गझल
वृत्त :- व्योमगंगा
लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी
वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी
झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ;
गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी
फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी
पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी
लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते
लोकनेते साफ खोटे बोलणारे पाहिले मी
वाचवावी लेक, मित्रा फार झाले बोलणे हे
वारसासाठी सुनेला जाळणारे पाहिले मी
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५