सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात येते. या रागात, जोगिया, मारवा रागात आढळणारे पिळवटून टाकणारे दु:ख नसते,यमन प्रमाणे सर्वस्व समर्पण करण्याची वृत्ती दिसत नाही, मालकंस प्रमाणे अचाट भव्यता आढळत नाही आणि दरबारीप्रमाणे स्वरांचे अलौकिक वैभव बघायला मिळत नाही. केदार ऐकताना, इतर रागांची आठवण येते पण तरीदेखील, स्वत:चे व्यक्तित्व जपून ठेवलेले असते.
वास्तविक, या रागात मध्यम आणि पंचम स्वरांचा आढळ दिसतो पण तरीही मध्यम स्वराचे स्वामित्व इतके प्रखर असते की, बिचारा पंचम बाजूला वळचणीला पडलेला दिसतो. शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम, या दोन्ही स्वरांने या रागाला बांधून ठेवले आहे. याचाच परिणाम असा झाला, या रागाच्या वादी-संवादी स्वरांत षडज स्वराबरोबर मध्यम स्वर येणे अगदी अपरिहार्य झाले. या रागाच्या स्वरयोजनेत, प्रत्येक ठिकाणी मध्यम येणे, जवळपास अनिवार्य ठरावे, इतके महत्व या स्वराला प्राप्त झाले. अर्थात, रागाचे स्वरूप “षाडव-संपूर्ण” असे असल्याने, स्वरविस्तार मात्र भरपूर आढळतो. इथे आपण, या रागाची खास ओळख दाखवणारी स्वरयोजना बघूया.”म ग प म(तीव्र) प ग म ध” हे स्वर केवळ आणि केवळ केदार रागाचीच ओळख दाखवतात आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, “मध्यम” स्वर या रागाला कसा व्यापून टाकणारा आहे, हेच इथे दिसून येईल.
आता रागाचा “स्व” भाव बघायला गेल्यास, इथे बहुतेक सगळ्या भावनांना भरपूर वाव आहे. प्रणयी, राग, विरह, प्रार्थना इत्यादी अनेक भाव या रागातून यथार्थपणे ऐकायला मिळतात आणि त्यायोगे रागाचे वैविध्य!!
आता आपण, इथे उस्ताद राशीद खान यांची एक सुंदर रचना या रागात आहे. मुळात केदार सारखा लडिवाळ राग आणि त्याला जोडून उस्तादांची तशीच लडिवाळ लय!! रचना खुलून आलेली आहे. “कान्हा रे, नंद नंदन” ही तीनतालातील बंदिश आहे. या बंदिशीत, गायकाने घेतलेल्या ताना, बोलताना आणि हरकती मुद्दामून ऐकण्यासारख्या आहेत. रागदारी संगीत म्हणजे केवळ तानांची भेंडोळी किंवा सरगमची बरसात असे नसून, आधीच्या तानेशी तितकेच नाते सांगत आणि ते सांगत असताना, स्वरविस्तार कसा करायचा, याचा सुंदर वस्तुपाठ आहे. रचना द्रुत लयीत आहे पण, केवळ लय द्रुत आहे म्हणून बंदिशीतील शब्दांना ओरबडलेले नसून, त्यातील ऋजू भाव आपलेपणाने आपलासा केला आहे.
चित्रपट संगीतात, संगीतकार नौशाद यांनी रागदारी संगीताचा मुबलक वापर केला आहे. सुदैवाने, ज्या चित्रपटात शास्त्रीय सांगितला प्राधान्य आहे, असे बरेच चित्रपट मिळाल्याने, नौशाद यांना, रागदारी संगीत वापरण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यांनी, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. प्रस्तुत गाणे, “मुगल-ए-आझम” चित्रपटातील आहे आणि केदार रागाची खरी ओळख करून देणारे आहे. हे गाणे , एक कविता म्हणून देखील नि:संशय वाखाणण्यासारखे आहे. अर्हत, याचे श्रेय, शकील बदायुनी, या शायरकडे जाते.
“ऐ मेरे मुश्कीला-कुशा, फरियाद है,फरियाद है;
आप के होते हुये दुनिया मेरी बरबाद है,
बेकस पे करम किजिये, सरकार-ए-मदिना;
बेकस पे करम किजिये”.
अगदी, गाण्याचा सुरवातीच्या शब्दापासून जर नीट ऐकले तर, “नखशिखांत” केदार असेच म्हणता येईल, किंबहुना, केदार रागाचे लक्षण गीत म्हणून सहज ओळखले जाते. तुरुंगाचा भव्य सेट आणि चित्रपटातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी योजलेले हे गाणे. अशा गाण्यात, लताबाईंची गायकी देखील कशी खुलून येते. गाण्यात जवळपास सगळे उर्दू भाषिक शब्द आहेत आणि उर्दू भाषेचा स्वत:चा म्हणून खास “लहेजा” असतो आणि तो नेमका जाणून घ्यावा लागतो, ज्यायोगे त्या भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. या दृष्टीने देखील हे गाणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे.
विरहाची गाणी गाणे, हे लताबाईंच्या गळ्याला जितके शोभून दिसते तितके इतर गळ्याला नाही. इथे हाताशी केदार रागाची तर्ज, शकील बदायुनीची अप्रतिम शायरी आल्यावर, गायिकेने चालीचे सोने केले तर त्यात नवल ते कुठले!! मुळातला नाजूक स्वभावाचा राग, त्यातील तानांची भेंडोळी बाजूला सारून, नेमक्या स्वरावलींनी खुलावलेली चाल, हा खऱ्या अर्थी श्रवणानंद आहे.
“एक मुसाफिर एक हसीना” या चित्रपट केदार रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे ऐकायला मिळत. वास्तविक केदार राग, शक्यतो प्रार्थना, भजन अशा रचनांसाठी उपयोगात आणला जातो पण, इथे संगीतकार ओ.पी. नैय्यर यांनी अगदी संपूर्ण वेगळ्या धर्तीवरील गाणे सादर केले आहे आणि रागदारी संगीत किती प्रकारे मांडता येऊ शकते, याचा सुंदर नमुना पेश केला आहे.
“आप युंही अगर हम से मिलते रहे,
देखिये एक दिन प्यार हो जायेगा;
ऐसी बाते ना कर ओ हंसी जादुगर
मेरा दिल तेरी आंखो मी खो जायेगा”.
आशा भोसले यांच्या कारकिर्दीला खरा आकार मिळाला, तो याच गाण्याच्या संगीतकाराकडे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. ओ.पी. नैय्यर वास्तविक, संगीताचे शास्त्रशुध्द अभ्यास करून झालेले संगीतकार नव्हेत परंतु तरीही त्यांनी ज्या प्रकारे तालाचा वापर, त्यांच्या गाण्यांमधून केलेला आहे, तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. इथे देखील या गाण्यात केहरवा ताल आहे पण, त्याचे वजन इतके उठावदार आहे की त्या तालावर आपली मान डोलायलाच हवी. या गाण्यात बघा, सुरवातीच्या दोन ओळी झाल्यावर लगेच सतारीची किणकिण कानावर येते आणि ती किणकिण, हीच केदार रागाची खूण आहे. लेखाच्या सुरवातीला, मी एक स्वरसमूह दिला आहे, त्याचे तंतोतंत प्रत्यंतर या सतारीच्या सुरांतून आपल्याला मिळते. किंबहुना संपूर्ण गाण्यात, मधूनच आलापी आणि त्याच्या जोडीला सतारीचे स्वर, असा स्वरमेळ ऐकायला मिळतो आणि तो स्वरमेळ, केदार रागाकडेच निर्देशन करीत असतो.
ही गाणे आणि याआधीचे गाणे, केदार राग किती मनोरंजक पद्धतीने मांडता येतो, याचे निर्देशक आहेत. वास्तविक या गाण्यात, केदार शुद्ध स्वरूपात, सारखा आढळत नाही परंतु सावलीबाहेर जाउन देखील, सावलीशी साहचर्य सतत राहते. एक दोन ठिकाणी चक्क लोकसंगीताशी नाते जोडलेले दिसून येते पण ही तर संगीतकाराच्या व्यामिश्रतेची कमाल म्हणायला हवी.
मेहदी हसनची गायकी हा एक स्वतंत्र दीर्घ निबंधाचा विषय आहे. अत्यंत मुलायम तसेच रागदारी संगीतातील सगळ्या अलंकारांचा ठाशीव उपयोग करून घेणारा. साधारणपणे, मंद्र सप्तकात शक्यतो गायन करण्याची वृत्ती असल्याने, गझलेतील, शब्दांचे सौंदर्य कसोशीने सादर करण्याची सवय इत्यादी वैशिष्ट्यांमुळे मेहदी हसन, हे नाव अजरामर झाले. हा खऱ्याअर्थी गझल गायकीतील “उस्ताद”!!
“भुली बिसरी चंद उम्मीदे, चंद फसाने याद आये;
तुम याद आये और तुम्हारे साथ जमाने याद आये.”
“भूली बिसरी चंद उम्मिदे” सारखी अप्रतिम गझल केवळ याच गळ्यातून यायला हवी, अशी अपरिहार्यता याच्या गायनाची आहे. इथे बघा, सुरवातच अगदी केदार रागाच्या सुरांची ओळख करून दिली आहे. पुढे केदार राग बाजूला राहतो पण तरीही या रागाचा “असर” सगळ्या रचनेवर निश्चित पडलेला आहे. सुरवात अगदी ठाय लयीत होऊन, पुढे हळूहळू द्रुत लयीत शिरण्याची लकब आणि ती देखील फारशी जाणीव करून न देता!! अंतरा संपत असताना, केहरवा ताल एकदम दुगणित जातो आणि लय थोडी द्रुत होते पण हा सगळा सांगीतिक खेळ, लयीचे सगळे “विभ्रम” भलतेच अप्रतिम आहेत. गंमत बघा, इथे पारंपारिक केहरवा ताल आहे तर या आधीच्या चित्रपट गाण्यात हाच ताल असून, तसा पटकन ध्यानात येत नाही.
अशीच एक सुंदर प्रार्थना हिंदी चित्रपट “गुड्डी” मध्ये आहे आणि या गाण्याच्या निमित्ताने आणखी एक “वाणी जयराम” नावाची दाक्षिणात्य गायिका हिंदी चित्रपट जगात अवतरली.
“हम को मन की शक्ती देना, मन विजय करेंगे;
दुसरो के जय से पहेले, खुद को जय करेंगे”.
खरे बघितले तर संगीतकार वसंत देसाई यांची कारकीर्द प्रामुख्याने झळकली ती,राजकमलच्या चित्रपटांमधून परंतु त्याबाहेर देखील त्यांनी भरपूर काम केले आहे आणि त्याद्वारे, आपल्या प्रतिभेचे वेगवेगळे रंग दाखवून दिले आहेत. चालीतील वैविध्य तसेच रचनेत, अचानक नवीन लयबंध तयार करून, ऐकणाऱ्याला चकित करून सोडायचे, ही त्यांच्या रचनेची खासियत होती. इथे देखील हेच आपल्या दृष्टीस पडेल. गाण्याच्या सुरवातीलाच जी मंद्र सप्तकातील लय आहे, तिचेच स्वर, केदार रागाचे सूचन करतात. शाळेतील प्रार्थना आहे, हे लक्षात घेऊन, गाण्यात फारशी “गायकी” न ठेवता, केवळ चालीतील गोडव्यातून, प्रार्थना उभी केली आहे परंतु आपले म्हणून खास वैशिष्ट्य असावे म्हणून की काय पण, गाण्याचा ताल बघण्यासारखा आहे. वारंवार वापरला जाणारा दादरा ताल आहे पण, ऐकायला येताना, तेच “बोल” फार अनोख्या पद्धतीने आले आहेत. केदार रागाचे जे “आर्जव” आहे, ते अशा रचनेतून फारच सुरेख व्यक्त होते.
मराठी चित्रपट “अवघाची संसार” मध्ये या रागावर आधारित अतिशय श्रवणीय गाणे आहे. संगीतकार वसंत पवारांची चाल असून शब्दकळा ग.दि. माडगुळकरांची आहे. अत्यंत प्रासादिक आणि गेयतापूर्ण, तसेच आशयघन अशी कविता आणि वसंत पवारांसारखा प्रतिभावंत संगीतकार!!
“फुले स्वरांची उधळीत भोवती, गीत होय साकार;
आज मी आळविते केदार”.
गायिका मधुबाला झवेरी या म्हटले तर बिगर मराठी गायिका परंतु गाणे ऐकताना, त्याचा चुकूनही भास होत नाही. अर्थात, हे श्रेय जितके गायिकेचे आहे तितकेच संगीतकाराचे देखील आहे. गाण्याचा पहिला आलाप ऐकताना, डोळ्यासमोर फक्त “केदार” राग(च) येतो. अतिशय अवघड आणि गायकी ढंगाची आलापी आहे. गाण्यात त्रिताल वापरला आहे आणि चालीची जातकुळी खरतर “बंदिश” होऊ शकेल, अशा प्रकारची आहे पण वसंत पवारांनी तसे चुकूनही घडणार नाही, याची काळजी घेतली आहे आणि एक अप्रतिम चित्रपट गीत सादर केले आहे.
आज मी आळविते केदार
Leave a Reply