लाटांवर लाटा उसळती,
तुषारांचे बनती मोती,
अथांग सागराच्या ह्या,
सुंदरतेची काय गणती,–!!!
निळेशार पसरलेले पाणी,
दूरवर क्षितिजी पोहोचलेले,
जितके विस्तीर्ण तितुके,
सखोल आत गेलेले,–!!!
एक लाट उठता उठतां,
दुसरी उभी टाके,
टक्कर दोघींची होता,
पाणलोट होती जागे,–!!!
रत्नाकराची दुनिया,
सारी अजब किती,
पारणे फिटे डोळ्यांचे,
तृप्त होतसे दीठी,–!!!
थेंबांचे मोती उधळतो,
तो रात्रंदिवसा,
किंमत नसे त्याची,
पर्वा नाही माणसा,–!!!
अमर्याद त्याचे स्वरूप,
वाटे गगनाला भिडलेले,
सूर्यबिंबही केवढे,
दोघांमध्ये टेकलेले,–!!!
पाण्याचा रंग बदले,
निळा काळा पांढरा,
वर सोनेरी ऊन चमके,
किरमिजी होई सगळा,–!!!
पाण्यावर हालत डुलत,
चाले बोटीची स्वारी,
तिच्यात बसून सफरीची,
गंमत की हो न्यारी,–!!!
दूरवर एखादा मासा,
कोलांट्या बघा मारे,
मुक्त जीवन ते,
क्षणोक्षणी पण हाले,–!!!
केवढे ते सुंदर मासे,
हात लावण्या जीव धजेना, अल्लड,अलवार जरासे,–!!!
इकडे तिकडे बघतां,
चौफेर पसरलेले पाणी,
अनेक जीवजंतू जगती,
खालील वनस्पतींच्या रानी, –!!!
कासवे मौज -मजेत,
पहा,कशी बागडती,
सागरच त्यांची दुनिया,
त्यांना कुठली भीती,–!!!
सावकाश चालत ती,
अलगद येती किनारी,
पायांनी रांगोळी केवढी,
समुद्रतीरी घालती,–!!!
सुंदर नक्षी वरूनी त्या,
खेकडे बघा चालती,
समुद्रच संरक्षण कर्ता,
पटकन पाण्यात पळती,–!!!
लाटांचा केवढा दंगा,
खळखळ किती आवाज,
थोडे ऐका कान देऊनी,
लांबवरची ती गाज,–!!!
शंख-शिंपले छोटे-छोटे,
भोवती, मऊ मऊ रेती,
केवढा आनंद मिळे, चालता-चालता अगदी,–!!!
वर निळी मेघडंबरी,
पाहून जीव थरकापे,
दृष्टी फिरवा नुसती,
चालले काय समुद्रांतरी,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply