नवीन लेखन...

लाल्या

लाल्याचे पैसे आल्येत म्हणं’

‘व्हय का’

‘न्हायी म्हंजी, काल का परवा बबन म्हणत होता.. मला तरी काय म्हायीतीय ?’

‘येत्येल ना पैसे.सरकार वाटतय. गुदास्तापण वाटले व्हते म्हणं.’

‘व्हय मिळाले व्हते ना.उली उली दिल्ते . धा-धा , पाच पाच. शिताडून शिताडून.’

‘त्यातनं काय व्हतय, बचका.’

‘तेव्हडीच मरणाला रात आढी.’

‘तेव्हढं खरय म्हणा.’

‘तस्स खत, बी,भरान बी म्हाग झालय.’

‘व्हूँ.’

‘लाल्याच्या पैशात एक ब्याचा डबाबी येयना.म्हागाई त् किती व्हाढलीय. परत ब्लॅक . गुदास्ता दोन हजार मिळालं. एक डब्बा पार गेला तीन हजाराला. त्यात काय एकच एक्कर रान माखतय. खर्चाच्या मानान काहीत न्हायी त्ये. उगं लोकांच्या तोंडाला पानं पुसीत्येत म्हणायचं.’

‘न्हायी त् काय.’

येशीबाहेर गप्पा रंगल्या होत्या. हरिभाऊ जोशात येवून सांगत होता. शेतीमातीच अर्थकारण मांडत होता. बँकीत कापसाचे पैसे जमा झाल्याच्या बातम्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदाळल्यागत आदळत होत्या. कापसावर लाल्या रोग पडला होता. सरक्याच सगळं पात गळाल होतं. दोडी पोसायच्या आत करपुन गेल्ती. उत्पन्न काहीच निघाल नव्हतं. म्हणून सरकार मायबापान. मदत म्हणन एकरी काही पैसे दिले होते. शेतकरी निस्तेज णाल्ता. गळून गेल्ता. पुढाऱ्यांची मात्र चांदी झाल्ती. दुष्काळाची पडत होता. पावसान हंलकावण्या दिल्या होत्या. राजा दुबळा झाला होता. पंख छाटलेल्या जटायूगत.

‘आपल्या गावाचा नंबर कव्हाय ? वाटपाचा.’

‘त्ये बाराखडीनुसार वाटत्येत जणू’

‘व्हय का?’

‘देत्येल का पण?’

‘देत्येल ना, कुठं जाणाऱ्येत . सरकारचे पैसे बुडत नसत्येत. कव्हाबी कागदावर उगत्येल. पण कामून इच्यारतूस?’

‘न्हाय म्हंन्ल. डीसीसीचं वाजलं डबडं.’

‘डबउं वाजलं. पण त्यान्ला काय ह्या हातांनी सरकारकून घ्यायचं अन् त्या हातानं लोकांना वाटायचं. त्यांच्या बेंबीवरचं काय जायाचय.’

‘तसं हाय म्हणा’.

‘आपलं गाव दोन चार दिसत येईल काय?’

‘त्याचं काय, क,ख,ग .. अशा बाराखड्या लावल्यात म्हण’.

‘आपलं तराडमोहा येत का न्हायी?’

‘पार शेवटाला येईल.पण येवढा उताळा होऊ नगस.’

‘न्हायी म्हंजी , मह्या बापाच्या नावावर जमीन हाये. मेलेल्या माणसाचे पैसे कसे देतेत कुणाष्ठोक.’ हरीभाऊ शंका व्यक्त करत होता.

‘हाँ .. आत्ताशी कळलं. तुला कशामुळ चिंता लागुन ऱ्हायलीय त्ये.’

‘ हूँ.. त्येच म्हणत होतो मी. त्ये लाल्याचे पैसे मलाच मिळाले त् बरं व्हईन. तेव्हडं बघ चौकशी करन तू जरा हिंडता फिरता असतोस.’

‘बघतो ना?’

‘बघ न्हायतर त्यो बँकीत पाव्हणाय ना आपला.त्याला लाव एक कॉल.म्हणावं तेवढे लाल्याचे पैसे काढून दी.’

‘जमिन कमून न्हायी नावावर करून घितली.आत्तापत्तोर तर फेर झाला असता वढून.’

‘मला वाटलं यिन वारसाहक्कान.’

‘तस्स न्हायी भ्वो आता. रडल्याशिवाय आयबी पाजीत न्हायी. आन् तू म्हंतू वारसाहक्कान येईल ‘आपोआप.’

‘घी तंबाखू.’

‘बंदी आलीय म्हंण.’

‘तंबाखूवर नाही आली.’

‘मंग..’

‘गुटख्यावर आलीय.’

‘गुटखा तर मिळतूय आजुनबी.’

‘कुठं?’

‘परवाच आणलाय.’

‘कुठं भेटला तुला.’

‘तुला कशाला सांगू सांगायलाबी बंदीय म्हणं.’

‘नकू सांगू.’

‘डबी काढ.’

‘कशाची?’

‘चुण्याची’..

‘हं घ्ये.’

हरिभाऊ गंगा काहीच काम नव्हतं म्हणून गप्पा मारत होते. लाल्या रोगाच्या पेसे . घरोघर चर्चा झडत होत्या. कुणाला पोरांना वह्या, दप्तर  आणायचे होते. तर कुणाला तेलामीठाचं भागवायच होत. शेतकरी भरडला जात होता. पावसान दगा दिल्ता.सरकारी कामं निघनारेत असं उगीचच म्हण होते. काम त् कुठच सुरू झाल नव्हत. गंगापुढं  भीषण संकट उभा ऱ्हायल होत. पाठीशी दोन लेकर होती. त्यांच कस भागवायच याची पंचाईत होती. कुणी कुणाला ओळखीना. खाजगी सावकाराचं साधायला लागल. त्यांचे व्याजदर वाढायला लागले. लोक किडूक – मिडूक ईकायला लागली. घरात चूल पेटवायचे वांधे झाले. गंगाच्या बायकोने मागच्या हातान धा-पाच ठेवले होते. त्येबी संपले. वातावरण भकास, भयान बनले होते.गावात भांडण व्हायची. सरकारी काम निघाले त् त्ये परत जात. मजुरीचे पैसे थेट खात्यावर जमा व्हणार व्हते. माणसं दाखविल्याशिवाय पैसे मिळत नव्हते. जनावरांना चारा नव्हता म्हणून छावण्या सुरू होणार होत्या. चारापाण्याविना जनावर तडफडत होती. कणगीतला दाळदाणा संपला होता. रस्त्यान नुसता फुपाटा उधळत होता. हार्मान्स अन्बॅलन्स झाल होत. प्यायला पाण्याच टँकर याया लागल. टँकरवाल्याची नजर कावळ्यागत पाणी भरणारावर होती.

इकडं हरीभाऊ कासावीस झाला. कालपरवाच म्हातारीच वर्रीसराध घातलं व्हत. जमीन अजुन नावावर नव्हती. मासा पाण्याविना तडफडावा तसा हरीभाऊ तडफडत होता.लाल्याचे पैसे अजुन दोन तीन महिने येणार नाहीत याची जाणीव त्याला झाली. सकाळी लवकर उठला . तोंड येडवाकडं ओंबाळल. लाल सूर्य खाल्लाकडं उगवला.

‘ अगं च्या टाक की? – हरिभाऊ बायकोला म्हणाला.

‘टाकते वाईज, पण दुध नायी.’

‘कोरा टाक मंग.’

‘पोरांन्लाबी दूध नायी.एखाद शेपूर्ड पाळलं असत त् बरं झाल असत.’

‘बघतो आज पाव्हण्याला इच्चारून’

‘उस्न पास्न तरी कोण देतय अशा काळात’ हरिभाऊची बायको स्टीलच्या भांड्यातलं पाणी तांब्यात घेत बोलली.’

‘उस्न नव्ह. लाल्याच पैस जमा झाल्याती. बँकेत. आपला पाव्हणाय. फुलसिंगीचा. सुनीचा नंदावा.त्याला उच्चारतो. एखादयेळेस मिळूनबी जात्येल. लवकर. एखादी पाठ घेऊ दुभती. म्हंजी पोरान्ला आन् चहालाबी व्हईल. उली-उली.’

‘बघा, तेवढं’

‘आज जातो तालुक्याला.’

‘व्हय जा’ हरिभाऊच्या बायकोने कोरा चहा करून दिला.

हरिभाऊ न्याहारी करून निघाला. एक जिप्ड पकडलं. माग लटकला. गर्दी वाढत होती. जीप तालुक्याला थांबली . सगळी माणस धुळीन माखले होते. बँकेत शिरला. गर्दीच गर्दी. काचाच्या आतल काहीच दिसत नव्हतं. लोक रेटारेटी करायला लागले. आतले अधिकारी वसकत होते. एखादा सुटाबुटातला माणूस यायचा थेट मागच्या दारानं आत जायचा. त्याच काम करायचा. लाल्याचे पैशावाले एकमेकांत भांडत होते.कुणाच खात नव्हत तर कुणाचा फोटो नव्हता तर काहीचे भावबंध पुण्या- मुंबईला होते. तलाठ्याकडं जाव लागायच. बँकेच्या समोर एक काळाभंगार फळा होता. त्यावर पांढऱ्याफट्ट याद्या लावल्या होत्या. उन्हामघ्ये त्या चमकत होत्या. त्या याद्या काहींनी फाडल्या होत्या तर पेनानी , शाईने खुणा करून खराब केल्या होत्या. खिशातले पैसे देतोत अशा रूबाबात अधिकारी वागत होते. दहा-पाच रूपये सांडीत होते. फेट्यावाले, गरीब दिसणारे, म्हाताऱ्यांचे हाल होत होते.

हरिभाऊला पाव्हणा दिसला. त्याची पाठमोरी आकृती त्याला भानावर आणत होती. मदत होईल असा भास झाला.

‘ओ.. ओ.. साहेब’ हरिभाऊनं गर्दीतून हाक मारली.

‘………….’ तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. साहेब फाईल इकउून तिकडं नेत होते.  मध्येच काँप्यूटरवर जाऊन काहीतरी काम करत होते. बँकेचे नोकर होते. परंतु ग्राहकांना नोकरासारखे वागवित होते. म्हणून त्यांना साहेब म्हणत होते. पुन्हा नावाने हाक मारली.

‘ ओ.. लोकरे साहेब!’ साहेबांनी मागे वळून पाहिले.

‘बोल हरिभाऊ.’ असं लोकरे साहेब बोलताच हरिभाऊला गड जिंकल्याचा आनंद झाला. काचेला एक हात जाईल एवढं बीळ होते. त्यातून वाकडं मुंडक करून आत बघत होता.

‘तराडमोह्याचा नंबर कव्हाय, साहेब?’

‘येईल ना महिन्याभरात.’ साहेब बोलले.

‘माही थोडीशी अडचण होती.’

‘कोण्ती?’

‘बापाच्या नावावर जमिन हायी. त्ये गेल्याल सहा महिने झाल्येत. मला भेटत्याल का पैसे.’

‘व्हय भेटतील की . का न्हायी भेटणार?’

‘झाल का तुमच बोलायच’ – पाठीमागन एक आवाज आला. हरिभाऊ दचकला. कुणाचा आवाज हे पाहण्यासाठी मागं वळून पाहिलं. तर बँकेचा वॉचमन . गळ्यात बंदुक अडकून आलेला. तो गर्दी पांगवित होता. हरिभाऊ घाबरला. मळक्या ड्रेसवाल्याकडे पाहिल.

‘ झालच माझ.’

‘साहेब तेवढं बघा ना किती जमा झाल्येत?’

‘ते आज नाही सांगता येणार . ती यादी तलाठ्याकडं असते. गाववाईज आमच्याकडे येते. तुम्ही तलाठ्याकडं जा. तिथं लागल सगळा मेळ.’ इतरांना खेकसणारा साहेब आपल्याला चांगला बोलला. माहिती सांगितली. आपल वजन वाढल्यासारख वाटलं. आता तलाठ्याला गाठाव म्हणून हरिभाऊन खिडकी सोडली. तडातडा तलाठी कार्यालय गाठले. अंगात कार्यकर्ता घुसल्यागत झाल. एकदा दोनदा उतारे तलाठ्याकडून नेल्यामुळे हापीस माहीती झाल्त.

‘तलाठी हापीस हिथच हाय नव्ह’.

एका टपरीवाल्याला विचारत होता. सिमेंटच्या जंगलात वाट सापडत नव्हती. बराच बदल झाला होता. रंगेबगरंगी घरं वाट चुकवित होते. दोन चार इमारती होत्या तिथ आता बहुमजली इमारती रांगेने उभ्या होत्या.

‘ आता बदललय राव तलाठ्याच हापीस.’

‘ कुणीकडं गेलय?’

‘तिकडं, उत्तमनगरात.’

‘व्हय का?’

‘हॅूं..’

हरिभाऊ मान खाली घालून उत्तमनगराकडं निघाला. माघारी बघ, पुढ बघ, करत होता . मनातून प्रचंड चिडला होता.माणसांना ऊत आल्ता. एकदाच धापा टाकत उत्तमनगर गाठल. तिथ चौकशी करू लागला. तलाठ्याच ऑफीस बंद होत. दोन-तीन म्हातारे दारातच बसलेले होते. काही भितीला टेकून बसले होते. काका काही केल्या येत नव्हते. हरिभाऊ तिथे पोहोचला. काका चार वाजता येणाऱ्येत असं समजल. पोटात आगडोंब उसळला. हरिभाऊचा चेहरा पडला. माथ्यावर आलेले घामाचे थेंब टपकत होते. इथ बसुन राहील्याशिवाय पर्याय नाही. नसता आजची चक्कर मोक्कार जायची. घरच कामही बुडत होते. अन् इथ कामही होत नव्हतं. दारात बसलेल्या म्हाताऱ्याजवळ गप्पा मारू लागला. सूर्य मावळतीला चालला होता. तलाठी काका काही आलेच नाहीत. ते जिल्ह्यावरून ये जा करत होते.ते तसेच घराकड गेले होते. उद्या सकाळी काकाकडं पुन्हा येवू अस मनात ठरविल. घराकडे निघाला. शेवटची गाडीही हुकली. अंधार किर्र झाला. आता काय कराव? तेवढ्यात एक फटफटी समोर येताना दिसली. तिच्या लाईटमुळं डोळे दिपून गेले. तिला हात केला. गावातलेच मास्तर होते. सिंगलसिटच होते. काचकन् ब्रेक दाबल. थांबले.

‘बरं झाल तुम्ही भेटलात.’

‘बस.हरिभाऊ, काय भानगडेय.आज रातच्याला हिथं.’

‘आल्तो जरा, लाल्याच्या पैशाच्या बाबत.’

‘बरं बरं’

बराचवेळ फटफटी आदळत आदळत गावात आली. हरिभाऊ घरी गेला. बायकोच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिल नाही. जेवला. अंग दिल टाकून. झोपला.

चार पाच दिवस असेच निघून गेले. रोज चौकशी करायचा. जायला यायला खर्ची घालू लागला. धा- पाच चहापाण्याला लागायचे. घरच काम बुडायच. बँकेच तोंड पाहू वाटना. मनात वाटायच. वारसाची नोंद व्हईल अन् लाल्याचे पैसेबी मिळतील. एक दिवस तलाठी हापीस उघडं दिसल. ‘काका’ नव्हते. हाताखालचा कारकून होता.

‘नमस्कार साहेब.’ – हरिभाऊ पायरी चढत होता.

‘ काय पाहिजी बोल.’

‘ न्हायी म्हण्ल काका कुठयत?’

‘गेल्येत निवडणूकीच्या कामाला. काय कामय त्ये बोला.’

‘चौकशी करायची व्हती.’

‘कोण्ती?’

‘त्ये लाल्याच्या पैशाची.’

‘मिळत्येत की डिसीसीत.’ – कारकून समजावत होता

‘नाही. खातेदार वारल्येत. वारसाहक्क मव्हा लावायचाय.’

‘मंग म्हागच का न्हायी घेतल नाव लावून.’

‘ऱ्हाईलय तसच्च’.

‘आता जाग आलीय म्हणा की. जव्हाचे काम तव्हाच करीत जावात.’

‘करायला पाहिज्येत. तुमचं खरय साहेब . पण आता काय करावा लागल ?’

‘कायी नाही . ग्रामपंचायत मधी जा . तिथ वारसाच प्रमाणपत्र घ्या. तुमच्या नावानी. कोर्टात जा. शंभर रूपयाच्या बाँडवर लिहून द्या.इशपथपत्र तयार करून द्या. एक कुपनची झेरॉक्स जोडा. फोटो काढा तीन. मग तलाठीकाका तुम्हाला पत्र देतील. त्ये घेऊन बँकीत जा. तिथ तुमच्या नावानी खातं उघडा. मग तुम्हाला पैसे मिळतील.’

‘बरं’.

‘वडील वारल्याले किती दिवस झाल्येत?’

‘झाल्याती सहा महिने’. हरिभाऊला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. दोन हजार टिकल्यासाठी हजारीक रूपये खर्च येणार होता. परत कामाचा खोळंबा करायचा होता. अन् सरकारचे उपकार डोक्यावर घेऊन हिंडायचे होते. ‘येतो घेऊन साहेब’, म्हणत निरोप घेतला.

‘हो,हो.. ही चिठ्ठी घेऊन जा. कामाला यिन’त्याच्यावर लिहलय काय काय कागदपत्र आणयचेत त्ये.’ – औषधाची चिठ्ठी घ्यावी तशी घेतली.

‘बरय ‘ म्हणत चालायला लागला. तेवढ्यात.

‘आल्यावर मला अगोदर भेट्टा. मग काकाकडं जा.’

‘भेट्टा’ या शब्दाचा अर्थ हरिभाऊला कळाला होता. त्याने घर गाठले. एकदोन दिवसान ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र. त्यांची ‘ विशिष्ठ फिस !’ भरून घेतल. झेरॉक्स काढल्या. तहसिलमधून शपथपत्र कमीजास्त करून घेतल. त्याचे हजार बाराशे शिताडण्यावारी गेले. तलाठ्याकडून पत्र घेऊन बँकेत गेला. खातं उघडलं. त्याच्यावर काही शिल्लक ठेवावी लागते. तीनशे रूपड्या खिशात घालून पाचशेच काम बुडून घरी पोहोचला. लाल्याचे पैसे मिळाल्याच्या समाधानात!

— © विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड

मो.९४२१४४२९९५

लेखकाचे नाव :
विठ्ठल जाधव
लेखकाचा ई-मेल :
vitthalj5@gmail.com

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..