लॅम्बोर्गिनीचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा जन्म २८ एप्रिल १९१६ रोजी इटली येथे झाला.
फेरुसिओ लॅम्बोर्गिनी हे हे ट्रॅक्टर व्यवसायिक होते. दुसऱ्या महायुद्धांनंतर त्यांनी महायुद्धात वापरलेली मिलिटरी मशीन घेऊन त्यांचे ट्रॅक्टर मध्ये रूपांतर करण्याचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला चालायला लागला, लॅम्बोर्गिनी यांचेकडे चांगली संपत्ती जमा व्हायला लागली. लॅम्बोर्गिनी यांना सुपर कार्स चालवण्याचा छंद होता. त्यांचेकडे बऱ्याचशा सुपर कार्स होत्या, यातील एक होती फेरारी. फेरारी चालवताना त्यांना गाडीमध्ये काही दोष आढळले. आवाज जास्त असणे, रस्त्यावर थोडी रफ ड्राइव्ह असणे आणि क्लच सारखा सारखा दुरुस्त करावा लगे अशा काही समस्या त्यांना दिसल्या. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे त्यांच्या सूचना पाठवले.
एन्झो फेरारी हे फेरारी कंपनीचे मालक. यावेळी सुपर कार्स च्या दुनियेत फेरारी यांचा दबदबा होता. ते स्वतः सुद्धा चांगले मेकॅनिक होते. लॅम्बोर्गिनी यांच्या सूचना त्यांना काही पसंत पडल्या नाहीत. एका ट्रॅक्टर मेकॅनिक ने आम्हाला सुपर कार कशी बनवायची हे शिकवू नये अशा शब्दात त्यांनी लॅम्बोर्गिनी यांच्या सूचना धुडकावून लावल्या. लॅम्बोर्गिनी यांना फेरारीचे वागणे चांगलेच खटकले. एक ट्रॅक्टर तयार करणारा पुढे आपल्याच क्षेत्रात येऊन आपलाच सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकणार आहे याची एन्झो यांनी कधी कल्पनाही केली नसेल. त्यांनी स्वतःच सुपर कार ची निर्मिती करण्याचे ठरवले, आणि त्यावर तात्काळ काम सुरूही केले. १९६४ मध्ये लॅम्बोर्गिनीने जी टी ३५० ही पहिली गाडी तयार केली. गाडीमध्ये शक्तिशाली व्ही १२ इंजिन होते. पाच गेअरचे ट्रान्समिशन, चारही चाकांना डिस्क ब्रेक आणि स्वतंत्र सस्पेंशन यंत्रणा होती, परंतु जी टी ३५० ला तयार करणे सोपे नव्हते. गाडीच्या प्रोटोटाइपमधून डिझाइनच्या अनेक समस्या १९६३च्या टुरीन ऑटो शोमध्ये समोर आल्या. सर्वात मोठी समस्या म्हणजे गाडीचे इंजिन आकाराने मोठे असल्याने गाडीच्या बॉडी पॅनलमध्ये बसत नव्हते. त्यावर फेरुचिओ यांनी इंजिनच्या आजूबाजूला विटा लावून त्याला आधार देण्याचा तोडगा काढला आणि गाडीचे बॉनेट कार्यक्रम संपेपर्यंत बंदच ठेवण्यास सांगितले. शेवटी ऑटो शोमध्ये गाडी केवळ दाखवण्यासाठी उभी होती, चालवण्याचा प्रश्न नव्हता. मात्र जेव्हा जी टी ३५० रस्त्यावर आली तेव्हा ती इंजिनीअरिंगच्या उत्कृष्ट नमुना ठरली. कारतज्ज्ञ आणि ग्राहकांनी गाडीला पसंती दिली. त्यानंतर ४०० जी टी आणि ४०० जी टी २ प्लस २ देखील बाजारात आली. या गाडय़ांमुळे लॅम्बोर्गिनी इतर मोठय़ा कार कंपन्यांशी चार हात करायला तयार आहे यावर शिक्कामोर्तब झाले.
१९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता.
१९४८ मध्ये फेरुचिओ यांनी फियाट टोपोलिनोमध्ये बदल करून मिल मिंग्लिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. हेच त्यांच्या रेस कार निर्मितीच्या नकारामागचे कारण मानले जाते. तरीही या तिघांनी मिळून फेरुचिओच्या नकळत एका गाडीच्या डिझाइनवर काम करण्यास सुरुवात केली आणि तिचे नाव पी ४०० असे ठेवले. दिवसभर इतर काम केल्यावर रात्रीच्या वेळेस या गाडीवर ते तिघे काम करीत होते. ही नवी गाडी जास्त महागडी नसणार, त्याचप्रमाणे कंपनीच्या तत्त्वांशी जुळवून घेणारी असेल, असे आपण फेरुचिओ यांना पटवून देण्याचा तिघांचा मानस होता. फेरुचिओ यांना गाडीचे डिझाइन आवडले, पण रेस कार न बनवण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. प्रसिद्ध स्पॅनिश फायटिंग बुलवरून गाडीचे नाव ठेवण्यात आले. त्याचवेळी गाडीच्या नव्या लोगोसाठीदेखील अशाच आक्रमक फायटिंग बुलची निवड करण्यात आली. गाडीचे डिझाइनही असे होते की दरवाजे उघडल्यावर ही गाडी शिंग उगारलेल्या आक्रमक बैलासारखी भासत होती.
या गाडीत ३४५ हॉर्सपॉवरचे ट्रान्सवर्स माउंटेड ३.९ लिटरचे व्ही १२ इंजिन वापरण्यात आले होते. गाडीला स्टीलच्या फ्रेम आणि दरवाजे होते. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस ॲल्युमिनियम वापरले होते. त्यावेळी या गाडीची किंमत २०,००० डॉलर इतकी होती. १९६६ ते १९६९ मध्ये २७५ पी ४०० बनवण्यात आल्या. १९६८ मध्ये मिउरा एस, १९७१ मध्ये मिउरा एस व्ही, अशी मिउराची संस्करने बाजारात आली. २००६ मध्ये मिउराला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लॅम्बोर्गिनीने कन्सेप्ट मिउरा जगासमोर आणली. पण त्याचवेळी कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष स्टीफन विंकेल्मन यांनी लॅम्बोर्गिनी पुन्हा मिउराचे उत्पादन करणार नसल्याचे जाहीर केले.
रेस कार म्हणून तयार करण्याच्या उद्देशाने बनवलेली मिउरा पहिली सुपर कार ठरली. लॅम्बोर्गिनीच्या इतिहासातील मानबिंदू ठरलेली मिउरा अजूनही अप्रतिम डिझाइन आणि उत्कृष्ट इंजिनीअरिंगचे प्रतीक आहे.
या गाडीचे डिझाइन आधीच्या लम्बोर्गिनीहून वेगळे होते. गाडीचे व्ही १२ इंजिन हे बॉडीच्या मध्यभागी बसवण्यात आले होते. १९६५च्या टुरीन ऑटो शोमध्ये गाडीची केवळ चासी दाखवण्यात आली. त्या चासीच्या डिझाइनमुळे प्रभावित झालेल्या लोकांनी वातो बॉडी नसूनही गाडीची ऑर्डर दिली. या प्रोटो टाइपच्या स्टायलिंगचे काम बेटोने या कंपनीकडे देण्यात आले. मार्सेलो गांदीनी यांनी पी ४०० वर काम करण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये जिनिवा ऑटो शोमध्ये चटक नारंगी रंगाची पी ४०० जगासमोर आणली गेली. उत्पादनाच्या वेळेस गाडीला मिउरा नाव देण्यात आले.
२० फेब्रुवारी १९९३ रोजी फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply