एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला. आमच्या शाळेत आम्ही त्याला ठेवू शकत नाही.” स्लो लर्नर असा शिक्का मारुन त्या पालकांच्या हातात एक कागद देतात.
पालक त्या मुलाला दुसऱ्या शाळेत घालतात. परंतु या प्रकाराने मुलगा बावरुन जातो. त्याचा आत्मविश्वास संपून जातो. त्या रात्री शाळेने दिलेली चिठ्ठी घेऊन आई वडील त्याच्या खोलीत जातात. त्याच्या समोर ती चिठ्ठी टराटरा फाडतात. ते मुलाला सांगतात “आमचा या निर्णयावर विश्वास नाही. आमच्या ते तू अगदी नॉर्मल आहेस. आम्ही हे सिध्द करुन दाखवू. तू फक्त आमच्यावर तू विश्वास ठेव. आम्ही तुझी शाळा बदलली कारण आधीच्या शाळेने तुझ्या विषयी पूर्वग्रह करुन घेतला होता. तो चुकीचा होता. परंतु तो बदलणे आम्हाला शक्य नव्हते.”
दुसऱ्या दिवशीपासून आई वडील आळीपाळीने मुलाचा अभ्यास घेऊ लागतात. त्याच्या खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात लक्ष देऊ लागतात. परिणामी पहिल्या परीक्षेत मुलाला चांगले यश मिळते. वार्षिक परीक्षेत तर मुलगा पहिल्या पाचात येतो. मुलाला आपला हरवलेला आत्मविश्वास परत मिळतो.
गोष्ट साधीशी आहे परंतु आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात. कोणीतरी आपल्यावर कुठल्यातरी नावाचे एक लेबल लावते. मी लहान असताना माझ्यावर काळ्या रंगाचे लेबल चिकटवले होते. त्या रंगाच्या भीतीतून बाहेर पडायला मला अनेक वर्षे लागली. मी खूप यातना सहन केल्या. परंतु रंगापेक्षा चारित्र्य जास्त महत्वाचे असते हे कळायला लागल्यानंतर मी त्यातून मुक्त झाले.
बऱ्याच जणांच्या माथी असेच कुठले ना कुठले लेबल असते. ते आपणच निर्धाराने पुसून टाकायचे असते. आपण जसे आहोत तसे आपण प्रथम स्वतःला स्विकारायला हवे. त्यानंतर आपल्या इतर गुणांनी आपली कमजोर बाजू सांभाळून घेणे कठीण नसते. जगातली अनेक थोर माणसे अशाच पध्दतीने आपली लेबले फाडून टाकून मोठी झाली हे आपण लक्षात ठेवायला हवे.
थॉमस अल्वा एडिसन, ज्याने दिव्याचा शोध लावला त्या एवढ्या मोठ्या जगतविख्यात शास्त्रज्ञाला देखिल लहानपणी शाळेतून काढून टाकले होते. शाळेच्या मते तो एक मठ्ठ मुलगा होता, काहीही शिकण्याच्या लायकीचा नव्हता. पण त्याच्या आईने त्याला घरी शिकविले. तो मोठा शास्त्रज्ञ झाला. त्याने दिव्याचा शोध लावला. त्याची कीर्ती जगभर पसरली.
त्याच्या आईचे निधन झाल्यावर सहज एक दिवस तिच्या कपाटात काहीतरी शोधताना त्याच्या हाताला त्याच्या शाळेची अनेक वर्षांपूर्वीची ती चिठ्ठी लागली. शाळेने त्याला मठ्ठ ठरविले होते हे त्यात लिहिले होते. आईने मात्र त्याची शाळा सोडवताना त्याला असे सांगितले होते की “तू फार हुशार असल्यामुळे शाळेने तुला घरी अभ्यास करायला सांगितले आहे.” एडीसनने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व आपले शिक्षण पूर्ण केले.
ती चिठ्ठी वाचून एडिसनला धक्का बसला. त्याच्या आईने त्याला सावरले नसते अथवा त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर हे जग एका मोठ्या शास्त्रज्ञाला मुकले असते. एडिसनला त्यावेळी शाळेचे मत कळले असते तर कदाचित तो आत्मविश्वासाने पुढे जाऊच शकला नसता. त्याचे लेबल फाडण्याचे काम त्याच्या आईने केले.
ज्या माणसांमध्ये कमकुवतपणा असतो त्यांना आपणच बळ द्यायचे असते. मीताच एक व्हिडीओ पाहिला. एक हात आणि पाय नसलेला माणूस काय काय करु शकतो याचे ते प्रात्यक्षिक होते. अशीच एक दोन्ही हात नसलेली मुलगी विमानाची पायलट झालेली मी पाहिली आहे. या लोकांना सुरुवातीला लोकनिंदेला तोंड द्यावे लागले होते. अपंगत्वाचे लेबल त्यांच्या माथी चिकटवून आपला समाज मोकळा झाला होता. परंतु या शूर लोकांनी लोकापवाद बाजूला सारुन सामान्य माणसांपेक्षा अधिक यश मिळवून दाखविले होते. या आणि अशाच कथा सतत आपल्या समोर ठेवा. तुम्हीही यशाची शिखरे काबीज कराल.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply