१९६५ साली आजीच्या आग्रहाखातर वडिलांनी आई,मी आणि धाकटा भाऊ यांच्या समवेत पहिली कुलदेवतेची यात्रा योजिली तेव्हा भुसावळ-तुळजापूर हा द्राविडी (का द्रविडी) प्राणायामी प्रवास होता. भुसावळहून कोणत्यातरी ट्रेनने आम्ही दौंडला आलो. सरळ,सलग प्रवास त्यावेळी नव्हता. सोबत आईने शिधा घेतला होता. त्यापूर्वी आमच्या कुटुंबीयांनी कधीच भवानी मातेचे दर्शन घेतले नव्हते. तेथील आमच्या कुलोपाध्यायांशी (भारदस्त शब्द आणि तेवढेच स्वतःसाठी हरभऱ्याचे झाड) वडिलांनी संपर्क करून सगळं जमवून आणलं होतं. सायंकाळी भुसावळहून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी दौंडात दाखल झालो. सोलापूरची connecting ट्रेन रात्री होती. मग दौंड प्लॅटफॉर्मवर मुक्काम! अचानक आजींचे पोट दुखायला लागले. ही व्याधी त्यांची पुरातन आणि भुसावळच्या जळूकर वैद्यांनी त्यांना चक्क तंबाखू prescribe केली होती आणि चम्मतग म्हणजे या “औषधाने” त्यांचे पोट तात्पुरते दुखायचे थांबत असे. पण यावेळी त्या हैराण झाल्या होत्या. नेहेमीची “दवा” काम करीत नव्हती. अगदी तुम्ही जाऊन या तुळजापूरला, मी इथेच विश्रांती घेते येथपर्यंत त्यांची सूचना पोहोचली होती. आम्हाला प्लॅटफॉर्म वर सोडून वडील दौंडमध्ये डॉक्टरना शोधायला गेले. औषध घेऊन आले. रात्री तसेच सोलापूरच्या ट्रेनमध्ये शिरलो. त्यांनाही थोडे बरे वाटत होते. पहिली-वहिली कुटुंब यात्रा सुफल होऊ दे म्हणून आई-आजीचे मनोमन नवस सुरु होते आणि आईने तर काही शुक्रवार करण्याचे घाटले. सोलापुरातून तुळजापूरला आलो आमच्या पुरोहितांकडे (अवघड शब्द कितीदा- कंटाळा आला). त्यांच्या वाड्यात चक्क एक खोली, आंघोळीला गरम पाण्याची सोय आणि बरोबर आणलेल्या शिध्यासाठी स्टोव्ह वगैरे सारं त्यांनी पुरविले. २-३ दिवस मुक्काम केला, दिवसातून २-३ वेळा निवांत दर्शन ! आजींचे दुखणे बरे – देवी दर्शन कारणीभूत ! आईने मग पुरणाचा स्वयंपाक करून भवानी मातेला नैवेद्य दाखविला. काकडा-आरती पासून शेजारती पर्यंत सगळे धार्मिक विधी पुरोहितांनी यथासांग पार पाडले.
नंतर त्यांनी वडिलांना एक चोपडे दाखविले- आमचे पूर्वज तुळजापूरला याआधी कधी आले होते याच्या यच्चयावत नोंदी त्यांत होत्या. वडील चकीत झाले. निघताना त्यांची योग्य संभावना करून आणि आमच्या ट्रीपची नोंद त्यांच्या चोपड्यात करून आम्ही निघालो. परतीचा प्रवास तसाच, पण सुभग, कमी त्रासदायक!
त्यानंतर वडिलांची बदलीच सोलापूरला झाल्याने तुळजापूर, पंढरपूर वारंवार व्हायचे. एकदा अक्कलकोट आणि सोलापूर सोडताना गाणगापूरही झाले.
परवा शुक्रवारी मस्त हुतात्माने सोलापूर, हॉटेलात मुक्काम, दुसऱ्या दिवशी सकाळी टॅक्सी करून तुळजापूर! आधीच दर्शनपास तयार असल्याने आणि उपाध्ये (नवीन शब्द वापरून बघावा,तेवढाच रुटीन बदल) सज्ज असल्याने दहा मिनिटात मस्त दर्शन ! अर्थात तिरुपती किंवा शिर्डी इतकी ढकलाढकली अजून तुळजापूरला सुरु नसल्याने फक्त सुरक्षारक्षकांचे हाकारे होते. यात्रा याहीवेळी यथासांग पार पडली – देवीचे सालंकृत दर्शन झाले. कोरोनाचे अदृश्य सावट झुगारून तीर्थक्षेत्र रुळांवर आल्याचे जाणवले. सगळे आराम,सगळ्या सुखसोयी उपभोगून निवांत भेटीगाठी घेऊन आम्ही काल परतलो.
काळाच्या प्रवाहातून कितीही योजने पाणी वाहून गेले असले तरी काठावरचा तोच मी, मनात दोन्ही प्रवास मिरवत-
पहिली कुटुंबयात्रा आजीबरोबर आणि अलीकडची नातीबरोबर !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply