आज १३ सप्टेंबर….हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मा.लालजी पांडे उर्फ अंजान यांची पुण्यतिथी
लालजी पांडे उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. लालजी पांडे उर्फ अंजान हे एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. प्रारंभीच्या काळात छोट्या चित्रपटांतून गीतलेखन करणा-या अंजान यांच्या गीताने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाण्यांतून आपली श्रेष्ठ काव्यप्रतिभा सिद्ध केली. त्यानंतरच्या काळात गरिबांचा अमिताभ म्हणून ओळख असणा-या मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांतील अंजान यांची गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. सुपरस्टार्सच्या कारकिर्दीला आपल्या गीतांनी फुलवणारा गीतकार म्हणून अंजान यांची ओळख आहे.
अंजान यांना लहानपणांपासूनच हिंदी भाषेची प्रचंड आवड. त्या गोडीतूनच उर्दू साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या काव्यप्रतिभेला नवा आयाम मिळाला. प्रेमनाथ त्या वेळी फार्मात होता. त्याने आपल्या एका चित्रपटासाठी या तरुण लालजी पांडे उर्फ अंजान यांची निवड केली. 1953 मध्ये पडद्यावर झळकलेला ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’ हा तो चित्रपट. यातील शहिदों अमर है तुम्हारी कहानी आणि लहर ये डोले कोयल बोले ही दोन गीते अंजान यांनी लिहिली. त्यानंतर अंजान यांनी ब-याच छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. जी. एस. कोहली या संगीतकाराबरोबर त्यांचे सूर त्या काळात जुळले. प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ‘गोदान’ चित्रपटासाठी पंडित रवी शंकर यांच्या संगीताने नटलेली अंजान यांची गाणी विशेष गाजली. ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने सजलेले अब के हसीन रुख पे (बहारे फिर आएंगी) हे त्या काळी गाजलेले गाणेही अंजान यांचेच. त्यानंतर कल्याणजी-आनंदजी या संगीतकारांबरोबर त्यांची वेव्हलेंथ जुळली. मग मात्र अंजान यांनी मागे वळून पाहिले नाही. अमिताभ त्या वेळी चित्रपटांत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. अमिताभचा ‘जंजीर’ हिट झाला आणि सारे समीकरण बदलले. प्रकाश मेहरांनी मग अमिताभ आणि अंजान अशी टीम जुळवली. त्यातूनच पुढे इतिहास घडला. खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, शराबी ही काही उदाहरणे. चंद्रा बारोटच्या डॉनची गाणीही अंजान यांचीच. कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत, अंजान यांची गीते आणि पडद्यावर अमिताभ या सूत्राने मग रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.
अमिताभप्रमाणेच मिथुन चक्रवर्तीच्या गाजलेल्या चित्रपटांची गाणी अंजान यांचीच आहेत. डिस्कोच्या जमान्यातही गीतांतील शब्दांचे महत्त्व अंजान यांनी कुठेही कमी होऊ दिले नाही. उलट अर्थपूर्ण शब्दरचनांनी डिस्कोला प्रतिष्ठा मिळवून दिली. गंगा नदी आणि भोजपुरी भाषा यांचा वापर अंजान यांनी अनेक गाण्यांतून केला. मानो तो मै गंगा माँ हूँ, ना मानो तो बहते पानी (गंगा की सौगंध), खैके पान बनारसवाला (डॉन) यातून त्यांचे बनारसशी असलेले नाते अधिकच दृढ होते. उपमांचा समर्पक वापर हे अंजान यांच्या लेखणीचे आगळे वैशिष्ट्य. सलाम ए इश्क (मुकद्दर का सिकंदर) मधला प्रेमभाव असो, की छू कर मेरे मन को (याराना)मधली प्रेमळ झुळूक; अंजानची गाणी कायम मनात रुंजी घालत राहतात. कहना ही क्या ये नैन एक अंजान से मिले(बॉम्बे)मधली ओढ दिल तो है दिल(मुकद्दर का सिकंदर)मध्ये अधिकच गहिरी होते. जिधर देखूँ तेरी तस्वीर नजर आती है(महान)मधले नैराश्य, इंतेहा हो गयी इंतजार की (शराबी) विरहाची परिसीमा गाठते, तेव्हा अंजानच्या शब्दाने त्यातील गोडी अधिकच श्रवणीय होते. ही अंजान यांच्या शब्दांची जादू होती.
अमिताभ यांच्या कारकिर्दीत त्यांच्या गाण्यांचा वाटा खूप मोठा आहे. ही बहुतेक गाणी अंजान यांची आहेत. गीतकार समीर हे अंजान यांचे चिरंजीव. मा. अंजान यांचे १३ सप्टेंबर १९९७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.Kajaykulkarni / divyamarathi.bhaskar.com
Leave a Reply