नवीन लेखन...

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ५ – अ

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


विभाग  :

विभाग

  • कांहीं अन्य उदाहरणें :

रहीम, वाज़िद अली शाह, इतर  –

  • रहीम (अब्दुल रहीम ख़ाने ख़ाना )

हा अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक. त्याला फारसी आणि संस्कृत दोन्ही उत्तम येत होत्या. त्यानें बाबरच्या बाबरनामाचें, बाबरच्या ‘चगताई’ भाषेतून फारसीत भाषांतर केलें. यावरून त्याची भाषांवरील पकड ध्यानात यावी. अकबराचा दरबारी हाकिम असल्यामुळे, त्याचें राजकाराभारासंबंधीचें लिखाण फारसीत, आणि दफ़्तरी रिवाजानुसार असणार. त्याशिवाय, त्यानें संस्कृतमध्ये ज्योतिषशास्त्रावर दोन ग्रंथ लिहिले. त्याच्या अन्य रचनांमध्ये घनाक्षरी, मदनाष्टक, तसेंच बरेच दोहे, सोरठे व सवैये आहेत. ज्योतिषविषयक ग्रंथातील भाषा, मदनाष्टकातील भाषा आणि पारमार्थिक दोह्यांच्या भाषेचा पोत भिन्नभिन्न असणार, हें सांगणें नकोच.

  • वाज़िद अली शाह

हा अवधचा नबाब होता. त्याचें नृत्य, संगीत, नाटक, साहित्य या क्षेत्रांत योगदान आहे. त्याला फारसी व रेख़्ता (उर्दू) उत्तम येत होत्या, व त्यानें दोन्ही भाषांमध्ये लिहिलें आहे. तो ‘अख़्तर’ हा तख़ल्लुस घेऊन काव्य करत असे. त्यानें कंपनी सरकारशी (ईस्ट इंडिया कंपनीशी)  केलेल्या पत्रव्यवहाराची भाषा, व उर्दू काव्याची भाषा यात फरक असणारच.  १८५६ मध्ये जेव्हां त्याला पदच्युत करून exile मध्ये कलकत्त्याला ठेवण्यात आलें , तेव्हां त्यानें लिहिलेली, ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ ही आर्त ठुमरी आजही सुप्रसिद्ध आहे. त्यानें लिहिलेल्या फारसी पुस्तकांतली भाषा, त्याच्या रेख़्ता (उर्दू) शायरीची भाषा आणि ‘बाबुल मोरा’ ची व्याकुळ भाषा यांत फरक असणारच , हें स्पष्ट आहे.

  • मुन्शी प्रेमचंद :

मुन्शी प्रेमचंद हे हिंदी व उर्दूतले श्रेष्ठ साहित्यिक समजले जातात. त्यांनी पद्य लिहिलें नाहीं, तर कथा व कादंबर्‍या लिहिल्या. प्रेमचंद यांची, श्रेष्ठ साहित्यिक म्हणून खासियत अशी की, त्यांची भाषा पात्राप्रमाणें बदलते. या गुणासाठी अन्य साहित्यिकांनी, समीक्षकांनी तसेंच वाचकांनी प्रेमचंदांची स्तुती केलेली आहे. उदाहरणार्थ, त्याच्या ‘गोदान’ या कादंबरीतील मुख्य व्यक्ती आहे ‘होरी’ नांवाचा एक शेतकरी. हा होरी बोलतो तें भाषिक रूप वेगळें, आणि होरीच्या मृत्यूनंतर घरीं बोलावलेला पंडित (भटजी) कर्मकांड, पुण्य, स्वर्ग-गमन इत्यादींबद्दल बोलून होरीचा मुलगा ‘गोबर’ याला ‘गो-दान’ करायला संगतो, त्याचें भाषिक रूप वेगळें आहे. या भाषिक भिन्नतेमुळे, प्रेमचंदांच्या कथा-कादंबर्‍या वाचकांच्या मनाचा सहज ठाव घेतात. भाषेचें वेगवेगळें स्वरूप हा प्रेमचंदांचा मोठा गुण आहे.

  • अमृतराय

१८व्या शतकातील अमृतराय हे औरंगाबादेस मुसाखोरी म्हणून मुत्सद्याच्या पदरीं नोकरीला होते. नंतर ते ईश्वरभजनाकडे वळले. त्यांना फारसीचे ज्ञान होतें. त्यांनी बरीच पदें व आख्यानें रचलेली आहेत. अमृतराय यांनी मराठी ग़ज़लही लिहिली आहे (पण, फरक एवढाच की, मत्ला दोन ओळींऐवजी एक ओळीचाच ठेवला आहे). मात्र त्यांनी ती रचना पारमार्थिक विषयासाठी केलेली आहे. नोकरीत असतांनाचा मुलकी व राजकीय स्वरूपाचा लेखनव्यवहार याची भाषा आणि पारमार्थिक पदें-आख्यानें यांची भाषा यात फरक तर असणारच.

  • नाना फडणवीस

नानांनी पानिपत युद्धानंतर कांहीं काळानें आपलें आत्मचरित्र लिहिलें आहे. तें बहुधा मराठीतील पहिलेंच आत्मचरित्र असावें.

नंतरच्या काळात नाना हे पेशवाई राखणार्‍या मंडळींमधील अध्वर्यूच बनले. त्या काळात त्यांनी, इंग्रज, महादजी शिंदे, राघोबा दादा, दिल्ली-दरबार वगैरेंशी केलेल्या दरबारी / राजकीय पत्रव्यवहाराची भाषा  ही, त्यांच्या आत्मचरित्राच्या भाषेहून भिन्न असणार, हें उघड आहे.

  • इक़बाल

अल्लामा इक़बाल यांनी आधी उर्दूत सगळें लेखन केले. त्यांची रचना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ प्रसिद्ध आहे. मात्र, नंतरच्या काळात जेव्हां इकबाल यांना फिलॉसॉफिकल् लिहायचें होतें, तेव्हां त्यांना उर्दू अपुरी वाटायला लागली (आणि तें साहजिकच आहे, कारण उर्दूला तशी दार्शनिक परंपराच नव्हती). त्यामुळे त्यांनी तें लेखन फारसीत केलें.

 

  • एक निरीक्षण : याचा अर्थ असा की, विषयानुसार नुसतें भाषिक स्वरूपच नव्हे, तर कधी कधी लेखनात वापरायची मूळ भाषाच बदलावी लागते .

— सुभाष स. नाईक     
Subhash S. Naik
M – 9869002126 .   
eMail : vistainfin@yahoo.co.in 

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY –Part – 5 – A

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..