझ्याखाली दबून राहते, तिच्या विचाराचे स्वातंत्र्य तिला मिळत नाही. अशा तक्रारी त्यांनी सुरू केल्या आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात उभे राहिले.

कौटुंबिक समुपदेशकांडे हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी दोघांचीही बाजू समजून घेतली. अतिशय परिश्रम करून ठराविक ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथून माघार घेणे आणि पारंपरिक चौकटीत अडकून राहणे सुरूचीला जमण्यासारखे नव्हते आणि कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सुजयला सुरूचीची धावाधाव आणि करिअर प्राधान्य मान्य होण्यासारखं नव्हतं. पण यातून मार्ग काढण्यासाठी घटस्फोट हा पर्याय नाही. दोघांनीही एकमेकांचे विचार समजावून घेऊन त्याचा स्वीकार करणे आणि कुठेतरी तडजोड करणे महत्त्वाचे आहे, हे समुपदेशकांनी दोघांना समजावून सांगितले.

सुजयच्या नातेवाईकांनी आणि सुजयनेही नोकरी आणि करिअर या दोन गोष्टींमधील अंतर समजून घेतले नव्हते. नोकरी करण्यास सुजयची अथवा त्याच्या आई-वडिलांचा विरोध नव्हताच पण घर, कुटुंब याला प्राधान्य देऊन जमेल तेवढं करावं अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु नोकरी आणि करिअर या दोन गोष्टी वरवर पाहता सारखा असल्या तरीही या दोन गोष्टींमध्ये सूक्ष्म फरक आहे. नोकरी मिळू शकते, करिअर मिळवता येत नाही, ते परिश्रमपूर्वक घडवावे लागते आणि टिकवावेही लागते. या दोन्हीमध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडी वेगळ्या आहेत. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सतत अपडेट राहावे लागते. घरातील अडचणी सांगून चालत नाही, वेळ द्यावा लागतो. परंतु या करिअरला सहकार्य आणि सुसंवादाची जोड मिळाली तर संसार आणि करिअर दोन्हीही सांभाळता येतात असे सुजय, सुरूची आणि दोघांच्याही घरच्यांना समुपदेशकांनी समजावून सांगितले.

दोघांचाही हा संक्रमणाचा काळ आहे आणि एकमेकांशी सुसंवाद साधून घरातील सर्वांनी सहकार्य केलं तर दोन्हीही साध्य करता येईल अशा काही टिप्स त्यांनी दिल्या. सुरूचीला एरव्ही घरात काम करणं शक्य नसलं तरी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार तिने घरातील काही कामांची जबाबदारी घ्यावी, जमेल तेव्हा स्वतःच्या हाताने काही नवीन रेसीपीज शिकून पदार्थ बनवावेत, ऑफिसमधल्या यशस्वी… अयशस्वी झालेल्या संशोधनाबाबत… प्रोजेक्टबाबत घरच्यांशी मोकळेपणाने बोलावे, त्यांच्याशी संवाद साधावेत, आपल्या अडचणींचीही चर्चा करावी असे तिला सांगितले. तर घरच्यांनी तिच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन घरातील पारंपरिक जबाबदाऱ्यांमध्ये तिला न अडकवता, तिच्या कामाबद्दल अभिमान बाळगावा, कौतुक करावे, योग्य वेळेस घरातील काही जबाबदाऱ्या तिच्यावर टाकून विश्वास ठेवावा आणि तिच्या पद्धतीने तिला करू द्यावे अशी काही गोष्टी समजावून सांगितल्या. परस्पर सहकार्य आणि विश्वास या गोष्टी व्यवस्थित निभावल्या तर नातीही व्यवस्थित निभावली जातील याबाबतची त्यांना समज दिली. त्या दोघांनीही स्वतः मध्ये बदल करण्याचे ठरवले आणि या गोष्टी आत्मसात केल्या. आता दोघांचा संसार सुरळीत चालू आहे. सासूबाई नातवाला सांभाळण्यात मग्न आहेत. सुरूचीच्या एका संशोधनाला जगभर मान्यता मिळाली असून ती परदेशात त्याचे प्रेझेन्टेशन करण्यासाठी जाणार आहे. सुजयने घरातील जबाबदारी सांभाळण्याचे मान्य केले आहे.

त्याने त्यासाठी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सुरूचीही त्याला जमेल तशी मदत करत असते. ‘माझी सून शास्त्रज्ञ आहे’ हे सासूबाई अभिमानाने सांगत आहेत.

सुजय आणि सुरूची या संक्रमण अवस्थेतून गेले, त्यांनी तडजोड केली, एकमेकांना समजावून घेतले आणि कुटुंबाचेही सहकार्य मिळाले म्हणून त्यांचा संसार टिकू शकला. परंतु करिअरस्ट जोडीदारामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची, विस्कळीत झाल्याची अनेक उदाहरणे आज कौटुंबिक न्यायालयात दिसून येतात. त्यातल्या त्यात स्त्री करिअरिस्ट असेल तर समाज हे अजूनही मान्य करत नाही. घर आणि करिअर व्यवस्थित सांभाळणारी स्त्री हीच खरी यशस्वी स्त्री. जिला घर सांभाळता आले नाही ती अयशस्वी. मग ती करिअरमध्ये कितीही पुढे गेलेली असली तरी समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पुरुषांच्या करिअरशी तडजोड करावी असे मत समाजात अजूनही तग धरून आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या साक्षी, सिंधू असल्या तरीही अजून स्त्रीनेच करीअरमध्ये माघार घ्यावी असे मत का असावे? कॉलेजमध्ये स्मार्ट, असताना चटपटीत, हुशार मित्रांच्या बरोबरीने वाद घालणाऱ्या, कमी कपड्यांमध्ये वावरणाऱ्या मैत्रिणी आवडतात, छान वाटतात पण या आवडणाऱ्या मैत्रिणीला जीवनसाथी बनवल्यानंतर तिला परंपरेच्या चौकटीतच का बसवायचं असतं? तिला नंतरही तसेच प्रोत्साहन का दिले जात नाही? स्त्री प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने कार्यरत आहे. मग पुरुषही स्त्रीच्या कामात बरोबरीने सहभाग का घेत नाही? घर सांभाळणे… मुलांची सगळी व्यवस्था पाहणे-स्वयंपाकपाणी करणे ही जबाबदारी फक्त स्त्रीनेच का सांभाळावी? लहानपणापासून आत्मनिर्भर झालेल्या… स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या तरुणींना असे प्रश्न पडतात. समर्पक उत्तरांची ह्यांची अपेक्षाही असते. अशा आजच्या तरुण पिढीशी संवाद साधून करिअर आणि कुटूंबाचा समतोल त्या कशा साधतात याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री-पुरुष दोघांच्याही भूमिका व दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक वैशिष्ट्यपूर्वक विचार आणि उदाहरणे समोर आली. करिअरमुळे नाव कसे होतात हेही लक्षात आहे.

स्त्री वरील दुहेरी भूमिकेचा बोजा करिअर
आजची स्त्री पारंपरिकतेला छेद देत करिअर आणि संसार यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे. घरातील आवश्यक कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या जाव्यात आणि नोकरी व्यवसायातील कामकाजातही समाधान मिळावे, पुढे जाण्याची संधी मिळावी अशी आकांक्षा बाळगणाऱ्या स्त्रिया अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले. परंतु ही दुहेरी भूमिका बजावतानाच तिची अतिशय दमछाक होते.

व्यवस्थापन क्षेत्रात काम T करणारी एक महिला म्हणाली, मी दररोज पहाटे उठून स्वयंपाकपाणी उरकून नवऱ्याचा डबा आणि दोन मुलांचे डबे भरून ऑफिसला जाते. परंतु माझी घरी येण्याची वेळ निश्चित नसते. मुले कधी कधी वाट बघून झोपून जातात. मी त्यांना वेळ देऊ शकत नाही याचे खूपच वाईट चाटतं. शक्य तेवढे लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतेच, परंतु काम पूर्ण झाल्याशिवाय निघता येत नाही. मुलांच्या आजारपणाच्या काळात सुट्टी घेतल्यामुळे मी माझ्या कामाचा परफॉरमन्स दाखवू शकले नाही म्हणून माझं प्रमोशन डावललं गेल माझ्याएवढी ही योग्यता नसलेल्या पुरुष सहकाऱ्याला ती संधी मिळाली. तेव्हा खूपच वाईट वाटलं. काही काम मुद्दाम पुरुष वर्गालाच सांगितली जातात याचंही वाईट वाटतं. घर आणि करिअर दोन्ही सांभाळताना फारच कसरत करावी लागते.

मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी एक स्त्री म्हणाली, मी चांगल्या हुद्द्यावर काम करीत होते. करिअरच्या नवीन संधी खुणावत होत्या पण त्याच वेळी सासूबाई आजारी पडल्या, मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले मग मी कुटुंबाला प्राधान्य द्यायचं ठरवलं. पतीला परदेशात जाण्याची संधी मिळत होती. मग त्यांना प्रोत्साहन दिले. मी माझी नोकरी-करिअर सोडून दिलं आणि कुटुंबाकडे लक्ष दिलं. घरात बसून इतर कौशल्य आत्मसात करण्याचं ठरवलं.

बॅडमिंटन या खेळात करिअर करणारी एक तरुणी म्हणाली, मी बॅडमिंटन लहानपणापासून खेळले. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलेले आहे. त्यामुळेच रेल्वे खात्यात नोकरीही मिळाली. माझ्या खेळाचा फॅन असणाऱ्या एका तरुणाने मला मागणी घातली… आमचे लग्न झाले. परंतु त्यानंतर काही दिवसांनीच मी पुढे खेळ चालू ठेवू नये असे पतीचे म्हणणे होते. माझी रोजची प्रॅक्टीस, खेळ, दौरे त्याला नको होते. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळण्याची संधी मला गमवायची नव्हती. माझ्या पंधरा-सोळ्या वर्षाच्या मेहनतीवर मला असे पाणी सोडायचे नव्हते. खेळ चालूच ठेवायचा मी निर्णय घेतला पण त्यासाठी मला कुटुंब सोडावे लागले. खेळाला प्राधान्य देण्याचं माझं ध्येय असल्यामुळे मी त्यालाच प्राधान्य दिले आणि भावनेमध्ये अडकून राहिले नाही.

पुरुषांचा दृष्टीकोन
पुरुषांना पत्नी मिळवती हवी आहे, कर्तृत्ववान हवी आहे. तिच्या भल्यामोठ्या पगाराचं आणि गुणाचं कौतुकही आहे. पण… (हा पण ९०च पुरुषांमध्ये आढळून आला) पण पत्नीच्या कामाच्या ताणाशी, वेळापत्रकाशी त्यांना तडजोड करायला नको आहे. तिने करिअर करावे. पण घराकडेही लक्ष द्यावे हा आग्रह आहेच. करिअरपेक्षा घराला प्राधान्य द्यावे, घर सांभाळून स्वक्षमतेनुसार जमेल तेवढं करिअर करावं. अपवादात्मक ९०च पुरुषांनी पत्नीला योग्य संधी मिळाली तर पुरुषांनी घरातील जबाबदारी सांभाळावी परंतु तिनेही घर संसार याचे भान जपून घरासाठी वेळ द्यावा असे विचार मांडले.

सहकार्याचा अभाव
घरातून सहकार्य असल्याशिवाय स्त्रीला नोकरी आणि करिअर करणे शक्यच होणार नाही. यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो. तर यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असतो. कुटुंबाची साथ असेल तर ती स्त्री पुढे जाऊ शकते. ज्या ठिकाणी हे सहकार्य नाही तेथे कुटुंब धोक्यात येण्याचे प्रमाण अधिक आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करणाऱ्या एका तरुणीने स्वतःची व्यथा सांगताना म्हटले की, मला सकाळी लवकर घरातून बाहेर जावे लागते व संध्याकाळी घरी येण्याची वेळ निश्चित नसते. परंतु संध्याकाळचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. किमान एक वेळ तरी मी स्वयंपाक करावा असे पतीचे म्हणणे आहे. स्वयंपाक करणाऱ्या कामवाल्या बाईच्या हातचं आम्हाला आवडत नाही. दिवसभर मी तुझ्या मुलाला सांभाळते म्हणून सासूबाई संध्याकाळी मदत करीत नाहीत. आईला काम सांगितलेले नवऱ्याला आवडत नाही आणि नवऱ्याने किचनमध्ये काही मदत केली तर ते सासूबाईंना आवडत नाही. एखाद्या वेळेस त्याने किचन ओटा पुसायला मदत केली तरी घरात गहजब होतो.

निर्णय स्वातंत्र्य
स्त्रिाया कितीही कर्तृत्ववान असल्या तरी त्यांच्या निर्णयाबाबत कायम शंका घेतली जाते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते. स्त्रियांच्या निर्णय स्वातंत्र्याबाबत बोलताना एकजण म्हणाली, घरातील रोजची भाजी, किराणामाल, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी सामान इ. खरेदी करताना स्त्रीला निर्णय स्वातंत्र्य आहे. परंतु शेअर्समधील गुंतवणूक… नवीन फ्लॅट खरेदी करणे इ. बाबतीतील मोठे निर्णय घेताना स्त्रियांना व्यवहारातील काय कळतं? असा टोमणा ऐकायला मिळतो. कमवत्या स्त्रीने स्वतःचे पैसे कसे वापरायचे यावर घरच्यांचा अंकुश असतो.

काही वेळा मात्र स्त्रिया स्वतः च्या घरच्यांना विश्वासात न घेता आर्थिक व्यवहार करतात. घरातील खर्च सांभाळण्याची जबाबदारी पुरुषांचीच असते. त्याने पत्नीचा इन्कम लक्षात घेऊ नये. नवीन पिढीतील तरुणींना पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क हवे आहेत परंतु त्यांच्या बरोबरीने, खर्चाची कमवताना जबाबदारी मात्र त्याने घ्यावी. माझ्या पैशासाठी त्याने लग्न केले आहे का? असा त्यांचा सवाल असतो. कधीतरी वेळ आली तर मी खर्च करेन परंतु घरच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी त्याचीच अशा विचारांमुळेही घरात मतभेद होतात. ज्या ठिकाणी दोघांनी मिळून निर्णय घेतलेला असतो. हा तुझा पैसा हा माझा पैसा असं न करता आपल्या दोघांची आर्थिक क्षमता काय आहे आणि आपण काय करू शकतो हे विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. तेव्हाच तो संसार सुरळीत चालू राहतो.

समाजाची भूमिका
करिअरिस्ट स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे, असे अजूनही निदर्शनास येते. स्त्री घराबाहेर पडली की संसाराची धूळधाण होते, मुलांकडे, नवऱ्याकडे, घरातील वृद्ध व्यक्तिंकडे तिचे लक्ष राहात नाही असा सूर असल्यामुळे करिअर करणाऱ्या स्त्रीच्या मनावर एक दडपण असतेच.

करिअर करणाऱ्या महिला चारित्र्यवान नसतात. स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी त्या कोणतीही मजल मारतात अशी काही वक्तव्यही समाजात केली जातात. अर्थात ही नकारात्मक भूमिका तयार होण्यामागे प्रसार माध्यमेही जबाबदार आहेत. करिअरिस्ट स्त्री बराच काळ घराबाहेर घालवते. तिचे कामानिमित्त मिटींग्ज, दौरे, सेमिनार्स, विविध पाय मध्येही तिला जावे लागते. पुरुष सहकाऱ्यांशी जास्त संबंध येतो. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे, विश्वासाचे, मैत्रीचे नाते निर्माण होत असते. सर्वजण एकमेकांना मदत करीत असतात. परंतु दूरदर्शन मालिका, चित्रपट यांमधून त्यांचे वर्णन भडक व विकृत स्वरूपाचे केले जाते. त्यामुळे स्त्रीला घरीदारी संशयाच्या वातावरणाला तोंड द्यावे लागते.

पुरुषांच्या दृष्टीकोनातून विचार करता समाजाच्या नकारात्मक भूमिकेचे दडपण पुरुषांवरही येत असते त्यामुळेच करिअरिस्ट पत्नीला सर्वच बाबतीत त्याचेकडून पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. मॉडेलिंग करणाऱ्या एका स्त्रीच्या पतीने स्वतःचे विचार मांडताना सांगितले की, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास असला तरीही समाजाचे भान ठेवून तिने कोणते कपडे वापरावेत, कोणत्या जाहिराती कराव्यात याचे बंधन मी टाकू लागलो.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणीचा पती म्हणाला, पत्नीचा प्रोजेक्ट पूर्ण होण्यास काही कालावधी होता आणि तेव्हाच आमचे लग्न झाले. हनिमुनसाठीही तिला सुट्टी मिळणे अवघड होते. तिचा विचार करून मी हनिमूनचे बुकिंग कॅन्सल केले आणि लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी ती कंपनीत रूजू झाली. परंतु नातेवाईक, मित्रमंडळी यांना उत्तर देता देता माझ्या नाकीनऊ आले.

आपली पत्नी उच्चपदावर काम करते, ती ऑफिसमध्ये दमते, घरी आल्यानंतर घरकामातही तिला मदत करायला हवी असे अनेक पतीराजांना वाटतही असते. परंतु लोक काय म्हणतील? आई-वडील याकडे ‘जोरू का गुलाम’ या दृष्टीकोनातून बघतील असे दडपण त्यांच्याही मनावर येत राहते. परंतु समाजाचा विचार न करता जे पत्नीच्या भावना सांभाळतात त्यांच्या संसारात भांड्याचा आवाज ऐकू येत नाही. त्यांचे सूर एकमेकांत मिसळून जातात.

वैवाहिक जीवनावर होणारा परिणाम
करिअरिस्ट स्त्री आपल्या मात खूप व्यस्त असते. पती-पत्नी दोघांचेही करिअर समान पातळीवर चालू सेल तर दोघांचीही आपल्या काम व व्यवसायात प्रचंड मानसिक गुंतवणूक झालेली असते… ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. कामजीवनाकडे दोघांचेही दुर्लक्ष होते. त्यातूनच चिडचिड भांडणे उद्भवतात. हॉस्पिटल, कॉल सेंटर, अशा ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना नाइट ड्युटीजही असते. री आल्यानंतर उत्साह नाही. त्यामुळे कामजीवनात दोघेही असमाधानीअसतात.

मुलांना वेळ देणं… त्यांचा भ्यास घेणं… त्यांच्याशी खेळणं इ. ष्टी मनात असूनही करता येत नाहीत. लांना मार्कस कमी पडले, त्यांचा होमवर्क वेळेवर पूर्ण झाला नाही की मुलांवरही चिडचिड होते.

समतोल कसा राखता येईल?
बदलत्या सामाजिक रचनेमध्ये आणि पुरुष दोघेही करिअरच्या समान पातळीवर असतात. केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या करिअरला दुय्यम दर्जा देऊन चालत नाही. दोघांनाही आपले करिअर सांभाळत संसार करावा लागतो. करिअर आणि कुटुंब याचा मतोल राखावा लागतो. कोणत्यावेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागते. कधीतरी त्याला माघार घ्यावी लागते तर कधी तिला मुलांचा जन्म, त्यांना वाढवणं… त्यांची आजारपणात देखभाल करणे या गोष्टीत स्त्रियांनाच लक्ष घालावे लागते.

ज्यावेळी स्वतःचे करिअर सिमीत रण्याची गरज असते करिअरच्या मागे धावताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

पती-पत्नी यांनी नियोजनपूर्वक काही गोष्टी ठरवाव्या लागतात. उदा. मुलांचे आजारपण असेल, शाळेच्या सभा असतील कार्यक्रम असतील, घरगुती समारंभ असतील तर पत्नीने सुट्टी घेऊन याबाबतीत लक्ष पुरवावे आणि मुलांचे अॅडमिशन, परीक्षा, घरातील इतर आर्थिक व्यवहार ह्या वेळी पतीने कामकाजातून सुट्टी घेऊन आपली जबाबदारी पूर्ण करावी. आपली क्षमता आणि आवड व सवड बघून कोणी कोणती कामे करायची याचे नियोजन करावे.

काही स्त्रियांना स्वतःवर सगळं काम ओढून घेण्याची सवय असते. परंतु सर्वच कामात मी योग्य आहे पटवून देण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. ऑफिस मध्येही सर्व कामात अग्रेसर आणि घरातही सण समारंभ, कुळधर्म, कुळाचार, मनोरंजन इ. बाबतीत कोठेही मागे पडणार नाही. हे सर्व करताना त्या ‘सुपर वुमेन सिंड्रोम’ला बळी जातात. कारण सगळीकडे स्वतः चे अस्तित्व सिद्ध करताना मनाची आणि शरीराची फारच ओढाताण होते. ठराविक वयापर्यंत हे सगळंच शक्य होतं. परंतु वय वाढत जातं तसं काही गोष्टी साध्य होत नाहीत. बऱ्याच वेळा एक ना धड… अशी परिस्थिती होऊन जाते. मानसिक ताणतणाव वाढल्याने नैराश्याकडे जाण्याचाही संभव असतो म्हणून प्रत्येक गोष्टीचा अट्टाहास करणे वेळीच टाळायला हवं.

स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या क्षमतांचा विलास करण्याचा प्रयत्न करते ती खरी करिअरिस्ट स्त्री. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमताही तिच्याकडे असली पाहिजे. स्वतःच्या पदाचा, स्वतः च्या आर्थिक कमाईचा अहंकार बाळगून स्वतःचेच वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर कुटुंब विस्कळीत होते. करिअर आणि कुटुंब दोन्हीही महत्त्वाचे असले तरी करिअर गाठण्यासाठी कुटुंब स्थिर असावेच लागते. कुटुंबाच्या सहकार्याशिवाय करिअरची उंची गाठता येत नाहीच. थोडक्यात करिअर व कुटुंब याचा समतोल ठेवायचा असेल तर पुढील पिरॅमिडचा विचार करून काही कुटुंब ही अगदी शेवटपर्यंत टिकणारी गोष्ट असते.

करिअर हे ठराविक मर्यादिपर्यंतच असते. त्यामुळे कुटुंब टिकवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही तडजोड करण्याची तयारी ठेवायला हवी आणि प्राधान्यक्रम ठरवता यायला हवेत. हे साध्य झालं तर कुटुंब आणि करिअर दोन्हीकडे समतोल साधला जाईल.

हे करा:
१) नोकरी आणि करिअर यातलं अंतर समजून घ्या.
२) घर आणि ऑफिस या दोन ठिकाणचे कप्पे करणं जमवून घ्यावं.
३) कामाचं पूर्वनियोजन करा.
४) मुलांना आणि कुटुंबियांना गुणात्मक वेळ (क्वालिटी टाइम) द्या.
५) कुटुंबाचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

हे करू नका:
१) शिक्षणाचा, पदाचा अहंकार बाळगू नका.
२) सर्वच गोष्टी एका वेळी साध्य करण्याचा अट्टाहास धरू नका.
३) करिअरसाठी कुटुंबाकडे नका. दुर्लक्ष करू नका.
४) बाईपणाचं भांडवल करू
५) कोणत्याही करिअरला दुय्यम समजू नका.

– स्मिता प्रकाश जोशी

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..