भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती-
” कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो ! ”
कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते. त्यांना वेळेची ट्रायल आणि आलेल्या रिळांची तपासणी करायची असते. त्यावर आधारित शोजचे टायमिंग ठरविले जातात. किंवा लास्ट डे लास्ट शो बघावा कारण गावातील मुक्काम हलवून दुसऱ्या गावी रिळे पाठवणी करण्यापूर्वी सगळं धडधाकट आणि जसंच्या तसं पुढे पाठवायचे असते. त्यामुळे आख्खा चित्रपट या दोनच वेळी बघायला मिळतो.
त्रिकुटातील आरके माझा सगळ्यात जास्त आवडता. त्याचे सगळे चित्रपट मी पाहिले आहेत-एकदा नव्हें तर वारंवार ! दुसरा क्रमांक दिलीप कुमारचा आणि शेवटी देवबाप्पा चा ! फार काही लॉजिक /विचार वगैरे यामागे नाही.
आम्ही पांढऱ्या पडद्याच्या प्रेमात पडलो तोवर दिलीपसाब खेळी आवरून पॅव्हेलीयनकडे परतले होते. त्यांचे चित्रपट री -रन ला फारसे नसत. त्याबाबतीत मी आणि राजकपूर सोलापूरच्या उमा टॉकीजचे शुक्रगुजार ! वर्षभर मॅटिनीला आरके – तिकीट दर ७५ पैसे किंवा १रू ०५ पैसे ! त्यामुळे आमची गट्टी जमली.
दिलीपकुमारचा लहानपणी पाहिलेला (घरच्यांनी का दाखविला माहीत नाही पण) एकमेव चित्रपट म्हणजे – गोपी ! त्यातले “सुख के सब साथी ” प्रचंड आवडलं. पाठ केलं ,काहीवेळा गाऊन दाखविलं. बाकी प्रभाव शून्य !
“राम और श्याम ” ची थोरवी मित्रांकडून ऐकली आणि फार उशिरा पाहिला. (त्याचे स्त्री-व्हर्जन “सीता और गीता “आधी पाहिले.) नंतर सोलापूरलाच उमा चित्रगृहात वडिलांनी मला आणि भावाला “सगीना ” दाखविला. कारण माहीत नाही त्यांना तो का दाखवावा असे वाटले, पण तोही नाही आवडला. “बैराग”चे ही तेच. बाकी त्याच्या ऐन भरातील “अंदाज /देवदास ” सारखे चित्रपट अजूनही बघितले नाहीत. (शाहरुखचा आचरट “देवदास “मात्र पाहिला)
मग रंग धारण केलेले त्याचे “नया दौर, गंगा-जमना आणि मुघल-ए -आजम ” पाहिले आणि त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात केली.
त्याच्या उत्तरायणातील चित्रपटांनी मात्र माझी एकूणच समज वाढविली. सगळ्या समकालीनांना पोरकं करून संपूर्ण लांबीचा पडदा व्यापणारा दिलीप दुसऱ्या इनिंग मध्ये अधिक भावला. ” सौदागर, शक्ती, कर्मा, विधाता, मशाल, दुनिया ” किती नांवे घ्यावीत? या प्रक्रियेत वर्गात न जाता त्याने अनेक पिढ्यांना घडविले. सगळे त्याचे निरीक्षण करून त्याच्यासारखे होण्याचे प्रयत्न करीत. मनोज सारख्या भ्रष्ट आवृत्या (आदमी, क्रांती) आणि संजीव कुमार सारख्या स्वायत्त आवृत्त्या पांढऱ्या पडद्याने बघितल्या. पण दिलीप उच्चासनावरून खाली आला नाही.
माझ्या अग्रक्रमात उत्फुल्ल आरके पहिला असला तरी त्याचे ४-५च चित्रपट मला आवडले, दिलीप चे चक्क ८-९ आणि देवचे फक्त – ” गाईड आणि ज्वेल थीफ “. शेवटी देव केविलवाणा झाला. दिलीपने मात्र योग्यवेळी सुनील गावस्करसारखी ग्रेसफुल एक्झिट घेतली आणि दुसऱ्या इनिंग मध्येही रुबाब टिकविला. क्रिकेटमधला तो जंटलमन तर हा पडद्यावरचा!
१९७६ साली मुकेश गेल्यावर आमच्या अन्याने गॅदरिंग मध्ये त्याच्यासाठी दोन गाणी निवडली- ” ये मेरा दीवानापन ” (यहुदी) आणि “एक दिन बिक जायेगा माटी के मोल ” ( धरम करम ) आणि माझ्या मनात या दोस्तांची अभिन्न जोडी स्थापन केली.
लताच्या एका कार्यक्रमात – बहुधा “श्रद्धांजली”, तिचा परिचय त्याने ज्या नजाकतीने करून दिला तो प्रकारच बेमिसाल. उर्दूवरील त्याचे प्रभुत्व गुंगवून गेले.मराठीत त्याचा तुल्यबळ कलावंत म्हणजे डॉ लागू ! दोघांचाही जागतिक चित्र-नाट्याचा जबरी अभ्यास , दोघेही मेथॉडिकल – स्वतःच्या भूमिकेवर जबरदस्त मेहेनत घेणारे आणि स्वतःची नाममुद्रा उमटवणारे ! स्वतःची ओळख स्वतःच्या व्यवसायाला देणारे व्यावसायिक.
सध्याचे दिवस चांगल्या शिक्षकांनी जाण्याचे आहेत.
दिलीप साहेबांचा “लास्ट डे , लास्ट शो ” पाहिला.
आता पेट्या आणि रिळं नव्या विश्वात जशीच्या तशी पाठवायला हवीत- तिकडचे सिनेरसिक खोळंबले असतील, या कलावंताचा पूर्ण लांबीचा जीवन-चित्रपट पाहण्यासाठी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply