नवीन लेखन...

लहानपणाचा ठेवा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये जयवंत वाडकर यांनी लिहिलेला हा लेख


माझे बालपण हे गिरगावसारख्या समृद्ध विभागात गेले. चिराबाजारमधील चाळीत आमचे घर होते. आमच्या उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी होते. आम्ही कोळी असल्यामुळे समुद्रात मासे पकडायला जायचो. मला पोहायला येत नव्हते त्यामुळे माझ्या बाबांनी मला पोहायला शिकवले. त्याची एक गंमतच आहे. मी पाण्यात पोहायला घाबरायचो म्हणून बाबांनी एकदा समुद्रात नेले आणि खूप दूरवर नेऊन खोल पाण्यात अगदी सोडूनच दिले. नाकातोंडात पाणी गेले पण मी पोहायला शिकलो. नेव्हल डॉकयार्डमध्ये ते फोरमन होते. उत्तम पाईप फिटर तज्ज्ञ होते. त्यामुळे विक्रांत बोटीमध्ये मी कॉलेजला जायला लागल्यानंतर माझे बऱ्याचवेळा जाणे असायचे. मी जसजसा मोठा होत गेलो तसतसे वडीलांबद्दलची भीती नाहीशी झाली. कॉलेजच्या काळात तर ते माझे मित्र झाले.

गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली. माझी मूळ आवड क्रिकेटमध्ये होती. मी खेळायचोही चांगला. काही दिग्गज खेळाडूंनी मला क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिले. त्यामुळे वडिलांनी क्रिकेट खेळायलाही परवानगी दिली. पण माझा कल नंतरच्या काळात बदलला. नाटकाची गोडी वडिलांनी लावल्यामुळे मला नाटकात जास्त रस वाटू लागला. नाटक पहायला जाताना ते कायम नाटकातील कलाकारांसाठी खाऊ घेऊन जायचे आणि नाटक संपल्यानंतर कलाकारांशी बोलून त्यांना ते खाऊ द्यायचे. हा संस्कार माझ्या त्या घडण्याच्या काळात माझ्यावर झाला. मी नाटकाकडे ओढला गेलो तो बाबांमुळेच. नंतरच्या काळात सतीश पुळेकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी नाटक शिकलो. त्यात करिअर करू शकलो. नाटकासाठी मी महाविद्यालयाच्या काळात प्रचंड परिश्रम केले त्यामुळे या क्षेत्रात पाय रोवू शकलो.

माझे बाबा म्हणजे एक वल्ली होते. एकीकडे मिस्किल कार्यामध्ये व्यग्र असणारे आणि प्रचंड हरहुन्नरी. माझ्या पाच काका आणि तीन आत्यांमध्ये बाबांकडे निर्णयक्षमता चांगली असल्यामुळे ते त्यांच्या भावंडांमध्ये वयाने लहान असूनही त्यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जाई. लहानपणी जसा अभ्यास महत्त्वाचा असतो तसेच खेळणेही महत्त्वाचे आहे अशी शिकवण त्याकाळी सर्वच घरात होती. आजकाल मुलांनी खूप सांभाळले जाते. ते त्या काळात नव्हते त्यामुळे पडत, रडत खेळणे हे ही त्या काळातले शिक्षणच होते. जे जीवन जगताना जास्त आवश्यक ठरले, हरण्याची, पुन्हा उमेदीने उभे राहण्याची ताकद त्यातच मिळाली.

आम्ही कोळी समाजाचे त्यामुळे मासे पकडायला जाणे हा आमचा नित्यक्रम असायचा. मी मासे पकडायला बाबांसोबत जायचो. परत मला ते कौशल्य फार आत्मसात करता आले नाही. बाबा आणि त्यावेळचे सर्वच आमचे कोळी लोकं एका विशिष्ट पद्धतीने मासेमारी करायचे. पाण्यामध्ये काही तरी, टाकून माशांना आकर्षित केले जायचे. म्हणजे अक्षरश: मासे प्रचंड संख्येने जाळ्यात अडकले जायचे. हे तंत्र आजच्या कोळ्यांना माहीत नाहीए. माझ्या भावाने मात्र हे तंत्र शिकून घेतले आणि त्याला ते जमलेसुद्धा.

गिरगावसारख्या ठिकाणी राहत असताना सण-सणवार यांची एक गंमत आम्ही अनुभवली. दहीहंडी-गोपाळकाला हा सण तर आमच्याच हक्काचा. आमच्या घरातील सर्वच काका सहा फूटांपेक्षा उंच असलेले आणि तब्येतीनेही. त्यामुळे दहीहंडीमध्ये त्यांची वर्णी लागायची. घरी आलेल्या प्रत्येकाला गोकुळअष्टमीच्या प्रसादाचे गोड पोहे, प्रसादाची फळे आम्ही खायला द्यायचो. त्याकाळी उत्सव-सण याला बाजारी स्वरूप आले नव्हते. त्यामुळे ९ – १० थरांच्या हंड्या वगैरे हा प्रकार नव्हता. आयुष्याची गणिते फार साधी, सोपी होती. तिथे मार्केटिंग या गोष्टीला फार महत्त्वच नव्हते. पण आज ते नको नको त्या ठिकाणी शिरलेय. त्यातून आपले सण-सणवारही सुटले नाहीत. पण आम्ही अनुभवलेले सण-उत्सव याची मजाच वेगळी होती.

आपण अनुभवलेले बालपण हे आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण देते. माझ्याही बाबतीत हेच झाले. क्रिकेटमध्ये दहावी-बारावीपर्यंत रमणारा मी कॉलेजमध्ये जाऊ लागल्यानंतर नाटकाकडे वळलो याला कारणीभूत माझ्या वडीलांचे नाटकाबद्दलचे प्रेम. वडील करारी, शिस्तप्रिय पण तरीही आमच्यावर खूप बंधने लादली असे झाले नाही. जगण्यातले बिनधास्तपण अनुभवता आले म्हणून आम्ही खंबीर झालो. या काळातल्या सण संस्कृती याचा पगडा जरी आमच्यावर होता पण आम्ही अंधश्रद्धाळू अजिबातच नव्हतो. काही ठळक नोंदी मला आठवतायत. आम्ही मासे मारायला जायचो तर तेव्हा ओले झालेले कपडे गिरगाव स्मशानभूमीच्या चितेजवळ आम्ही वाळण्याकरिता घालायचो. कोणतेही भूत, आत्मा आमच्यात आजवर शिरला नाही हे विशेष! स्मशानात आमचा भुतांसारखाच वावर असायचा. लहान मुलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहाव्या, बाराव्यात जर त्यांच्यासाठी काही खाद्यपदार्थ वगैरे ठेवले असतील तर आम्ही ते फस्त करायचो. त्यामागे कधी भीती, लाज वगैरे वाटलीच नाही. ते अन्न असेच वाया जाण्यापेक्षा आमच्या पोटात गेलेले बरे असा साधा व्यावहारिक भाव आमच्या मनात असायचा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही गेलो नाही. पूर्वीच्या लहानपणीच्या सर्वच गोष्टी आज पाळतोय असे नाही. काळाच्या ओघात बरेच बदल झाले खरे, ते स्वीकारत आताचे आयुष्य जगणे महत्त्वाचे वाटते. पण बालपण देगा देवा असे अजूनही वाटते.

–जयवंत वाडकर
शब्दांकन: प्राकर. दीपा ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..