लाजतो भाग्यास..
आम्ही बोलतो मराठी..
जाहलो खरेच हीन
ऐकतो मराठी..!
गोष्ट गेल्या आठवड्यातली.
मुंबईच्या फोर्ट विभागातील एका बड्या नामांकित साॅलिसीटर फर्ममधे एका मिटींगसाठी गेलो होतो. आम्ही दोघं अस्सल मराठी. ज्यांच्यासोबत एका प्राॅपर्टीचं बोलणं करायचं होतं ते दोघं अस्सल गुजराती बेपारी. आणि आम्हाला सल्ला देणाऱ्या साॅलिसिटर बाई आणि त्यांची ज्युनिअर..ह्या दोघी नेमक्या कोण प्रांतीय होत्या, ते लक्षात येत नव्हतं.
चर्चा सुरू झाली. आम्ही सर्वांना कळावं म्हणून हिन्दीचा आधार घेतला होता. गुर्जर बेपारी बंधू आवर्जून मराठीतच बोलत होते. गुजराती-मारवाडी जिथे जिथे म्हणून व्यापारासाठी जातात किंवा गेलेत, तिथली स्थानिक भाषा त्यांनी तिच्या बारकाव्यांसकट आत्मसात केली आणि त्यांच्या व्यापारात यशस्वी होण्यामागचं सर्वात मोठं रहस्य हेच आहे..या त्यांच्या स्वभावाला जागून आमच्या सोबत व्यवहाराला बसलेल्या ते दोघं गुजराती मराठीची कास सोडायला तयार नव्हते. आणि देशी वर्णाच्या आमच्या साॅलिसिटर बाई मात्र ऑक्स्फर्ड-केंब्रिजची साथ सोडायला तयार नव्हत्या..त्यांचं उच्च प्रतिचं बोललणं, ते ही कायद्याच्या भाषेतलं, बरचसं आमच्या डोक्यावरून जात होतं. वास्तविक त्यांना काय म्हणायचंय, ते त्या हिन्दीतही समजावून सांगू शकत होत्या. मात्र तसं केलं तर आपलं आणि आपल्या फर्मचं नांव मातीत मिळेल की काय, अशी भिती त्यांना वाटत असावी..
आमची चर्चा संपली. म्हणजे कायद्यात हे कसं बसवायचं हे, त्या साॅलिसिटर बाई समोर असुनही, काहीच न कळता संपली. आम्ही जायला निघालो आणि साॅलिसिटर मॅडमनी चक्क अस्खलित मराठीत आमचा निरोप घेतला. मी एकदम सदम्यातच गेलो. मी मॅडमना विचारलं, तुम्ही मराठी आहात का, तर मॅडमनी आजुबाजूला कोणी नाही असं बघत होय म्हणून सांगीतलं आणि मी पुढे आणखी काही विचारायच्या आत त्या निघुनही गेल्या..
यावरून मी पु. ल. देशपांडेच्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकात वाचलेला एक उतारा आठवला. पु. ल. लिहितात, “आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट ऑफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा तीथला नियम असतो..देशी भाषा अन् देशी कपड्यांना आपल्या देशात कवडीचीही किंमत नाही..गोरी कातडी दिसली की तळवे (चपलांसहीत) चाटतील..काळ्या रंगाचा द्वेष आपण करतो तीतका गोरेपण करत नसतील याची खात्री आहे..
मातृभाषा बोलायची कोणाला मरणाची लाज वाटत असेल, तर ती आपल्याच देशी (यात मराठी बहुसंख्येने व इतर प्रांतीय अपवादाने) लोकांना..!!आपल्या भाषेबद्दल, कपड्यांबद्ल लाज आणि न्युनगंड बाळगणे हेच आमचे सर्वात मोठे भूषण..!”
पुलंचं हे निरिक्षण साधारण तीस-पस्तिस वर्षांपूर्वीचं असावं. इतक्या वर्षांनंतर परिस्थिती आणखीनच बिघडली आणि सध्यातर ती अगदी दुरुस्तीच्याही पलिकडे गेली की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.. सुरुवातीच्या चार ओळी याच विषण्णेतेतन लिहिल्या आहेत..
मराठी बंधुंनो आणि भगिनींनो, आपण यावर सकारात्मक विचार आणि कृती करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे..!
— © नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply