नवीन लेखन...

लावणीची ‘लाट’

‘सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली.

चित्रपटातील पाटील, सावकार, सहकार सम्राट किंवा बदफैली नायक हा बैठकीच्या लावणीत मोगऱ्याचा गजरा घालून बसायचा अथवा स्टेजवरील लावणी नर्तिकेवर दौलतजादा करायचा. संगीतकार राम कदम, गीतकार जगदीश खेबुडकर यांच्यासारख्या अनेक गीतकार व संगीतकारांनी सदाबहार लावण्या दिल्या.

साधारणपणे १९९० पासून लावणीनृत्याचे कार्यक्रम रंगमंचावर सादर होऊ लागले. पांडव निर्मित ‘चौफुला’ या कार्यक्रमात लावणी सादर करणारी गायिका, वाद्यवृंद व लावणीनृत्य हे उत्कृष्ठ नेपथ्य, साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना अशा तांत्रिक बाबींमुळे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘चौफुला’चे शेकडो कार्यक्रम हाऊसफुल्ल होऊ लागले. इथूनच लावणीचा प्रेक्षकवर्ग वाढू लागला.

सुरेखा पुणेकर यांनी ‘अशी रंगली लावणी’ या प्रयोगातून लावणी सादरीकरणास सुरुवात केली. हे प्रयोग पहातानाच त्यांच्या नृत्यात व आवाजात जादू आहे हे जाणवत होतं.

याच दरम्यान अण्णा कोठावळे यांनी छाया-माया खुटेगावकर या दोघी बहिणींना घेऊन लावणीचे कार्यक्रम सुरु केले. यांनाही भरपूर प्रतिसाद मिळाला.

“ढोलकीच्या खणखणाट, घुंघरांचा छनछनाट’ या कार्यक्रमात सीमा पोटे व संगीता लाखे या दोघींच्या लावण्यांना अनेकदा वन्समोअर मिळायचे. दोघींचं ट्युनिंग फारच छान होतं.

मुंबईची सिने अभिनेत्री मेघा घाडगेच्या ‘कैरी पाडाची’ कार्यक्रमास तुफान गर्दी व्हायची. तसेच सुरेखा कुडचीच्या लावणी कार्यक्रमास हाऊसफुल्लचे बोर्ड लागायचे. प्रियांका शेट्टी, संजीवनी मुळे नगरकर, रश्मी पाटील, तृप्ती पोतदार, दिप्ती आहेर, सुनीता करंबेळकर, चतुर्थी पुणेकर, लता पुणेकर अशा कितीतरी नृत्यतारकांच्या नावावर प्रेक्षक गर्दी करायचे.

‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमातून चैत्रालीराजे हिने स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. तिच्या कार्यक्रमांनी इतिहास रचला.

‘शिवानीचा नादच खुळा’ कार्यक्रमातून पदवीधर शिवानीने पुण्यात व पुण्याबाहेर शेकडो कार्यक्रम केले.

सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ हा स्वतंत्र कार्यक्रम सुरु झाल्यापासून हजारों प्रयोग ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड हटत नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर साता समुद्रापार सुरेखा पुणेकरांची लावणी पोहोचली. त्यांनी ‘फक्त स्त्रियांसाठी’ कार्यक्रम केले. ते देखील हाऊसफुल्ल झाले.

या लावणी कार्यक्रमांच्या गर्दी गोंधळात नृत्यसम्राज्ञी सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांनी ‘सखी माझी लावणी’ या अस्सल विविध पारंपरिक लावणींच्या कार्यक्रमाची उत्कृष्ट निर्मिती केली. या कार्यक्रमाची सर्व माध्यमांनी प्रशंसा केली मात्र व्यावसायिक दृष्ट्या त्याला यश मिळालं नाही, यांचं वाईट वाटतं.

पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरात दिवसातील तिन्ही वेळेला लावणीचे कार्यक्रम होऊ लागले. पांचशे, हजारचे तिकीट काढायलाही प्रेक्षक तयार झाले. गुंठामंत्र्यांच्या गाड्यांनी काय पार्किंग भरु लागले. नाटकांना प्रेक्षक येईनासा झाला.

याला कारण होतं, लावणीच्या सादरीकरणाचं.. लावणी तारका प्रेक्षकांचं लक्ष विचलीत होईल अशी अदाकारी करु लागल्या. एकाच गाण्याचे चार चार वेळा वन्स मोअर होऊ लागले.

पुढच्या रांगेतील ठरलेले, प्रत्येक कार्यक्रमाला येणारे रसिक खुर्चीवर उभे राहून नाचू लागले. काहींनी बिसलेरीच्या बाटलीतून मद्य प्रेक्षागृहात आणून पिण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाचे वेळी नाचणाऱ्या प्रेक्षकांना आवरण्यासाठी शेवटी माणसं नेमावी लागली.

लावणींचे दौरे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही होऊ लागले. कित्येक ठिकाणी प्रेक्षकांपासून नर्तिकांची सुटका करुन घेण्यासाठी निर्मात्यांना स्टेजच्या मागील दरवाजाने पळ काढावा लागला.

सार्वजनिक सुट्या, धुलीवंदन, गटारी अमावस्या, होळी, ३१ डिसेंबर अशा तारखा, लावणीवाले जादा पैसे देऊन बुक करु लागले. हे कार्यक्रम हाऊसफुल्ल तर व्हायचेच, प्रसंगी काळ्या बाजाराने तिकीटे विकली जायची.

लावणीत नृत्य करणाऱ्या तारका तीन आकडी मानधनाऐवजी चार आकडी मानधन मिळवू लागल्या. आयत्यावेळी त्या हा ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ लागल्या. तीच गत ढोलकीवाले, की बोर्डवाल्यांची होती.

असे लावणीचे कार्यक्रम बरेच वर्ष चालले. काही वर्षांनी ही लाट ओसरु लागली. काही लावणी निर्मात्यांनी आपला गाशा गुंडाळला. जे मोजके राहिले होते, ते आठवड्यातून एखादा कार्यक्रम करायचे, बुकींग काही व्हायचे नाही. पुन्हा नाटकांना चांगले दिवस येतील असं वाटू लागलं, तोपर्यंत कोरोनाने आपलं बस्तान बसवलं.

एक पूर्ण वर्ष कोरोनात घरात बसून गेलं. पुन्हा जनजीवन सुरळीत होऊ लागलं.. तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट आली. फक्त लावणीच नव्हे तर मनोरंजनाचं क्षेत्रच ठप्प झालं. कलाकार, बॅकस्टेज, वाहतूक, तंत्रज्ञ सर्वजण सध्या घरात बसून आहेत. लाॅकडाऊन उघडल्यानंतरही सगळं सुरळीत व्हायला मोठा कालावधी लागेल.

आज ‘लावणीची लाट’ सादर करण्याचे कारण असे की, या लाटेमध्ये ‘चौफुला’ पासून ते शेवटपर्यंतच्या सर्व कार्यक्रमात आमचा डिझाईनर म्हणून सहभाग होता. ते ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्या तमाम नृत्यतारकांचे फोटो काढण्यापासून डिझाईन करेपर्यंत त्यांचा सहवास लाभला. या कार्यक्रमांचे मोठमोठे फ्लेक्स एका दिवसात करुन, त्याच रात्री ते बालगंधर्वला लावले जात होते. त्यांची पोस्टर्स केली. ब्रोशर केली. मात्र हे सर्व करताना आम्ही मात्र, पडद्यामागेच राहिलो.

आज मागे वळून पहाताना समाधान वाटतं की, या लावणीच्या लाटेतील आपण एक वाळूचे कण म्हणून तरी, नक्कीच ‘साक्षीदार’ होतो.

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

२९-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on लावणीची ‘लाट’

  1. खरोखरच छान लेख. लेखकाने आयुष्यात अनुभवलेले प्रत्यक्षात उतरवणे हे कठीण काम नावडकर सरांनी केले आहे.
    तसे सामान्य माणसाचा लावणी, फड व त्यातील कलाकारांशी व त्यांच्या जीवनाशी संबंध येत नाही. त्याचीच ओळख सरांनी करून दिली आहे. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..