लहानपणातलं बालपण हरवत चालल्याचं पदोपदी जाणवतं. एकूणच बदलत चाललेली जीवनशैली, जीवनमान, गरजा आणि अपेक्षा ह्या सर्वच बाबींचा समाजमनावर आणि विशेषतः बालमनावर होत असलेला विपरीत परिणाम दुर्लक्षित करून चालणार नाही, हे आपल्या प्रत्येकानं स्मरणात घेतलं पाहिजे. दिवसेंदिवस निर्माण होत जात असलेल्या आपापसातील दुराव्यामुळे रक्ताच्या नात्यातील ओलावा राहण्याची शक्यता कमी होत चाललेली असल्याचं जाणवत आहे. एक काळ असा होता, जेव्हा नव्यानं नाती निर्माण केली जायची. काही वेळा तर ती रक्तापलीकडची असून सुद्धा अधिक घट्ट असायची. अलीकडील काही दिवसांत अगदी मोजक्याच नात्याचं कुटुंब आपल्याच भावविश्वात रममाण झालेलं दिसून येतं. अर्थात याला बदलत चाललेली जीवनशैली, मानसिकता कि व्हर्च्युअल जगाची उत्पत्ती कारणीभूत आहे, हा कळीचा मुद्दा आहे.
आपण केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून बालमनावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्यानं अभ्यासपूर्वक विचार करायला हवा. बालसंगोपनात अनकेदा काळजी केवळ संबंधित बाळाच्या शरीराचीच घेतली जाते. खरं तर विचार बाळाच्या बालमनाचा प्राधान्यानं आणि प्रकर्षानं केला गेला पाहिजे.
अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply