नवीन लेखन...

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये डॉ. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी लिहिलेला हा लेख


अगदी थोर पुरुषांना देखील बालपणाचा मोह सुटलेला नाही. सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त दिनक्रमातही मला जेव्हा डॉक्ट असल्यामुळे विविध शाळांमध्ये आरोग्य तपासणीसाठी बोलावले जाते तेव्हा तेव्हा मी आवर्जून मुलांसाठी तपासणीस जातो. लहान मुलांसोबत घालवलेल्या क्षणांमुळे मला एक वेगळाच आनंद मिळतो. क्लिनिकमध्ये देखील जेव्हा जेव्हा पालक आपल्या मुलांना तपासणीसाठी घेऊन येतात आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि आरोग्यविषयक तक्रारींचा पाढा वाचतात तेव्हा तेव्हा माझे बालपण भुर्रकन डोळ्यांसमोर येते.

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले. माझ्या बालपणातील काही काळ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घाटनांदूर या छोट्याशा गावी आणि काही काळ केज व गढी येथे नवोदय विद्यालयातील वसतिगृहात गेला. मराठवाडा म्हणजे कमी पाऊस आणि कोरड्या नद्या. परंतु येथील माणसांची मने मात्र प्रेमाने ओथंबून वाहणारी. गावी असताना दिवसाची सुरुवात हीच मुळी धार्मिकतेने भारावलेल्या वातावरणात होत असे. जेव्हा मी आणि माझी दोन्ही भावंडे साखरझोपेत असू, तेव्हा आई लवकर उठून सडा टाकणे, घर सारवणे, इत्यादी कामे करताना अभंग-ओव्या गुणगुणत असे. त्यावेळी कानावर पडलेल्या त्या ओव्या आणि अभंग आम्हाला अजूनही मुखोद्गत आहेत. त्यानंतर आम्ही तिघेजण वडिलांच्या सोबतीने, कळशीने पाणी भरण्याचा कमी आणि सांडण्याचा जास्त कार्यक्रम करत असू. तेव्हा नळ घरापासून थोडे दूर असल्यामुळे अर्धी अंघोळ पाणी भरताना सांडलेल्या पाण्यानेच होत असे. नंतर आई गरम पाण्याने अंघोळ घालीत असे. त्यानंतर आम्ही चार-पाच मित्र मिळून शाळेत जात असू.

शाळेतही माझी हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत असे, त्यामुळे शिक्षक कौतुक करत असत. शाळेतून आल्यानंतर गल्लीतील चार-पाच मित्र मिळून पकडापकडी, विटी-दांडू, लपाछपी इत्यादी खेळ खेळत असू. आईने दोन-तीन वेळा आवाज दिल्यानंतर दमूनभागून घरी परतल्यावर आईचे थोडेसे रागावणे आणि गरम गरम जेवण होत असे. संध्याकाळी रोज एक तास तरी अभ्यास करण्याचा आईचा शिरस्ता असे. नंतर आईकडून चांदोबाच्या गोष्टी ऐकत झोप केव्हा लागली कळतही नसे.

आई खूप धार्मिक वृत्तीची असल्यामुळे अनेकदा आईसोबत तीर्थाटनाचा आनंद मिळे. आईमुळे लहानपणीच ज्ञानेश्वरी वाचण्याची सवय लागली. तेव्हा वाचनाचा अर्थ कळत नसे परंतु सर्वांकडून कौतुक करून घेण्यासाठी मी ज्ञानेश्वरी सप्ताह, भागवत सप्ताहामध्ये पोथी वाचत असे.

नंतर जेव्हा नवोदय विद्यालयात नंबर लागला तेव्हा आई-वडिलांपासून दूर राहायचे असल्याने एक वेगळीच भीती मनात होती. परंतु आई मात्र सातत्याने स्वत:च्या आणि माझ्या मनाची तयारी अगोदरपासूनच करत होती. नवोदयमध्ये सर्व समवयस्क मुले-मुली आईवडिलांपासून दूर आल्यामुळे अनेक वेळा घरच्या आठवणींनी एकत्र रडणे, एकत्र गप्पा मारणे, खेळणे असल्यामुळे छान ग्रुप जमले. नवोदयमध्ये कडक शिस्तीचे पालन होत असल्याने लवकर उठणे, व्यायाम, स्वत:चे कपडे स्वतः धुणे, अभ्यास इत्यादी स्वावलंबनाचे धडे मिळाले. रोज सायंकाळी जेवणानंतर ‘रिक्रिएशन’साठी सर्व एकत्र जमत तेव्हा गाणी म्हणणे, गोष्टी सांगणे, कविता सादरीकरण इत्यादी होत असे. लहानपणी घरी वाढदिवस वगैरे साजरे केले नाहीत परंतु नवोदयमध्ये प्रथमच साजरा केलेला वाढदिवस आणि ड्रॉइंग टीचरने दिलेले ग्रीटिंग कार्ड कायम स्मरणात राहिले. येथे आम्हाला उच्च अभिरुचीयुक्त शिक्षक लाभले. येथेच विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात आकारू लागले. मराठीच्या देशपांडे मॅडमनी ‘द गिफ्ट ऑफ मँगो’ ची गोष्ट सांगताना गिळलेला आवंढा आणि आमच्याही नकळत डोळ्यांत जमलेल्या पाण्याने अवांतर वाचनाची गोडी लावली. होस्टेलमध्ये घरून येणारी पत्रे प्रेमाने ओतप्रोत भरलेली असत व वाचताना डोळे पाणावत. नवोदयमधून सुट्ट्यांसाठी घरी जाण्याची प्रचंड ओढ असे. घरी आल्यानंतर आईने वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे आणि मी तिथल्या आठवणी सांगणे असा नित्यनियम असे. नवोदयमध्ये प्रथमच पाहिलेले ‘क्हाड निघालंय लंडनला’ सुट्यांमध्ये घरी सर्वांसमोर करून दाखवताना मिळालेल्या कौतुकाचा वर्षाव केवळ अवर्णनीय!

बालपणातील अनेक मित्र व अनुभव आयुष्य समृद्ध करणारे ठरले. कालौंघात अनेक गोष्टी, आठवणी दुरावल्या असल्या तरीही प्रसंगानुरूप येणाऱ्या आठवणी तप्त धरित्रीवर पावसाचा शिडकावा होऊन मृद्गंध दरवळावा तद्वत माझ्या मनात रुंजी घालू लागतात आणि एक सुखद अनुभूती देऊन जातात.

–डॉ. बाळासाहेब सूर्यवंशी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..