भांडवलशाही उद्योगपतीच्या कंपनीची समाजवादी जाहिरात टी.व्ही वर पाहून करमणुक झाली. वोल्टास ए.सी मशीनच्या जाहिरातीतील शेत मजुराची छोटी मुलगी मालकाच्या बंगल्यात डबा घेऊन जाते. एसी विण्डो समोर डबा उघडा धरुन त्यात थंड हवा पकडते. ही थंड हवा ती शेतावर राबणा-या आपल्या शेतमजूर बापाच्या तोंडावर सोडते. जाहिरात कलात्मक आहे. कल्पना छान आहे. परंतु एसी मशिन घेण्याची ऐपत मजूराकडे कोठून येणार ? ही गरीब लोकांची जीवघेणी थट्टा आहे.
जागतिक करणाच्या प्रचंड चक्राखाली समाजवादी कम्यूनिस्ट चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संयुक्त रशियाचे विघटन भांडवली अमेरिकन कंपन्यांशी स्र्पाध करणारी चीनच्या माओवादी कंपन्या यामुळे कम्यूनिस्ट चळवळीच्या मुलभूत विचार सरणीला प्रचंड हादरा बसला आहे. कामगार चळवळीत उतरलेल्या स्वार्थी राजकिय नेतृत्वामुळे आचार संहितेची वाट लागली आहे. गरीब शेतकरी व कामगाराच्या हिताच्या गोष्टी सभेत बोलायच्या परंतु कुटुंब व नाते संबंधाकरीता जमीन व कारखान्याचे आर्थिक शोषण सत्तेवर आले की तहहयात करायचे.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे स्व. मनोहर शाम जोशी यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी क्याप । हिंदीतील या सुप्रसिद लेखकाने प्रेस, रेडियो, टी.व्ही वृत्तचित्र, वर्तमान पत्र मासिक या सर्वच क्षेत्रावर आपल्या प्रतिभेची छाप सोडलेली आहे. केंद्रीय माहीती सेवा, टाईम्स ऑफ इंडिया, साप्ताहिक हिंदुस्तान आदि मिडियात काम करताना त्यांनी टी.व्ही धारावाहिक हम लोग लिहिण्याकरीता 1984 साली संपादकाची खुर्ची सोडली. मनोहर शाम जोशी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1933 रोजी अजमेर येथे झाला. त्यांचे शिक्षण अजमेर व लखनौ येथे झाले आहे. विज्ञानाचे स्नातक ,शास्त्रज्ञ व्हायचे परंतु साहित्याच्या आवडी मुळे लेखक झाले.इंग्रजी व हिंदी या दोन ही भाषेवर समान पकड त्यामुळे हिंदी साप्ताहिक हिंदुस्तान बरोबरच इंग्रजी साप्ताहिक वीक अँड रिव्ह्यू ,मॉर्निंग इकोचे संपादन प्रभावीपणे केलेले आहे. दूरदर्शन धारावाहीकेचे जनक मनोहर शाम जोशी यांनी हमलोग,बुनियाद,मंुगेरीलाल के हसीन सपने, जमीन-आसमान,शाया इत्यादी धारावाहीकांचे लेखन करुन मयम वर्गीयांच्या व्यथा,संवेदना प्रभावीपणे शब्दबद केल्या आहेत. हिंदी भाषेच्या नव नविन फॉर्मात लिहिताना त्यांनी व्यंग शौलीत चिमटे काढीत संवेदनेच्या अभिव्यक्तीला त्यांनी एका उंचीवर पोहचविले आहे.
क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे. कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक उत्तराचंलातील प्रदेश आहे. उत्तर आधुनिकतेतील मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. टी.व्ही व वर्तमान पत्रात छापलेल्या बातम्यांवर आपला पिढीची वाढ होत आहे. याकरीता लेखक च् हमारे उपवन में यहां से वहाँ तक भूल के ही फूल खिले है या सारखी सुंदर प्रतिमा योजतात. क्याप या गढवाली शब्दाचा समान हिंदी अर्थ स्पष्ट करण्याकरीता लेखक अजीब-सा, अनगढ-सा, बेकारसा, अनदेखा-सा, निराशाजनक शब्दांची योजना करतात.
क्याप ही एका डूम हरिजन प्रियकर व उत्तरा नावाच्या ब्राम्हण मुलीची फसलेली प्रेमकथा आहे. कम्यूनिस्ट क्रांतीची स्वप्ने पाहणारा डुम समाजातील ढोंगीपणामुळे निराश झालेला आहे. च्क्रांती लिहा, क्रांती बोला, क्रांतीचे भजन करा परंतु क्रांती करु नका सारखी निराशजनक टिप्पणी कांदबरीचा नायक करतो. तो म्हणंतो की कम्यूनिस्ट नेते व गरीब जनते मधील दरी लांब वाढत आहे. कम्यूनिस्टांनी गरीबात जाऊन गरीबा प्रमाणे राहिले पाहिजे. गरीबांना त्यांचे दु:ख समजुन घेणारे नेते हवे आहेत. डाव्या विचारसरणीचा मी एक बुदीजीवी नेता आहे. परंतु मला नेहमीच असे जाणवले आहे की आम्ही डाव्या विचारांची माणसे कॉफी हाऊस मये सिगार ओढीत इंग्रजी पत्र पत्रिकेतील छापलेले लेख व कम्यूनिस्ट ग्रंथातील उदाहरणे तोंडावर फेकण्यात तरबेज झालो आहोत. आमच्यात व ब्राम्हणात काय फरक राहिला आहे? आमचे ब्राम्हण सुद्धा धर्म ग्रंथातील संस्कृत श्लोक घोकुन घोकुन शास्त्रार्थ करतात. आम्ही डाव्या विचारांचे तथाकथित बुदीवादी नेते फुकटचे मिळणारे मिष्टान्न खाऊन ढेर पोटया ब्राम्हणा सारखे बनत चालेलो आहोत.
लेखक स्वत: पत्रकार असल्यामुळे सामाजिक व राजकिय परिस्थितीचे संपुर्ण भान कादंबरी लिहिताना ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधीचा जनसामान्या वरील पगडा त्यांनी बारकाईने टिपला आहे. कार्ल मार्कस विश्वातील सर्व कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या हिताच्या संकल्पना मांडतो. तरीही भारतीय जनसामान्यांना फक्त धोतर घालुन उघडा राहणारा महात्मा अधिक भावतो. ग्रामीण जनतेला तो आपल्यातील एक मित्र वाटतो. कार्ल माक्र्स भारतातील मातीत फार मोठा प्रमाणात रुजु शकला नाही. कार्ल माक्स्चा प्रचार करणारे कम्यूनिस्ट भारतीय समाजातील देशी मन ओळख शकले नाही. कम्यूनिस्ट विचारांना भारतीय पेहराव दिला गेला नाही. विचार श्रेष्ठ असतात परंतु आचरणात आणण्याकरीता येथील जमीनीत बीज रुजवावे लागते. ही मेहनत घेणारी फारच थोडी मंडळी कम्यूनिस्ट चळवळीत आढळते.
लेखकाने कांदबरीच्या नायकाचे काका खीमराज यांचे कम्यूनिस्ट कार्यकत्र्याचे चरित्र वर्णन केले आहे. काकांची साधी राहणी, कष्टकरी जनतेत समरस होणे व कार्ल माक्र्सच्या विचारांचा प्रसार पहाडी प्रदेशात निष्ठेने करणे याचे सुंदर चित्रण केले आहे. कस्तुरीकोटच्या खीमराव काकावर अल्मोडाचे कॉम्रेड पूरन चंद्र जोशी, लेनिन, स्टालिन, कार्ल माक्र्सच्या विचारांचा पगडा आहे. पहाडी क्षेत्रातील गरीब र्निधन जनतेच्या लोकसंगीत, लोकगीतांचा उपयोग करीन खीमराज काका कम्यूनिस्ट विचारांचा प्रसार करतात.
ही संपूर्ण कादंबरी मनोहर श्याम जोशी यांनी गप्पा गोष्टीच्या स्वरुपात लिहली आहे. कस्तुरीकोटच्या काल्पनिक उत्तरांचलातील पहाडी लोकांच्या जीवनात गप्पागोष्टींना विशेष महत्व आहे लेखक म्हणतात की या गप्पांच्या सवयीमुळे येथील लोक आत्महत्या करण्यास भाग पाडण्या-या विषम परीस्थितीत सुदा जीवन सुखकारक करण्याची धडपड करतात.
या कादंबरीला साहित्य अकादमीचा 2006 वर्षाचा हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्य प्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. हिंदी साहित्याची सेवा करणारा एक महान लेखक 30 मार्च,2006 रोजी स्वर्गवासी झाले आहेत. ते गेल्यामुळे आज त्यांच्याच भाषेत हिंदी वाचक म्हणतो की सब कुछ क्याप लग रहा है ।
क्याप लेखक- श्याम मनोहर जोशी
पृष्ठ: 151
प्रकाशक: वाणी प्रकाशन
आईएसबीएन: 81-7055-799-2
प्रकाशित: मार्च २६, २००६
Leave a Reply