नवीन लेखन...

लक्ष्मणरेषा श्रध्दा – अंधश्रध्देची

कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही…

“दगडी देव इच्छा पुरवीत तरी का भंगते आघाताने” संत नामदेव  हे म्हणून गेले; पण लोकांच्या मनातील रुढीचा दगड आजही भंगत नाही. रुढीच्या पुढे विज्ञानही लोळण घेत आहे. ताकिर्कता संपली, की चमत्कारांचे संमोहन आपल्याला कवेत घेते. ताकिर्कतेपेक्षा धार्मिकतेच्या कोषातच गुरफटायला लोकांना आवडायला लागले, तर तुम्ही – आम्ही काय करणार? प्रश्नच निर्माण होण्यापेक्षा एखाद्या शक्तिलाच शरण जाण्यात लोक धन्य मानत आहेत.

पूर्वीच्या लोकांना विज्ञान माहित नसेल; पण ज्ञान होते, म्हणी आजही खर्‍याच आहेत.

नवसे कन्या पूत्र होती। तरी का करणे लागे पती ।।

– संत तुकाराम

हे आहे पण वास्तव समोर येत नाही, आले तरी गांभीर्याने त्याची दखल घेतली जात नाही. म्हणीचेही असेच आहे. जसे वास्तव समोर येते, तसे माणसे आपला जीवनक्रम ठरवतात.

पुरावे समोर असूनही माणसे गर्तेत लोटले जातातच. ‘तहलकाची चित्रफीत, सत्यसाईबाबांच्या हातचलाखीची चित्रफीत पाहूनही लोक पुन्हा “येरे माझ्या मागल्या” या म्हणीलाच न्याय देतात. म्हणी या उद्बोधनासाठी निर्माण झाल्या; पण त्या मनोरंजनाचे साधन ठरत आहेत, हे दुर्देव आहे.

जिथे घराला दरवाजे नाहीत, जिथे चोरी होत नाही, जिथे शनीची मूर्ती नाही, भव्य शिला आहे, शिंगणापूर भारतभर प्रसिध्द झाले आहे, ते प्रसारमाध्यमांमुळे. रोज एक हजार किलो गोडेतेल म्हणजेच महिन्याला १२ लाख रुपये तेलात बुडतात. रात्रंदिन  आम्हा तेलाचा प्रसंग, अशीच ती शिला म्हणत असेल. १२ लाख रुपयांत ग्रामविकास योजना होऊ शकते.

शनीला येताना व जातानाही अपघात होऊ शकतो, तेथील पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. शनिदेवाच्या मंदिरातील पेटी सीलबंद करावी लागते. विजेची, तसेच कालव्याच्या पाण्याची चोरी होते, हे व असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्री-पुरुष समानता याचा पराभव शनी शिंगणापूरला आजही पाहावयास मिळतो. स्त्री विमान चालवून उत्तुंग भरारी आकाशत घेऊ शकते; पण शनीच्या चौथर्‍यावर चढू शकत नाही. विहिरीला स्पर्शही करु शकत नाही. पशुहत्या करणारे जास्त, रोखणारे कमी. ते काहीच करु शकत नाहीत. मूकपणे पाहू शकतात. अंधश्रध्दा निर्मूलन समिती कमी पडते. देव असलाच तर काय घ्या? म्हणून अनेक जण “का?” “कसे?” या चिकित्सेच्या नादी, लागत नाहीत. देवाला समर्पित अनेक जण आहेत. देवाला प्रमाण मानून त्यांनी आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेतच ते जगतात. देव मानण्यात गैर नाही; पण कर्मकांडात गुंतू नये, रुतू नये, असे अनेकांना वाटते. कोणती तरी शक्ती आपल्याला तारते, त्याला ते समर्पित असतात; पण कार्यकारण भाव, विज्ञान याकडेही त्यांनी दुर्लक्ष करु नये. कार्यकारण भाव समजला, की “चमत्कार” चमत्कार राहत नाही, ती घटना होते. कार्यकारण भाव कधी कधी आकलनाच्या बाहेर असल्यामुळे, त्या त्या वेळेस सिध्द होत नसल्यामुळे जादू व चमत्कार यांनी मानवी मनावर साम्राज्य केले आहे. श्रध्देचे श्राध्द केले, की लोकांना राग येतो. श्रध्देपोटी असत्यही लोक स्वीकारतात. त्यातले सत्य, त्याचे विश्लेषण स्वीकारण्यात वेळ जातो. पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, का सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हा संभ्रम विज्ञानाने दूर केला; पण हा संभ्रम लोकांनी श्रध्देपोटी जपला. “दृष्टिआड सृष्टी” मध्ये लोक धन्यता मानतात.

समूहापुढे मानसशास्त्र निष्प्रभ ठरत आहे. कुत्रा चावल्यावर भाकरी देणे, मांत्रिकाने पोटाला हात लावण्याने स्त्री गरोदर राहते, हवेतून सोन्याची साखळी, नवस इ. हे चालले आहे? आपण हे सर्व थोपवू शकत नाही. एक प्रेक्षक होऊन हा तीन पैशाचा तमाशाच आपल्याला पाहावा लागतो. प्रसारमाध्यमे व्यापार करत आहेत. तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळे झाली आहेत, देवाला जाण्यास केवळ भक्ती  आहे का? मनोरंजन, बदल, एकांत, मनःशांती यासाठी लोक देवाला जात आहेत.

नवस ही याचना आहे. नवस परीक्षेत “होय”, “नाही” किवा “यापैकी कोणतेही नाही” हे पर्याय असतात. कोणत्याही गोष्टीसंदर्भात कोणती ना कोणती शक्यता लागू होते. “होयबा”वाले मनातली गोष्ट पूर्णत्वास गेली म्हणून नवस” फेडतात, बाकीचे “नशीब” म्हणून पुन्हा पुन्हा परीक्षेस बसतात.

नवस देवघेव आहे, व्यापार आहे. नवस फेडणार्‍यांसाठी व्यापारी तत्पर सेवा बजावतात. चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्या यांनी देवाला प्रसिध्दीच्या झोतात पुन्हा आणले. यांचे हेतु शूध्द आहेत का? व्यापार करणे हाच यामागचा उद्देश आहे. चमत्कार किवा नवसास देव पावला, ही दोन्ही नावे अज्ञानाचे प्रतिशब्द आहेत, ज्ञानाचे नव्हेत, असे सावकारांनी म्हटले आहे. हे कुठेतरी बदलले पाहिजे; पण बदलत नाही. समूह लोकांना बदलू देत नाही.

श्रध्दा, अंधश्रध्देची लक्ष्मणरेषा आखून त्यातच राहणे लोक पसंत करतात. प्रलोभनापासून वाचण्यासाठी, संयमासाठी लक्ष्मणरेषा ठीक आहे; पण लक्ष्मणरेषा आखणार्‍या लक्ष्मणाचा आज भरवसा देता येत नाही. सगळीकडेच व्यापार आहे, ही आजची शोकांतिका आहे. आजची दुःखे दलालांनीच वाढवली आहेत.

— डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 31 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..